भारतात गिधाडांच्या मृत्यूचा प्रश्न काही काळापासून चिंताजनक ठरत आहे. १९९० च्या दशकाच्या मध्यात कोटींच्या घरात असणारी या पक्ष्यांची लोकसंख्या आता जवळपास शून्यावर आली आहे. त्यामुळे पर्यावरणासाठी ही एक धोक्याची घंटा आहे. परंतु, गिधाडांच्या मृत्यूचे इतरही अनपेक्षित परिणाम झाले आहेत. एका नवीन अभ्यासानुसार, गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे भारतात पाच लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. लक्षणीयरीत्या गिधाडांची संख्या कमी होण्याचे कारण काय? त्यामुळे पाच लाख लोकांचा मृत्यू कसा झाला? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

गिधाडांच्या संख्येत लक्षणीय घट

बीबीसीच्या मते, १९९० च्या दशकात भारतातील गिधाडांचा मृत्यू होऊ लागला. भारताने गुरांवर उपचार करण्यासाठी डायक्लोफेनाक नावाचे औषध वापरल्यामुळे असे होऊ लागले आहे. गाईंसाठी वेदनाशामक म्हणून वापरण्यात येणारे हे औषध स्वस्त आहे. मात्र, हे औषध गिधाडांसाठी अतिशय घातक आहे. गिधाडे प्राण्यांचे कुजलेले मृतदेह खातात. जर एखाद्या प्राण्याला हे औषध दिले गेले असेल आणि त्या प्राण्याचा मृतदेह गिधाडांनी खाल्ला, तर त्यांच्या किडन्या निकामी होतात आणि त्यांचा मृत्यू होतो. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, एका दशकात गिधाडांची लोकसंख्या ५० दशलक्षांवरून काही हजारांवर आली आहे.

हेही वाचा : समुद्रात पुन्हा तेल तवंग; १.४ दशलक्ष लिटर तेल वाहून नेणारे जहाज बुडाले, तेल गळतीचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो?

‘बर्ड गाईड्स’च्या म्हणण्यानुसार, पांढऱ्या रंगाच्या गिधाडांची प्रजाती यामध्ये सर्वांत जास्त प्रभावित आहे. त्यांची संख्या १९९२ ते २००७ दरम्यान ९९.९ टक्क्यांनी कमी झाली आहे, जी अतिशय गंभीर बाब आहे. भारताने २००६ मध्ये डायक्लोफेनाक औषधावर बंदी घातली आहे. त्यामुळे काही भागांत गिधाडांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, तरीही काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ‘आउटलेटने स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स’च्या अहवालानुसार, गिधाडांच्या किमान तीन प्रजाती त्यांच्या लोकसंख्येपैकी ९१ ते ९८ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

‘बर्ड गाईड्स’च्या म्हणण्यानुसार, पांढऱ्या रंगाच्या गिधाडांची प्रजाती यामध्ये सर्वांत जास्त प्रभावित आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

यामुळे पाच लाख लोकांचा मृत्यू कसा झाला?

आता अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन जर्नलच्या नवीन अभ्यासानुसार, गिधाडांची लोकसंख्या कमी झाल्यामुळे २००० ते २००५ दरम्यान पाच लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या मुदतपूर्व मृत्यूंमुळे दरवर्षी ७० अब्जांचे नुकसान झाले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, अनंत सुदर्शन आणि इयल फ्रँक यांनी हा अभ्यास केला होता. सुदर्शन हे वार्विक विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक व EPIC मध्ये वरिष्ठ सहकारी आहेत आणि फ्रँक हे शिकागो विद्यापीठात पर्यावरणीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. सुदर्शन आणि फ्रँक यांनी ६०० हून अधिक जिल्ह्यांतील आरोग्य नोंदी तपासल्या.

