अमेरिका आणि जपानमधील आर्थिक घडामोडींनी जगभरातील भांडवली बाजारांमध्ये गुंतवणूकदारांनी तुफान समभाग विक्रीचा मारा केला. परिणामी देशांतर्गत भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी २.५ टक्क्यांहून अधिक कोसळले. यामागची नेमकी कारणे काय आहेत, याचा वेध.
पडझडीत किती नुकसान?
सोमवारच्या सत्रातील पडझडीने गुंतवणूकदारांचे सुमारे १७ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. सेन्सेक्समध्ये २६०० अंशांची घसरण झाली आहे. तर निफ्टीने २४,००० अशांची पातळी मोडत २३,८९३ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. परिणामी मुंबई शेअर बाजारातील सुचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल सुमारे १७ लाख कोटींनी घसरून ४४०.१६ लाख कोटींपर्यंत खाली आले आहे.
अमेरिकेत मंदीचे वारे…
अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात अध्यक्षीय निवडणूक होत आहे. त्याआधीच अमेरिकेत आता मंदीची चर्चा सुरू झाली आहे. कारण अमेरिकेत मंदीची भीती शुक्रवारी बाजारानंतरच्या काही तासाने प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीने व्यक्त केली. जुलैमध्ये नोकरीची वाढ अपेक्षेपेक्षा जास्त मंदावली आहे. ‘साहम रिसेशन इंडिकेटर’ हा मंदीचा सूचकांक ०.५ टक्क्यांच्या पुढे पोहोचला आहे. अमेरिकेत जुलैमध्ये नोकऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या मासिक सरासरी २,१५,००० नोकऱ्यांच्या तुलनेत यंदा केवळ १,१४,००० रोजगार संधी निदर्शनास आल्या. याव्यतिरिक्त, बेरोजगारी ऑक्टोबर २०२१ पासूनच्या उच्चांकी पातळीवर म्हणजे ४.३ टक्क्यांवर पोहोचली आहे.
बँक ऑफ जपानचे धोरणदेखील कारणीभूत?
केवळ अमेरिकीतील मंदीची स्थिती घसरणीला जबाबदार नसून जपानच्या मध्यवर्ती बँकेचे धोरणदेखील पडझडीला कारणीभूत ठरले आहे. जपानने गेल्या बुधवारी मुख्य व्याजदरात वाढ केली. २००७ मध्ये बँक ऑफ जपानने व्याजदरात वाढ केली होती. आता १७ वर्षानंतर व्याजदर वाढवले आहेत. ते उणे ०.१ वरून आता ० ते ०.१ करण्यात आले आहे. तेव्हापासून तेथील भांडवली बाजाराचा निर्देशांक निक्केईमध्ये घसरण कायम आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत जपानी येन मजबूत करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने हे पाऊल उचलले. मात्र कमी व्याजदराचा परिणाम म्हणून, जपानी येनचा वापर “कॅरी ट्रेड” नावाच्या परदेशी मुद्रा धोरणासाठी केला गेला. यासाठी येनमध्ये कर्ज घेणे आणि जास्त उत्पन्न परतावा मिळणाऱ्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक होते. मात्र, बँक ऑफ जपानने व्याजदर वाढवल्यामुळे, हे धोरण अनुसारणाऱ्या परदेशी चलन व्यापाऱ्यांना तोटा होऊ शकतो, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत आणखी गोंधळ निर्माण होण्याची भीती आहे.
हेही वाचा >>>२०२४ च्या अर्थसंकल्पानंतर मध्यमवर्गीयांवर कराचा भार वाढला; यासंदर्भात मध्ययुगीन भारतीय इतिहास काय सांगतो?
इराण-इस्रायलमधीव तणाव कसा कारणीभूत?
इराण, हमास आणि हेजबोला या तिघांनी आता इस्रायलने हमास आणि हेजबोलाच्या लष्करी प्रमुखाच्या हत्या केल्याचा बदला घेण्याचे जाहीर केल्याने पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील वाढत्या तणावामुळे खनिज तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता आहे. मात्र, तेलाची जागतिक मागणी कमी असल्याने खनिज तेलाच्या किमती सध्या ८ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत. बाजार पडझाडीला हा भू-राजकीय तणावदेखील एक कारणीभूत घटक आहे.
देशांतर्गत कोणते घटक कारणीभूत?
विद्यमान आठवड्यात रिझर्व्ह बँकेची पतधोरणाची बैठक पार पडणार आहे. मात्र खाद्यपदार्थांमधील वाढत्या महागाईने चिंता वाढवली आहे. यामुळे यावेळेस देखील रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे राखले जाण्याची शक्यता आहे. शिवाय सरलेल्या जून तिमाहीत बहुतेक कंपन्यांची तिमाही कामगिरी निराशाजनक राहिली. निफ्टी फिफ्टी निर्देशांकातील ५० कंपन्यांपैकी ३० कंपन्यांच्या नफ्यात घसरण झाली आहे. निर्देशांकात सर्वाधिक वजन राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक आणि इतर कंपन्यांच्या नफ्यात गेल्या तिमाहीच्या तुलनेत वाढ मंदावली आहे.
इंडिया व्हीआयएक्स निर्देशांकाचा संकेत…
इंडिया व्हीआयएक्स हा भांडवली बाजारातील अस्थिरता मोजणारा एक निर्देशांक आहे, जो राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईद्वारे गणला जातो. निर्देशांकाचा उपयोग नजीकच्या कालावधीतील अस्थिरता आणि बाजारातील चढ-उतारांसाठी शक्यता मोजण्यासाठी केला जाते. तो सोमवारच्या सत्रात ९ वर्षांच्या उच्चांकी पोहोचला आहे. व्हीआयएक्स निर्देशांक एका सत्रात २२ गुणांकावरून थेट ५२ गुणांकावर पोहोचला आहे. यावरून लक्षात येईल की बाजारात अस्थिरता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.व्हीआयएक्सला सध्या चालना देणारे प्राथमिक घटक सध्या अमेरिकेतील मंदीचे वारे, जपानमधील मध्यवर्ती बँकेचे वाढलेले व्याजदर आणि भौगोलिक-राजकीय तणाव हे आहेत.