WiFi facility in airline : एअर इंडियाने आपल्या ताफ्यातील निवडक विमानांमध्ये वाय-फाय इंटरनेट सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये प्रवाशांना आता मोफत इंटरनेट वापरता येणार आहे. अशा प्रकारे इनफ्लाईट वायफाय देणारी एअर इंडिया देशातली पहिली विमान कंपनी ठरली आहे. सुरुवातीला काही निवडक विमानांमध्येच प्रवाशांना ही मोफत इंटरनेट वापरण्याची सुविधा मिळेल. त्यानंतर हळूहळू सर्व विमानांमध्ये वाय-फाय इंटरनेट सुरू केले जाईल. दरम्यान, विमानांमध्ये ‘इंटरनेट कनेक्टिव्हिटी’ कशी काम करणार? यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरण्यात येणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊया…
सध्या जागतिक स्तरावरील विमान कंपन्या प्रवाशांना मोफत इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देत आहेत. तीन वर्षांपूर्वी म्हणजे २७ जानेवारी २०२२ रोजी टाटा समूहाने अधिकृतपणे एअर इंडियाची मालकी ताब्यात घेतली होती. तेव्हापासून एअर इंडियाला जगातील आघाडीच्या विमान कंपन्यांमध्ये आणण्याचे टाटा समूहाचे प्रयत्न सुरू आहे.
हेही वाचा : Hijab ban in Switzerland : स्वित्झर्लंडमध्ये हिजाब आणि बुरख्यावर का बंदी घालण्यात आली आहे?
कोणत्या विमानात मिळणार वाय-फाय सुविधा?
सध्या एअर इंडियाच्या एअर बस ३५०, बोईंग ७८७-९ आणि एअर बस ३२१ निओ या निवडक विमानांमध्येच मोफत वाय-फाय इंटरनेट सेवा उपलब्ध असणार आहे. यापूर्वी एअर इंडियाकडून आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुविधा सुरू करण्यात आली आहे. एअर इंडियाने २०२४ मध्ये सुरू केलेल्या नवीन एअर बस ३५० विमानांव्यतिरिक्त इतर विमाने पूर्वीच्या विस्तारा एअरलाइनची आहे. नोव्हेंबरमध्ये विस्ताराचे विलिनीकरण एअर इंडियामध्ये करण्यात आले होते.
विलीनीकरणापूर्वी, विस्तारा एअरलाइन निवडक आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये इंटरनेट सुविधा दिली जात होती. त्यामुळे या सर्व विमानांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. विस्तारा एअरलाइनच्या विमानांमध्ये वाय-फाय इंटरनेट सेवा टाटा समूहाची दुसरी कंपनी NELCO Panasonic Avionics Corporation च्या भागीदारीत दिली जात होती. आता एअर इंडियाच्या निवडक देशांतर्गत उड्डाणांमध्येही हीच सेवा दिली जाणार असल्याची माहिती आहे.
प्रवाशांना त्यांच्या लॅपटॉप, टॅब्लेट किंवा स्मार्टफोनवर मोफत इंटरनेट वापरायचे असल्यास सर्वात आधी वायफाय सुरू करावे लागेल. त्यानंतर ‘Air India Wi-Fi’नेटवर्कचा या पर्यायावर क्लिक करावं लागेल. एअर इंडियाचे पोर्टलवर प्रवाशांना त्यांची माहिती जसे की, PNR नंबर, आडनाव आणि इतर माहिती भरावी लागेल. सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर डिव्हाइस आपोआप वाय-फायशी कनेक्ट होईल.
विमानात इंटरनेटसाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर?
उड्डाणादरम्यान विमानात इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळण्यासाठी दोन प्रमुख तंत्रज्ञानांचा वापर केला जातो. जमिनीवरील मोबाइल टॉवर्स (एअर-टू-ग्राउंड) आणि उपग्रह आधारित कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून हजारो फूट उंचीवर असलेल्या विमानात सहज इंटरनेट उपलब्ध करता येते. या दोन्ही तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी विमानात विशेष अँटेना आणि इतर उपकरणे बसवली जातात. जमिनीवरील टॉवर्समधून इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळविण्यासाठी विमानाच्या खाली बसवण्यात आलेला अँटेना नजीकच्या मोबाइल टॉवरकडून सिग्नल्स प्राप्त करतो. त्यामुळे विमानात बसवलेल्या वाय-फायमध्ये इंटरनेट कनेक्ट होते.
सध्या अनेक मोबाइल कंपन्यांनी बहुतांश भागात मोबाइल टॉवर्स बसवले आहेत. मात्र, पाण्याने व्यापलेला मोठा भाग, कमी लोकसंख्या असलेल्या परिसरात अजूनही टॉवर्सची कमतरता आहे. अशा वेळेस विमान या भागातून उड्डाण करत असल्यास इंटरनेट कनेक्शन मिळणे शक्य होत नाही. जमिनीवरील टॉवर्सची उपलब्धता पहिल्या तंत्रज्ञानावर मर्यादा आणतात. अशावेळेस उपग्रहावर आधारित इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून प्रवाशांना इंटरनेट उपलब्ध करून दिले जाणार आहे.
