Monkeypox India आफ्रिका आणि युरोपमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्सला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केले आहे. भारतीयांनाही या आजाराची चिंता सतावत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारे आवश्यक पावले उचलत आहेत. जागतिक स्वास्थ्य आणीबाणीची घोषणा झाल्यापासून उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत आणि विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
या शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आरोग्य मंत्रालय, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)मधील अधिकाऱ्यांसह खबरदारीच्या उपायांसाठी बैठक घेतली. जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिल्याने, भारतात विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे का? भारत त्यासाठी सज्ज आहे का? याविषयी जाणून घेऊ.
हेही वाचा : 26/11 Mumbai Terror Attack: हल्ल्यातील प्रमुख आरोपीचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण? कोण आहे तहव्वूर राणा?
भारतात मंकीपॉक्सची साथ कधी आली?
२०२२ मध्ये केरळमध्ये मंकीपॉक्सचे पहिले प्रकरण नोंदवण्यात आले होते. तेव्हा अबुधाबीमधील एका प्रवाशाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर लगेचच हा विषाणू देशभरात पसरला आणि आंतरराष्ट्रीय प्रवास न केलेल्या दिल्लीमधील व्यक्तींमध्येही याची चाचणी पॉझिटिव्ह आली. मंकीपॉक्सचे (एमपॉक्स) क्लेड I आणि क्लेड II असे दोन स्ट्रेन आहेत. क्लेड I गंभीर आहे आणि क्लेड II कमी प्राणघातक आहे. २०२२ मध्ये जगभरात क्लेड II चा उद्रेक पाहायला मिळाला होता. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, त्या वर्षी भारतात २७ प्रकरणे नोंदविण्यात आली होती आणि एका मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मागील वर्षी २४ जुलैपर्यंत, केरळमध्ये १२ आणि दिल्लीत १५ अशा एकूण प्रकरणांची संख्या ३१ वर पोहोचली होती. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतातील नवीन प्रकरणे यावर्षी मार्चमध्ये केरळ येथे नोंदविण्यात आली होती. आतापर्यंत १०० हून अधिक देशांमध्ये या विषाणूचा प्रसार झाला आहे. मात्र, अद्याप भारतात याचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. परंतु, आयएचआर आपत्कालीन समितीचे अध्यक्ष प्रोफेसर डिमी ओगोइना यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “आफ्रिकेतील काही भागांमध्ये एमपॉक्सची सध्याची वाढ बघता ही एक आणीबाणी आहे. आफ्रिकेसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी.” ते पुढे म्हणाले, “एमपॉक्स आफ्रिकेत उगम पावला, तिथे या विषाणूकडे दुर्लक्ष केले गेले आणि नंतर २०२२ मध्ये जागतिक उद्रेक झाला. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी निर्णायकपणे कार्य करण्याची गरज आहे.”
भारत यासाठी कोणत्या उपाययोजना करत आहे?
एमपॉक्सचा जागतिक उद्रेक पाहता भारत प्रतिबंधात्मक उपाय वाढवत आहे. आरोग्य मंत्रालयाने विमानतळ आणि बंदर यांसारख्या प्रमुख प्रवेश स्थळांवर मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, त्यांना सतर्क राहण्याची आणि संशयित प्रकरणे योग्यरीत्या व्यवस्थापित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तामिळनाडूमध्ये सार्वजनिक आरोग्य आणि प्रतिबंधात्मक औषध संचालनालयाने (DPH) आधीच सतर्कता वाढवली आहे. विमानतळ आरोग्य अधिकारी आणि बंदर आरोग्य अधिकारी काँगो आणि मध्य आफ्रिकन देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष केंद्रित करून आहेत.
हैदराबाद आणि नवी दिल्ली या दोन शहरांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या आफ्रिकन विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. त्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य संचालक टीएस सेल्वाविनायगम यांनी चेन्नई, तिरुची, मदुराई आणि कोईम्बतूर येथील जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना एमपॉक्सची लक्षणे ओळखून कडक थर्मल स्क्रीनिंग करण्याचे आणि गेल्या २१ दिवसांच्या प्रवासाची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
स्मॉलपॉक्स प्रतिबंधक लस?
