राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांची संख्या शंभरावर गेली आहे. सर्वाधिक रुग्ण पुण्यात असून, रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जीबीएस रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताणही वाढत आहे. एकूण रुग्णांपैकी निम्म्या रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यामुळे अनेक सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये सध्या अतिदक्षता विभागात रुग्णशय्या उपलब्ध नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याच वेळी या आजारावरील उपचार खर्चिक असल्याने रुग्णांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण होत आहे. केंद्र सरकारनेही रुग्णसंख्या वाढल्याने उच्चस्तरीय पथक नेमण्याचे पाऊल उचलले आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत मोफत वाचा

विहिरीतील दूषित पाणी कारणीभूत?

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सिंहगड रस्ता भागात जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सिंहगड रस्त्यावर नांदेड परिसरातील विहिरीतून पाणीपुरवठा होत असलेल्या भागात ८० टक्के रुग्ण आढळून आले आहेत. विहिरीवर आच्छादन नसल्याने अथवा अन्य मार्गाने पाणी दूषित झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विहिरीतील दूषित पाण्यामुळे जीवाणू आणि विषाणूसंसर्ग होऊन त्यातून जीबीएसचे रुग्ण वाढल्याचे निदर्शनास येत आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही या विहिरीतील दूषित पाण्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याकडे लक्ष वेधले आहे.

एनआयव्हीचा निष्कर्ष काय?

रुग्णांचे शौच, रक्त आणि लघवी नमुने आरोग्य विभागातर्फे तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात येत आहेत. ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आलेल्या २३ रक्त नमुन्यांमध्ये डेंग्यू, चिकुनगुन्या आणि झिका संसर्ग आढळून आलेला नाही. ‘एनआयव्ही’कडे ७३ रुग्णांचे शौचनमुने पाठविण्यात आले. त्यात १२ नमुन्यांमध्ये नोरोव्हायरस हा विषाणूसंसर्ग आणि ३ नमुन्यांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणूसंसर्ग आढळला असून, १९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. अद्याप ३९ नमुन्यांची तपासणी पूर्ण झालेली नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

उपचाराचा खर्च किती?

जीबीएसच्या रुग्णांवरील उपचार महागडे आहेत. पुण्यातील या आजाराचे बहुतेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या उपचारांचा खर्च सुमारे ५ लाख रुपये आहे. राज्य सरकारच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून या आजारावरील उपचारासाठी २ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जात आहेत. याचबरोबर महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतूनही २ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत होणार आहेत. मात्र, उपचाराचा खर्च जास्त असल्याने उरलेला खर्च कसा करावयाचा, असा प्रश्न रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसमोर उपस्थित झाला आहे.

सर्वेक्षणावर किती भर?

पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून बाधित भागांमध्ये तातडीने रुग्ण सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ‘जीबीएस’ची लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णांचा शोध आरोग्य विभागाची पथके घेत आहेत. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून ६४ हजार २३६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. महापालिका आणि आरोग्य विभागाने ८६ पथके यासाठी तैनात करण्यात आली आहेत.

पाणी पिण्यास अयोग्य?

आरोग्य विभागाने सिंहगड रस्ता परिसरातील २१ पाणी नमुने राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यातील ३ पिण्यायोग्य, ३ पिण्यास अयोग्य होते, तर १५ पाणी नमुन्यांचा तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने १८३ पाणी नमुने त्यांच्याच प्रयोगशाळेत तपासले. त्यातील १८२ नमुने पिण्यायोग्य आणि केवळ १ नमुना पिण्यास अयोग्य आढळला आहे. तसेच, अन्न व औषध प्रशासनाकडून परिसरातून खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे.

आतापर्यंत किती मृत्यू?

‘जीबीएस’मुळे एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ते मूळचे धायरीतील होते. ते १३ जानेवारीला सोलापूरला गेले होते. त्यांना गिळण्यास त्रास होत होता आणि पायामध्ये अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांना १८ जानेवारीला सोलापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ५ दिवसांत २५ इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन देण्यात आली. त्यांना २५ जानेवारीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान त्याच दिवशी मृत्यू झाला.

केंद्रीय पथक काय करणार?

पुणे परिसरात रुग्णांच्या संख्येतील वाढ लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उच्चस्तरीय पथक नेमले आहे. हे पथक सार्वजनिक आरोग्य उपाययोजना आणि व्यवस्थापनात राज्याच्या आरोग्य विभागाला मदत करीत आहे. केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (दिल्ली), निम्हान्स (बंगळुरू), पुण्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्था (एनआयव्ही) या संस्थांमधील सात तज्ज्ञांचा समावेश आहे. ‘एनआयव्ही’चे तीन तज्ज्ञ आधीच स्थानिक प्रशासनाला मदत करीत असून, आता केंद्रीय पथकही दाखल झाले आहे. या पथकाने राज्याच्या आरोग्य विभागासोबत बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

sanjay.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How is the number of guillain barr syndrome patients increasing in the maharashtra state print exp amy