अमोल परांजपे
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांच्या चीन दौऱ्याची जगभरात चर्चा आहे. तब्बल पाच वर्षांनंतर अमेरिका सरकारमधील उच्चपदस्थ बीजिंगमध्ये गेल्याने या भेटीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले असतानाच या दौऱ्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ताणले गेलेले दोन्ही देशांचे संबंध सुधारणार का, याकडेही सर्वांचेच लक्ष आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित अमेरिका दौऱ्यापूर्वी ब्लिंकन आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भेटीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
अमेरिका-चीनमधील तणावाचे मुद्दे कोणते?
जगातील दोन महासत्ता असल्यामुळे चीन आणि अमेरिकेमध्ये आर्थिक आणि लष्करी स्पर्धा मोठी आहे. दोन्ही देशांच्या राजकीय परिस्थितीतही जमीन-अस्मानाचा फरक आहे. अमेरिका ही सर्वात जुनी लोकशाही आहे, तर चीनमध्ये एका पक्षाची सत्ता आहे. भांडवलदार विरुद्ध साम्यवादी असा विचारसरणीचाही फरक आहे. मात्र यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत ते भूराजकीय वादाचे मुद्दे. यातील सर्वात कळीचा विषय तैवानच्या स्वायत्ततेचा आहे. याखेरीज दक्षिण चीन समुद्रातील सत्तासंघर्ष, रशिया-युक्रेन युद्धामध्ये चीनची भूमिका, लष्करी पातळीवर संवाद नसणे आदी विषयही दोन्ही देशांमध्ये तणाव वाढविण्यास कारणीभूत ठरले आहेत. अलीकडेच चिनी बनावटीचा ‘हेरगिरी बलून’ अमेरिकेच्या आकाशात दिसल्यामुळे या तणावात भर पडली होती. या पार्श्वभूमीवर तब्बल पाच वर्षांनी दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय संवाद सुरू होणे महत्त्वाचे होते आणि ब्लिंकन यांच्या दौऱ्यामुळे त्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे.
ब्लिंकन यांच्या दौऱ्यात कुणाच्या गाठीभेटी?
आपल्या दोन दिवसांच्या बीजिंग दौऱ्यामध्ये अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनमधील त्यांचे समपदस्थ चिन गांग यांच्याशी तब्बल चार तास द्विपक्षीय चर्चा केली. यामध्ये तैवानसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या. ब्लिंकन यांनी दिलेल्या वॉशिंग्टन भेटीच्या आमंत्रणाचा गांग यांनीही स्वीकार केला. चीनचे वरिष्ठ मुत्सद्दी वांग यांच्याशीही तीन तास चर्चा केली. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ब्लिंकन आणि जिनपिंग यांची भेट होणार की नाही, हे स्पष्ट करण्यात आले नव्हते. ब्लिंकन यांना जिनपिंग भेट देणार का, हा अत्यंत कळीचा मुद्दा होता. कारण ही भेट काही कारणाने टळली असती तर द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने फारशी प्रगती झाली नसल्याचा संदेश गेला असता. मात्र अखेर जिनपिंग-ब्लिंकन यांची भेट झाल्यामुळे तणावाच्या काही मुद्द्यांवर तोडगा दृष्टिपथात आल्याचे मानले जात आहे.
ब्लिंकन यांच्या दौऱ्याचे फलित काय?
ब्लिंकन यांच्याशी सुमारे ३५ मिनिटे चर्चा केल्यानंतर वादाचे काही मुद्दे सोडविण्याच्या दिशेने प्रगती झाल्याचे जिनपिंग यांनी जाहीर केले. मात्र त्याच वेळी संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेकडून अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे, असा सूरही त्यांनी लावला. तर ब्लिंकन यांनी मायदेशी परतण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये वरिष्ठ पातळीवरील भेटीगाठी आणि संवाद कायम राखणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. युक्रेनविरोधी युद्धात रशियाला घातक शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणार नाही, असे आश्वासन चीनने दिल्याचा दावाही ब्लिंकन यांनी केला. मात्र चीनच्या आसपास असलेल्या हवाई आणि सागरी सीमांजवळ संघर्ष टाळण्यासाठी दोन्ही देशांत लष्करी पातळीवर संवाद सुरू व्हावा, ही ब्लिंकन यांची सूचना चीनने फेटाळून लावली. असे असले तरी नजिकच्या काळात जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या भेटीसाठी पार्श्वभूमी तयार करण्याचे काम ब्लिंकन यांनी केले आहे. दोन महासत्तांमध्ये कटुता आणि शस्त्रस्पर्धा असेल, तर जगाची घडी विस्कटण्याची कायमच भीती असते. त्यामुळेच अमेरिका-चीनमधील तणाव निवळणे महत्त्वाचे मानले जात आहे.
भारताच्या दृष्टीने दौरा किती महत्त्वाचा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला सरकारी अमेरिका दौरा सुरू होण्यापूर्वी ब्लिंकन यांनी बीजिंगमध्ये जाऊन दोन्ही शेजाऱ्यांबरोबरच्या संबंधांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. मात्र सध्यातरी साम्यवादी एकाधिकारशाही असलेल्या चीनपेक्षा लोकशाही असलेल्या भारतावर अमेरिकेचा विश्वास आहे. दक्षिण चीन समुद्रातील चिनी घुसखोरी रोखण्यासाठी प्रबळ भागीदार म्हणून अमेरिका भारताकडे बघत आहे. मोदी यांच्या दौऱ्यामध्ये अमेरिकेसोबत मोठे संरक्षणविषयक करार होण्याची शक्यता आहे. हिमालयीन सीमांवर भारत आणि चीनमध्ये सातत्यपूर्ण तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला ड्रोनसह अन्य महत्त्वाच्या सामरिक साहित्याचा व्यापार होणार आहे. भारत-अमेरिकेतील या संभाव्य करारांवर चीनने तीव्र प्रतिक्रिया देऊ नये, हादेखील ब्लिंकन यांच्या दौऱ्यामागचा उद्देश असू शकेल.
amol.paranjpe@expressindia.com