तेल उत्पादन कमी करण्यासंदर्भात ओपेक आणि रशियामध्ये एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे नव्या दर युद्धाची सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये तब्बल ३० टक्के घसरण झाली आहे. सौदी अरेबिया रशियाची कोंडी करण्यासाठी तेलाचे उत्पादन वाढवून किंमती कमी करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये तेलाचे दर आणखी पडतील. याचा फायदा भारतासह अन्य देशांना होईल.
ब्रेन्ट क्रूड ऑइलच्या प्रति तेल पिंपाची किंमत ३१.२३ डॉलर आहे. फेब्रुवारी २०१६ नंतरचे हे सर्वात कमी दर आहेत. १९९१ साली आखातामध्ये झालेल्या युद्धानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात इतकी मोठी घसरण झाली आहे. जागतिक बाजारात तेलाच्या दरात घसरण होत असल्यामुळे भारतातही पेट्रोल-डिझेल स्वस्त होत आहे.
पुढच्या काही दिवसात तेल कंपन्यांनी हे दर आणखी कमी करावेत, अशी बाजाराची अपेक्षा आहे. मोठया प्रमाणावर तेलाची आयात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. भारतात सध्या मंदीसदृश्य स्थिती आहे. या परिस्थितीमुळे भारताचा पैसा मोठया प्रमाणात वाचणार असून आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.
सलग चौथ्या दिवशी घसरण
पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग चौथ्या दिवशी कमी झाले आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार प्रतिलिटर पेट्रोल २४ पैशांनी तर डिझेल २६ पैशांनी स्वस्त झाले आहे.
मुंबईत प्रति लिटर डिझेलचा दर ६६.२४ पैसे तर दिल्लीत ६३.२६ पैसे आहे. मुंबईत प्रति लिटर पेट्रोल ७६.२९ पैसे तर दिल्लीत ७०.५९ पैसे आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील किंमतींनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये रोज बदल होत असतात.