जगातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा परिणाम आपल्या जीवनावर होताना दिसत आहे. चीन, जपानसह अनेक देश तंत्रज्ञानाच्या प्रगतिपथावर आहेत. जपानने नुकताच या प्रगतीचा पुरावा जगाला दिला आहे. चक्क सहा तासांत जपानने एक रेल्वेस्थानक तयार केले आहे. जपानमधील एक प्रमुख रेल्वे ऑपरेटर कंपनी असलेल्या वेस्ट जपान रेल्वे कंपनीने गेल्या महिन्याच्या अखेरीस 3D-प्रिंटेड रेल्वेस्थानकाचे उद्घाटन केले आहे. त्यांनी हे जगातील पहिले रेल्वेस्थानक असल्याचा दावा केला आहे.
जपानमधील अरिदा शहरात असणाऱ्या नवीन स्थानकाचे घटक 3D-प्रिंटेड होते आणि ते सहा तासांपेक्षा कमी वेळात साइटवर जोडले गेले. १९४८ मध्ये तयार करण्यात आलेल्या लाकडी संकुलाची जागा आता या नवीन रेल्वेस्थानकाने घेतली आहे, ज्याला हातसुशिमा असे नाव देण्यात आले आहे. या रेल्वेस्थानकाला एकच मार्ग आहे. एका तासात या मार्गावरून एक ते तीन वेळा रेल्वे गाड्या जातील आणि दिवसाला अंदाजे ५३० प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज आहे. हे नवीन स्थानक सहा तासांत कसे बांधले गेले? 3D-प्रिंटेड रेल्वेस्थानक म्हणजे नक्की काय? जाणून घेऊ.
नवीन रेल्वेस्थानक कसे बांधले गेले?
पश्चिम जपान रेल्वे कंपनीने नवीन रेल्वेस्थानक बांधण्यासाठी सेरेंडिक्स या बांधकाम कंपनीला काम सोपवले होते. सेरेंडिक्स कंपनीच्या मते, या सुट्या भागांच्या छपाईसाठी आणि त्यांना काँक्रीटने मजबूत करण्यासाठी कंपनीला सात दिवस लागले. या छपाईचे काम जपानच्या नैऋत्येला असणाऱ्या क्युशू बेटावरील कुमामोटो प्रीफेक्चरमधील एका कारखान्यात करण्यात आले. २४ मार्चला सकाळी हे भाग कारखान्यातून स्थानकाच्या दिशेने निघाले. हे अंतर सुमारे ८०४ किलोमीटर होते. हात्सुशिमा स्थानक हे जपानच्या इशान्येला असून, या स्थानकावर सगळे भाग पोहोचवण्यात आले.
सेरेंडिक्सचे सह-संस्थापक कुनिहिरो हांडा यांनी सांगितले, “सामान्यत: दररोज रात्रीच्या वेळेत गाड्या रुळावरून जात नाही, तेव्हा हे काम केले जाते, त्यामुळे काम अनेक महिन्यांपर्यंत चालते. व्यावसायिक मार्गांजवळील बांधकामाच्या कामात अनेक निर्बंध असतात आणि काम सुलभरित्या सुरू राहावे म्हणून रात्रीच्या वेळेत केले जाते. मार्च महिन्याच्या अखेरच्या मंगळवारी रात्री 3D-प्रिंटेड भाग ट्रकद्वारे रेल्वेस्थानकाच्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी पहिल्यांदाच अशा स्वरूपाचे काम होत असल्यामुळे अनेक रहिवासी काम पाहण्यासाठी जमले होते. त्यानंतर रात्री ११.५७ ला अखेरची रेल्वे निघाली आणि नवीन स्थानक तयार करण्याचे काम सुरू झाले.
सहा तासांपेक्षा कमी वेळात एका विशेष मोर्टारपासून (ही एक कार्यक्षम असते जी दगड, विटा किंवा फरश्यांना एकत्र जोडणीसाठी) वापरली जाते. हे 3D-प्रिंटेड भाग तयार करण्यात आले होते, अखेर हे भाग एकत्र करण्यात आले. प्रत्येक भाग उचलण्यासाठी कामगारांनी मोठ्या क्रेनचा वापर केला. १०० चौरस फुटांपेक्षा मोठे असणारे हे रेल्वेस्थानक सकाळी पहिली रेल्वे येण्यापूर्वी ५.४५ वाजता पूर्ण झाले. मात्र, अजूनही या रेल्वेस्थानकाचे काम आतून पूर्ण करण्याची गरज आहे.
याबरोबरच तिकीटच्या मशीन आणि वाहतूक कार्ड रीडर उपकरणेदेखील बसवली गेलेली नाहीत. वेस्ट जपान रेल्वे कंपनीने सांगितले आहे की, जुलैमध्ये ही नवीन इमारत लोकांच्या वापरासाठी खुली केली जाणार आहे आणि या स्थानकावरून लोकांना प्रवास करणे शक्य होणार आहे. मुख्य म्हणजे, जर साधारण रेल्वेस्थानक बांधायचे असते तर त्यासाठी दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला असता आणि खर्चही दुप्पट आला असता, असे कंपनीने म्हटले आहे.
3D-प्रिंटेड स्थानक महत्त्वाचे का आहे?
जपानमध्ये वृद्ध नागरिकांची संख्या वाढत आहे. परिणामी तेथील कर्मचारी वर्गाची संख्या कमी झाली आहे, त्यामुळेच जुन्या स्थानकांच्या इमारतींची देखभाल, तेथील पायाभूत सुविधा सुव्यवस्थित करणे, या बाबी रेल्वे अधिकाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे की, हे नवीन 3D-प्रिंटेड स्थानक नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल आणि कमी कामगार असतानाही म्हणजे अगदी दुर्गम ठिकाणीही सर्व सुविधा कशा सुव्यवस्थित ठेवता येईल, ही समस्या सोडवेल अशी आशा आहे. “ही वस्तुस्थिती आहे की, या नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज असणाऱ्या रेल्वेस्थानकामुळे कामगारांची संख्या कमी करण्यास आम्हाला मदत होईल,” असे वेस्ट जपान रेल्वे कंपनीच्या व्हेंचर कॅपिटल युनिट जेआर ‘वेस्ट इनोव्हेशन्स’चे अध्यक्ष कावामोटो यांनी सांगितले.