एमपॉक्सला लक्ष्य करणारी कोणतीही लस नसली तरी स्मॉलपॉक्स (कांजण्या) आणि चिकनपॉक्ससाठी अस्तित्वात असलेल्या लसी भारतात या विषाणूचा प्रसार कमी करू शकतात. गुरुग्राममधील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील अंतर्गत औषधाचे वरिष्ठ संचालक डॉ. सतीश कौल यांच्या मते, या लसी एमपॉक्स विरुद्ध प्रभावी ठरू शकतात. कारण स्मॉलपॉक्स आणि एमपॉक्स विषाणू यांचा जवळचा संबंध आहे, असे त्यांनी ‘बिझनेस स्टँडर्ड’ला सांगितले. दोन्ही विषाणू एकाच वंशाचे असल्याने या लसीद्वारे एमपॉक्सला रोखण्यात मदत होऊ शकते.
भारतात मुलांना १२ ते १५ महिन्यांच्यादरम्यान कांजण्यांविरुद्ध व्हेरिसेला लस दिली जाते. यात चार ते सहा वयोगटासाठी बूस्टर डोसचाही समावेश आहे. “स्मॉलपॉक्ससाठी लसीकरण केलेल्यांना एमपॉक्सशी लढण्यात प्रतिकारशक्ती मिळते, त्यामुळे ४४ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक संरक्षित आहेत,” असे एड्स सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. ईश्वर गिलाडा यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. लस निर्मितीवर जोर देणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. २०२२ मध्ये आयसीएमआर संशोधकांनी मंकीपॉक्स स्ट्रेन वेगळे केल्यानंतर, औषध कंपन्या आणि डायग्नोस्टिक किट उत्पादकांना व्हायरससाठी लस आणि चाचणी किट विकसित करण्याचे आवाहन केले. एका शास्त्रज्ञाने ‘लीव्हमिंट’ला माहिती दिली, “भारतीय सीरम इन्स्टिट्यूट एका एमपॉक्स लसीवर काम करत आहे.
भारताला एमपॉक्सचा धोका किती?
एमपॉक्स प्रादुर्भावामुळे जानेवारी २०२३ पासून २७ हजार प्रकरणे आणि १,१०० हून अधिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. प्रामुख्याने याचा मुलांवर परिणाम झाला आहे. १५ ऑगस्ट रोजी जागतिक आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वीडनमध्ये एमपॉक्सच्या नवीन स्ट्रेनच्या उपस्थितीविषयी सांगितले. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतात एमपॉक्स विषाणूची तीन प्रकरणे समोर आल्याने भारतात तणाव वाढत आहे. परंतु, तज्ज्ञ सूचित करतात की, भारतात एमपॉक्स संसर्गामध्ये लक्षणीय वाढ होण्याचा धोका कमी आहे. “याक्षणी, भारतामध्ये मंकीपॉक्सच्या संसर्गामध्ये वाढ होण्याचा धोका खूप कमी आहे आणि घाबरण्याची गरज नाही,” असे एका सूत्राने पीटीआयला सांगितले आहे.
हेही वाचा : केशरी ते बसंती: पवित्र निशान साहिबचा रंग का बदलला? जाणून घ्या रंगाभोवतीचा इतिहास आणि राजकारण
पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) मधील एका शास्त्रज्ञाने ‘लाइव्हमिंट’ला सांगितले की, “पूर्व काँगोमध्ये आढळणारा नवीन एमपॉक्स स्ट्रेन सध्या भारतात नाही. मंकीपॉक्सची मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत आणि आम्ही सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांवर भर देत आहोत. या टप्प्यावर घाबरण्यासारखे काही नाही. आयसीएमआर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे,” असेही त्यांनी सांगितले.