सोनं आणि सोन्याचे दागिने यांना आपल्या देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे प्रत्येक सणाला, लग्नसराई तसेच इतर विशेष प्रसंगांना सोन्याचे दागिने बनवणे किंवा सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. काही दिवसातच दसरा हा सण येणार आहे. या दिवशीही लोकं मोठ्या संख्येने सोने खरेदी करतात. भारतातील सण सोन्याशिवाय अपूर्णच! काळ बदलला असला तरीही सोन्याचे महत्त्व कमी झालेले नाही. संकटकाळात मदतीला येणारी गोष्ट म्हणूनही याकडे पाहिले जाते. म्हणूनच आज २४ कॅरेटच्या एक तोळे सोन्याच्या भाव ५० हजारांच्या वर असला तरीही प्रत्येक भारतीय आपल्या कुवतीप्रमाणे सोने खरेदी करतोच.
भारत हा सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील त्याच्या किमतीत अगदी किंचित वाढ झाल्याने भारतातील सोन्याच्या किंमतीवर मोठा परिणाम होतो. मात्र सोन्याची किंमत नेमकी कोणत्या आधारावर ठरते किंवा असे कोणते घटक आहेत जे सोन्याच्या किमतीवर प्रभाव पाडतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
सोन्याचे मूल्य हे जवळजवळ स्थिर आणि चलनाच्या तुलनेत अधिक असते. याचा वापर कठीण काळात महागाईपासून वाचण्यासाठी केला जातो. म्हणूनच बहुसंख्य गुंतवणूकदरांचा चलनाऐवजी सोने खरेदीकडे कल अधिक असतो. याचाच परिणाम असा की जेव्हा महागाई वाढते, तेव्हा सोन्याची मागणीही वाढते. अशा परिस्थितीत सोन्याची किंमत वाढते आणि त्याची मागणीही. कोणत्याही राजकीय उलथापालथीच्या वेळी चलन आणि इतर अनेक आर्थिक उत्पादनांचे मूल्य कमी होऊ शकते, त्यामुळे गुंतवणूकदारांकडून सोने हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो आणि त्याशिवाय शांततापूर्ण काळाच्या तुलनेत राजकीय अराजकतेच्या काळात सोन्याची मागणी आणि किंमत वाढते.
अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांमध्ये चलन तसेच सोन्याचा साठा आहे. जेव्हा जेव्हा मोठ्या देशांच्या मध्यवर्ती बँकेकडे सोन्याचा साठा ठेवण्यास सुरुवात होते तेव्हा त्याची किंमत वाढते. याचे कारण म्हणजे, बाजारात रोखीचा प्रवाह वाढतो आणि सोन्याचा पुरवठा कमी होतो. जागतिक हालचालींमध्ये कोणताही बदल झाल्यास त्याचा थेट परिणाम भारतातील सोन्याच्या किमतीवर पडतो. याचं मुख्य कारण म्हणजे भारत हा सोन्याच्या सर्वांत मोठ्या आयातदारांपैकी एक आहे. एखाद्या जागतिक घडामोडीमुळे आयातीच्या किमतींमध्ये चढ-उतार होतात, परिणामी भारतातील किमतींमध्येही हा बदल दिसून येतो.
आर्थिक उत्पादने आणि सेवांवरील व्याजदराचा सोन्याच्या मागणीशी जवळचा संबंध आहे. सध्याच्या सोन्याच्या किमती कोणत्याही देशाच्या व्याजदराच्या ट्रेंडचे विश्वसनीय सूचक मानल्या जातात. जास्त व्याजदराने, ग्राहक रोखीच्या मोबदल्यात सोने विकतात आणि सोन्याचा जास्त पुरवठा झाल्यामुळे त्याचे दर कमी होतात. दुसरीकडे, कमी व्याजदर ग्राहकांकडे अधिक रोखीत रूपांतरित होतात आणि सोन्याची मागणी जास्त होते आणि त्यामुळे त्याची किंमत वाढते.
सण आणि लग्नसमारंभात सोन्याचे दागिने खरेदी करणे ही भारतातील पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे. अशा प्रकारे, लग्नाच्या हंगामात आणि दिवाळीसारख्या सणांमध्ये, ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे सोन्याचे भाव वाढतात. मोठ्या मागणीमुळे भारताला वेळोवेळी मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करावी लागते. देशातील सोन्याच्या एकूण मागणीपैकी १२ टक्के सोन्याची औद्योगिक मागणी आहे.
वर नमूद केलेल्या घटकांव्यतिरिक्त सोन्याचे उत्पादन आणि त्याचा उत्पादन खर्च यासारखे इतर काही घटक आहेत जे या सोन्याच्या किंमतीवर परिणाम करतात. परंतु सोन्याच्या दरावर परिणाम करणारे कितीही घटक समोर आले तरी शेवटी ते सर्व मागणी-पुरवठा घटकावर अवलंबून असतात.
सोन्याची किंमत ठरवणारे घटक कोणते?
महागाई, सरकारचा सोन्याचा साठा, जागतिक ट्रेंड, व्याजदर आणि दागिन्यांची बाजारपेठ सोन्याची किंमत ठरवते.
अर्थव्यवस्थेसाठी सोनं इतकं महत्त्वाचं का?
सोने हे देशाची अर्थव्यवस्था सुदृढ आहे की नाही याचे निर्देशक सूचक आहे. ज्या देशामध्ये सोन्याची किंमत जास्त असते, तेथील अर्थव्यवस्था कमकुवत असते. याउलट ज्या देशात ही किंमत कमी असते, त्याची अर्थव्यवस्था बळकट असते.
सरकारच्या सोन्याच्या साठ्याचा सोन्याच्या किमतीवर कसा परिणाम होतो?
जर मध्यवर्ती बँकेने सोन्याचा साथ करण्यास सुरुवात केली तर सोन्याची किंमत आपोआप वाढते, कारण सोन्याचा पुरवठा कमी होतो आणि राखीव रोख वाढते.
जागतिक संकटाचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो का?
जर लोकांनी सरकार किंवा वित्तीय बाजारांवर विश्वासाची कमतरता दर्शविली तर सोन्याचे भाव अपरिहार्यपणे वाढतात. म्हणूनच सोन्याला संकटकाळात मदतीला येणारी गोष्ट म्हणूनही संबोधले जाते.