त्यांनी गिधाडे असलेलल्या भारतातल्या काही जिल्ह्यांतील मृत्यूंची तुलना ऐतिहासिकदृष्ट्या कमी गिधाडे असलेल्या लोकसंख्येशी केली. गिधाडे जिवंत असताना आणि गिधाडे जिवंत नसताना, अशी ही तुलना करण्यात आली. त्यांनी पाण्याची गुणवत्ता आणि इतर गोष्टींचीही तपासणी केली. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, या अभ्यासातून असे लक्षात आले की, ज्या भागात गिधाडांची संख्या घटली आहे, त्या भागात वेदनाशामक औषधांच्या विक्रीत वाढ झाली आहे आणि मृत्यूचे प्रमाण चार टक्क्यांहून अधिक वाढले आहे. त्यांना हेदेखील आढळले की, मोठ्या प्रमाणात पशुधन आणि शवांचा ढिगारा असलेल्या शहरी भागात मृत्यूचे प्रमाण सर्वांत जास्त आहे.

पण, असे नक्की का घडले?

हे समजून घेण्यासाठी आपल्याला रोगाचा प्रसार आणि त्यातील गिधाडांची भूमिका काय, हे जाणून घ्यावे लागेल. ‘Science.org’ नुसार, रोगग्रस्त मृतदेह खाल्ल्याने गिधाडांची संख्या कमी झाली. गिधाडे नसल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आणि त्यामुळे रॅबीजचे प्रमाण वाढले. गिधाडे ही एक प्रकारे आपली ‘स्वच्छता दूत’ असतात. मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीसाठी शेतकरीदेखील गिधाडांवर अवलंबून असतात. गिधाडे नसल्यामुळे शेतकर्‍यांपुढे मृत पशूंच्या विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला. यातून रोगाचा प्रसार झाला. सुदर्शन म्हणाले की, भारतात हे मी माझ्या डोळ्यांनी पहिले. ते म्हणाले की, त्यांनी शहराच्या हद्दीबाहेर मृत गुरांचे ढीग पाहिले. कुत्रे आणि उंदीर त्यांना खात असल्याचे पाहिले.

ते पुढे म्हणाले की, भारत सरकारने या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी रसायने वापरणे बंधनकारक केले. त्यामुळे जलमार्ग प्रदूषित झाले. यांद्वारे गिधाडे निसर्गाचा समतोल कसा राखतात हे लेखकांनी सांगितले. फ्रँक यांनी बीबीसीला सांगितले, “गिधाडांना निसर्गाचा ‘स्वच्छता दूत’ मानले जाते. कारण- ते आपल्या परिसरातून जीवाणू आणि रोगजनक असलेल्या मृत प्राण्यांना नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ते नसल्यामुळे रोग पसरू शकतात.” ते पुढे म्हणाले, “मानवी आरोग्यामध्ये गिधाडांची भूमिका वन्यजीवांचे संरक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित करते.”

हेही वाचा : कॅन्सरच्या रुग्णांना दिलासा; ‘या’ ३ औषधांच्या किमतीत घट, रुग्णांना कसा होणार फायदा?

तज्ज्ञ काय म्हणतात?

तज्ज्ञ या अभ्यासाने प्रभावित झाले आहेत. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील आरोग्य अर्थशास्त्रज्ञ अथेंदर वेंकटरामानी यांनी Science.org ला सांगितले की, हा अहवाल प्रशंसनीय आहे. इन्स्टिट्यूट फॉर मेडिटेरेनियन स्टडीजच्या संवर्धन शास्त्रज्ञ आंद्रेया सांतांगेली यांनी सांगितले की, या आकडेवारीमुळे उपाययोजनांना गती मिळेल. “तुम्ही त्यांना आकडे दिल्यास, धोरण आणि संवर्धन उपायांना गती देणे सोपे होईल.” स्टॅनफोर्ड विद्यापीठातील पर्यावरणीय अर्थशास्त्रज्ञ मार्शल बर्क म्हणाले की, हा अभ्यास इतर प्रजातींना लागू होऊ शकतो. अशा पद्धती पर्यावरणीय अर्थशास्त्रज्ञांना मानवी आरोग्यावर इतर प्रजातींच्या प्रभावाचे परीक्षण करण्यास प्रोत्साहित करू शकतात.