भारतीय संघाने गेली १२ वर्षे मायदेशात राखलेले साम्राज्य न्यूझीलंडने पूर्णपणे खालसा केले. या कालावधीत १८ कसोटी मालिकांत मिळून केवळ चार सामने गमावणाऱ्या भारतावर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत ०-३ अशी हार पत्करण्याची नामुष्की ओढवली. या सपशेल अपयशाने भारतासमोर बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे तारांकित फलंदाज आपली लय पूर्णपणे गमावून बसले आहेत. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि सर्फराज खान यांनी काही चांगल्या खेळी केल्या, पण त्यांच्या कामगिरीत सातत्य नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी बहुप्रतीक्षित बॉर्डर-गावस्कर करंडक मालिकेपूर्वी भारतीय संघाची चिंता वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

न्यूझीलंडविरुद्धचे अपयश बोचणारे का?

‘‘मायदेशातील कसोटी मालिका ०-३ अशा फरकाने गमावणे हे अपयश खूप बोचणारे आहे. मी याची पूर्ण जबाबदारी घेतो. कर्णधार म्हणून मी अपयशी ठरलोच, शिवाय फलंदाज म्हणूनही मला योगदान देता आले नाही,’’ असे वक्तव्य रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर केले. भारतीय संघ २०१२ सालानंतर मायदेशात वर्चस्व राखून होता. प्रतिस्पर्धी संघांना भारतात येऊन मालिकाच काय, तर कसोटी सामना जिंकणेही अवघड जात होते. तसेच भारताने आपल्या ९१ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात मायदेशातील तीन सामन्यांची कसोटी मालिका ०-३ अशी कधीही गमावली नव्हती. न्यूझीलंडने मात्र ही करामत करून दाखवली. त्यामुळे रोहितसह भारतीय संघाला हे अपयश पचवणे अवघड जात आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: ‘मेट्रो १’चे अधिग्रहण रद्द करण्यामागचे नेमके रहस्य काय?

फिरकीसमोर फलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट…

अलीकडच्या काळात डावखुऱ्या फिरकीपटूंनी भारताविरुद्ध यशस्वी कामगिरी केली आहे. फिरकीविरुद्ध खेळताना भारतीय फलंदाजांच्या मर्यादा या मालिकेत अधिक प्रखरपणे दिसून आल्या. या मालिकेपूर्वी न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरने आपल्या प्रथमश्रेणी कारकीर्दीत ६३ सामन्यांत केवळ एकदा डावात पाच बळी मिळवण्याची कामगिरी केली होती. मात्र, पुणे येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सँटनरने पहिल्या डावात सात, तर दुसऱ्या डावात सहा बळी मिळवून भारताची दाणादाण उडवली. पाठोपाठ मुंबईतील तिसऱ्या कसोटीत डावखुरा फिरकीपटूच असणाऱ्या एजाज पटेलने भारतीय फलंदाजांना निष्प्रभ केले. २०२१ मध्ये वानखेडे स्टेडियमवरील कसोटीत डावात सर्व १० गडी बाद करण्याची किमया साधणाऱ्या एजाजने या वेळी याच मैदानावर दोन डावांत मिळून ११ बळी मिळवले. सँटनर आणि एजाज यांच्या गोलंदाजीचे वैशिष्ट्य म्हणजे या दोघांनीही फारसे प्रयोग केले नाही. खेळपट्टीवरून चेंडूला फिरकी मिळत असल्याचे पाहून त्यांनी केवळ अचूक टप्पा राखण्याचा प्रयत्न केला. पुण्यात एका जागेवरून चेंडू कधी वळत होता, तर कधी सरळ येत होता. त्यामुळे भारतीय फलंदाज गोंधळले. मग मुंबईत लाल मातीच्या खेळपट्टीवर चेंडूला चांगली उसळी मिळत होते. उसळी आणि फिरकी या दोन्ही गोष्टी एकत्रित घडत असल्याने भारतीय फलंदाजांची तारांबळ उडाली.

