गॅस सिलिंडर ही सर्वसामान्यांच्या आयुष्यातली एक महत्त्वाची बाब मानली जाते. संपूर्ण कुटुंबाच्या महिन्याच्या जमा-खर्चामध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरसाठीची तरतूद करावीच लागते. घरात गॅस असल्याशिवाय स्वयंपाक तयार होणं कठीण असल्यामुळे गॅस सिलिंडर म्हणजे एका अर्थाने सर्वांच्याच पोटा-पाण्याचाच प्रश्न होऊन बसतो. त्यामुळेच या गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये होणारी वाढ किंवा घट ही सामान्यांच्या बजेटमध्ये किती खड्डा किंवा किती भर पडणार, हे ठरवत असते. त्यामुळेच या सिलिंडरच्या किमती ही सर्वसामान्यांसाठी फार महत्त्वाची असते. मात्र, वेळोवेळी या किमतींमध्ये वाढ झाली किंवा कधीतरी घट झाली असं आपण ऐकतो, तेव्हा नेमकं काय घडतं? सिलिंडरच्या किमती नेमक्या कशाच्या आधारावर ठरवल्या जातात?
गुरुवारी सकाळी गॅस वितरक कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडर ग्राहकांना दिलासा देत या सिलिंडरच्या किमती तब्बल १०० रुपयांनी कमी केल्या. महिन्याभरापूर्वी म्हणजेच १ ऑगस्ट रोजी देखील या किमती ३६ रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. मात्र, एक हजार रुपयांच्या वर किमती गेलेल्या घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना यातून कोणताही दिलासा मिळालेला नाही. पण या किमती कमी कशा होतात किंवा कशा वाढतात, हे सविस्तर जाणून घेऊयात!
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा प्रभाव
अपवादात्मक उदाहरणं सोडली, तर सामान्यपणे महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या नव्या किंवा बदललेल्या किमती जाहीर केल्या जातात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घरगुती गॅस सिलिंडरसाठी लागणाऱ्या एलपीजीच्या किमतींनुसार या किमती कमी-जास्त होत असतात.
विश्लेषण : ‘जामतारा’ जिल्ह्यातून आलेला एक फोन कॉल तुमचं बँक अकाऊंट रिकामं करू शकतो, कसं? जाणून घ्या
इम्पोर्ट पेरिटी प्राईस (IPP)
एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ठरवताना इम्पोर्ट पेरिटी प्राईस प्रणालीचा वापर केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर ही मोजणी अवलंबून असते. भारताची एलपीजीची गरज प्रामुख्याने आयातीतून भागवली जात असल्यामुळे, आयपीपी मॉडेलनुसार आपल्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती ठरतात. सौदी अरामकोच्या एलपीजी किमतींनुसार आयपीपीची मोजणी केली जाते. सौदी अरामको ही जगातली सर्वात मोठी एलपीजी उत्पादक कंपनी आहे. या किमतीमध्ये फ्री ऑन बोर्डचे दर (FOB), सागरी मालवाहतूक, कस्टम ड्युटी, बंदर शुल्क आणि इतर गोष्टींसह विमा खर्चाचा समावेश असतो. पण या सगळ्यापेक्षा जास्त महत्त्वाचा घटक म्हणजे यासाठी लागणारा कच्चा माल, अर्थात कच्चं तेल!
देशांतर्गत मूल्य
एकीकडे वरीलप्रमाणे आंतरराष्ट्रीय गोष्टींचे दर एकूण किमतीत समाविष्ट केले जात असताना दुसरीकडे हा गॅस भारतात आयात केल्यानंतरही तो सिलिंडर आपल्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रियेचा खर्च त्यात समाविष्ट होतो. यात देशांतर्गत मालवाहतूक खर्च, तेल कंपन्यांचा नफा, बॉटलिंग खर्च, विपणन खर्च, वितरकांचा मोबदला आणि वस्तू आणि सेवा कर (GST) यांचा समावेश आहे.
किमतीत वाढ किंवा घट होण्यामागची कारणं
वरील सर्व घटकांवर होणारा खर्च मिळून आपल्या घरात येणाऱ्या एलपीजी सिलिंडरची किंमत ठरत असली, तरी ही किंमत कमी किंवा जास्त होण्यामध्ये सर्वात महत्त्वाचे दोन घटक कारणीभूत ठरत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढउतार आणि भारतीय रुपयाचं कमी किंवा जास्त होणारं मूल्य!
विश्लेषण : भारतीय नौदलाचा झेंडा बदलणार; स्वातंत्र्यानंतर चार वेळा झाले बदल, जाणून घ्या इतिहास
भारतात तीन प्रमुख तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा करतात. त्यामध्ये इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या सार्वजनिक क्षेत्रातील तीन बड्या कंपन्यांचा समावेश आहे.