आणखी एक पर्याय अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. तो म्हणजे उपग्रह आधारित कनेक्टिव्हिटी. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास विमानात बसवलेला अॅंटेना जमिनीवरून उपग्रहांद्वारे इंटरनेट कनेक्ट करण्याचे काम करतो. या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून अधिक विस्तृत नेटवर्क मिळवलं जातं. जेव्हा विमान जमिनीवर टॉवर नसलेल्या भागातून जात असेल किंवा मार्गक्रमण करत असेल, तेव्हा इंटरनेट मिळविण्यासाठी उपग्रह आधारित कनेक्टिव्हिटी उपयुक्त ठरते.
हेही वाचा : Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारने पहिल्यांदाच हिवाळ्यात चारधाम यात्रा का सुरू केली?
उड्डाणादरम्यान इंटरनेट कनेक्टिव्हिटी कशी मिळणार?
विमानाच्या केबिनमध्ये अनेक वाय-फाय अँटेना बसवलेले असतात, जे प्रवाशांच्या उपकरणांमधून सिग्नल प्राप्त करतात. हे सिग्नल विमानाच्या ऑन-बोर्ड सर्व्हरकडे पाठवले जातात. उपग्रह आधारित कनेक्टिव्हिटीमध्ये सिग्नल्स एका अँटेना मार्फत उपग्रहांपर्यंत जातात. या सिग्नलला उपग्रह जमिनीवरील टॉवर्सकडे पाठवते. उपग्रह-आधारित कनेक्टिव्हिटी आणि जमिनीवरील टॉवर्स या दोन्हीसाठी प्रक्रिया समान आहे. उपग्रह आधारित कनेक्टिव्हिटी सिस्टीममध्ये विमानामधील अँटेना उपग्रहाकडे सिग्नल पाठवतो. त्यानंतर हे सिग्नल जमिनीवर असलेल्या टॉवर्सबरोबर कनेक्ट होतात. त्यामुळे विमानात इंटरनेट कनेक्शन मिळण्यास मदत होते.
जमिनीवरील मोबाइल टॉवर्स तंत्रज्ञानामध्ये विमानाच्या खाली बसवलेल्या अँटेनाचा वापर करून सिग्नल थेट जमिनीवरील टॉवर्सवर पाठवले जातात. त्यानंतर हे टॉवर्स उपग्रहाकडे सिग्नल पाठवून इंटरनेट उपलब्ध करून देतात. विमानाच्या उड्डाणादरम्यान वाय-फाय इंटरनेटचा स्पीड जमिनीवरील इंटरनेटच्या स्पीडपेक्षा खूपच कमी असते. परंतु, नवीन तंत्रज्ञानामुळे परिस्थिती बदलत असून यापुढे विमानात अधिक चांगल्या स्पीडने इंटरनेट मिळण्याची शक्यता आहे.
विमान कंपन्यांसाठी तंत्रज्ञान किती महाग आहे?
विमानात अँटेना बसवण्याचा तसेच इंटरनेट सुरू करण्याचा खर्च विमान कंपन्यांनाच उचलावा लागतो. काही एअरलाइन्सचे असे मत आहे की, नवीन विमानांमध्ये हे उपकरण बसवणं अधिक सोपं जात आहे. जुने विमान अँटेना बसवण्यासाठी काही काळासाठी सेवेतून बाहेर केले जाणार आहे. एअर इंडियाने आपल्या जुन्या विमानांमध्ये सुधारणा करण्यासाठी जवळपास ४०० मिलियन डॉलरचा खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. महत्वाचं म्हणजे, एअर इंडिया ज्या विमानांमध्ये सध्या वाय-फाय सेवा सुरू करण्यात आली आहे. ती विमानं खूपच नवीन असून त्यात आधीच आवश्यक ती उपकरणे बसवण्यात आली आहे.
प्रवाशांना किती डेटा मोफत मिळणार?
जागतिक स्तरावरील अनेक विमान कंपन्यांनी प्रवाशांना उड्डाणादरम्यान इंटरनेट सुविधा पुरवण्याची सोय केली आहे. मात्र, यासाठी त्यांच्याकडून वेगवेगळे शुल्क आकारले जाते. सुरुवातीला काही वेळासाठी कंपन्यांकडून प्रवाशांना मोफत डेटा दिला जातो. डेटा पॅक खरेदी करण्याचे आवाहन केले जाते. या पॅकचे शुल्क खूपच महाग असते. काही विमान कंपन्या बिझनेस क्लास आणि फर्स्ट क्लासमधील प्रवाशांना मर्यादित किंवा अमर्याद इंटरनेट सेवा देतात.
सद्यस्थितीत एअर इंडियाकडून मर्यादित कालावधीसाठी प्रवाशांना मोफत इंटरनेट दिले जात आहे. इंटरनेट वापरण्याचे शुल्क कधीपासून आकारले जाईल याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आगामी काळात विमान प्रवासादरम्यान इंटरनेटची मागणी अधिकच वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच एअरलाइन कंपन्या याकडे कमाईचा स्रोत म्हणून पाहत आहेत. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी लागणारा खर्च जास्त आहे. त्यामुळे इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नजीकच्या कालावधीत मोफत इंटरनेट मिळण्याची शक्यता कमी आहे.