रोहित, विराटची सुमार कामगिरी…

‘‘फलंदाजीतील आमची कामगिरी हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. या मालिकेत आमच्याकडून बऱ्याच चुका झाल्या. आता पुढे बघताना यात सुधारणा आवश्यक आहे,’’ असे रोहित तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर म्हणाला. विशेषत: त्याच्या आणि विराट कोहलीच्या निराशाजनक कामगिरीबाबतच्या प्रश्नाला रोहितने हे उत्तर दिले. भारताचे सर्वच फलंदाज कमीअधिक प्रमाणात अपयशी ठरले असले, तरी रोहित आणि विराट यांची कामगिरी सर्वांत चिंता वाढविणारी होती. न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेतील सहा डावांत विराटला ९३ धावा, तर रोहितला ९१ धावाच करता आल्या. बंगळूरु येथे झालेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात विराटने ७० आणि रोहितने ५२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर मात्र या दोघांची कामगिरी ढासळली. विराटमध्ये पूर्वीसारखी धावांची भूक दिसली नाही. मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात दिवसाची अखेरची काही मिनिटे शिल्लक असताना विराटने क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळ चेंडू मारून धाव काढण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला आणि तो धावचीत झाला. दुसरीकडे सर्वच कसोटीत रोहितमध्ये संयमाचा अभाव दिसून आला. तसेच वेगवान गोलंदाजांनी कधी उसळी घेणारे चेंडू टाकून त्याला पूलचा फटका मारणे भाग पाडले, तर कधी उजव्या यष्टिला धरून चेंडू टाकत अडचणीत आणले. ‘‘मी या मालिकेत खेळपट्टीवर फारसा वेळ घालवलाच नाही,’’ असे रोहितने कबूल केले. ऑस्ट्रेलियातील महत्त्वपूर्ण मालिकेपूर्वी हे दोघे लयीत नसणे हे भारताच्या दृष्टीने निश्चितच चांगले नाही.

हेही वाचा >>>शास्त्रज्ञांनी लावला पहिल्या ‘ब्लॅक होल ट्रिपल’चा शोध; यातून नेमकं काय उलगडणार?

युवकांमध्ये सातत्याचा अभाव…

सर्फराज खानने बंगळूरु कसोटीच्या दुसऱ्या डावात केलेली १५० धावांची खेळी अविस्मरणीय ठरली. मात्र, अन्य पाच डावांत मिळून तो केवळ २१ धावा करू शकला. विशेषत: मुंबई कसोटीत त्याने दाखवलेली हलगर्जी निश्चितपणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील फलंदाजाला साजेशी नव्हती. कसोटी संघात आपले स्थान अढळ करण्यासाठी त्याने अधिक जबाबदारीने खेळणे आवश्यक आहे. शुभमन गिलने मुंबईतील आव्हानात्मक खेळपट्टीवर पहिल्या डावात ९० धावांची शानदार खेळी केली. अन्य तीन डावांत त्याला ५४ धावाच करता आल्या. तसेच सलामीवीर यशस्वीला चांगल्या सुरुवातीचा फायदा करून घेता आला नाही. त्याने सहापैकी चार डावांत ३० धावांचा टप्पा ओलांडला, पण त्याला केवळ एकच अर्धशतक करता आले. मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात सगळे सुरळीत सुरू असताना अचानक जैस्वालने रीव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा निर्णय घेतला. त्याला चेंडू मारता आला नाही आणि त्याने यष्टी गमावल्या. त्यानंतर भारताची पडझड झाली. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये दाखवलेली शतकांची भूक जैस्वालने आंतरराष्ट्रीय स्तरावरही दाखवणे गरजेचे आहे. ऋषभ पंतने मात्र आपले वेगळेपण पुन्हा सिद्ध करताना सहा डावांत तीन अर्धशतके साकारली. आता ऑस्ट्रेलियातही त्याची भूमिका निर्णायक ठरेल.

ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी कितपत सज्ज?

न्यूझीलंडविरुद्धचे सपशेल अपयश भारतीय संघाच्या जिव्हारी लागल्याचे सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरून आणि रोहितच्या वक्तव्यांवरून स्पष्टपणे जाणवत होते. आता या दारूण पराभवामुळे भारतीय खेळाडू खडाडून जागे तरी होतील किंवा आत्मविश्वास गमावतील. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवून कसोटी मालिका जिंकण्याचा अनुभव भारताच्या गाठीशी आहे. भारताने हे एकदा नव्हे, तर सलग दोन वेळा करून दाखवले आहे. आता पुन्हा ऑस्ट्रेलियात यश मिळवायचे झाल्यास सर्वच भारतीय फलंदाजांनी आपल्या क्षमतेवर विश्वास राखणे आणि निडरपणे खेळणे आवश्यक आहे. गौतम गंभीरची प्रशिक्षकपदी निवड झाल्यापासून भारतीय संघ कसोटीतही अतिशय आक्रमक शैलीत फलंदाजी करत आहे. मात्र, सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळात बदल करणेही आवश्यक आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत हे दिसून आले नाही. आता फलंदाजांनी अधिक जबाबदारीने खेळ न केल्यास भारताच्या हातून बॉर्डर-गावस्कर करंडकही निसटण्याचा धोका आहे.