“खादी हे फक्त वस्त्र नाही. ज्यांच्यामध्ये स्वाभिमान आहे; त्यांच्यासाठी हे एक शस्त्र आहे…”, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिनाच्या (National Handloom Day) निमित्ताने करून देशातील लोकांना पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा दिला होता. चरख्याचा वापर करून हाताने विणलेले कापड आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा अविभाज्य भाग आहे आणि काळाच्या ओघात हातमाग, खादी मागे पडले आहे. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा प्रयत्नपूर्वक लोकप्रिय करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

सात दशकांपासून अनेक सरकारी कार्यालये आणि वारसास्थळांच्या इमारतींवर अभिमानाने फडकत असलेला राष्ट्रध्वज खादीपासून तयार केला जात आहे. स्वातंत्र्य संघर्षादरम्यान खादी हे फक्त कापड नव्हते; तर महात्मा गांधी यांनी निवडलेले ते अहिंसेचे हत्यार होते. भारतात आज गांधी जयंती साजरी केली जात असताना खादीचे महत्त्व आणि बदलत्या जगात खादीचे स्थान काय? याबाबत घेतलेला आढावा.

prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
woman in the womens movement and Gender inequality
स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’
raj Thackeray
…अन् राज ठाकरे यांनी घरी बोलावले; गंधर्व कलामंचच्या कलाकारांचे कौतुक
Image Of Zeenat Tigress
‘झीनत’मुळे का सुरू आहे पश्चिम बंगाल-ओडिशामध्ये वाद? एका वाघीणीमुळे दोन राज्यांमध्ये राजकीय तणाव!
Former Chief Minister Prithviraj Chavan regrets the misinformation spread about Dr Manmohan Singh
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबत अपप्रचार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खंत
Mahatma Gandhi Laxman Shastri Joshi British Railways
तर्कतीर्थ विचार: महात्मा गांधींच्या सहवासात…

हे वाचा >> खादी.. वस्त्र नव्हे, विचार!

महात्मा गांधींचे खादीशी असलेले नाते

खादी हे नाव खद्दर (khaddar) या नावापासून तयार झाल्याचे सांगण्यात येते. भारतीय उपखंडात चरख्याचा वापर करून, तयार करण्यात आलेल्या कापडाला ‘खद्दर’ असे म्हणत. ग्रीक इतिहासकार हेरोडोटस यांच्या माहितीनुसार, इसवी सन पूर्व ४०० वर्षांपासून भारतात हातापासून तयार करण्यात आलेल्या कापडाची प्राचीन परंपरा चालत आली आहे. भारतीय कापडाबद्दल १७ व्या शतकात युरोपमध्ये बराच असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर पाश्चिमात्य देशांत भारतीय कापड मत्सराचा विषय बनले आणि फ्रेंच व ब्रिटिशांनी स्पर्धा कमी करण्यासाठी त्यावर बंदी घातली, अशी माहिती वोग या फॅशनला समर्पित असलेल्या अमेरिकन मासिकात देण्यात आली आहे.

ब्रिटिशांनी खादीला नाकारले असले तरी गांधींनी पुन्हा एकदा भारतीय कापडाकडे लक्ष वेधले. चरख्यापासून हाताने विणलेल्या कापूस, रेशीम व लोकरीच्या धाग्यांपासून बनलेल्या कापडाला आता ‘खादी’ असे संबोधले जाते. महात्मा गांधी जेव्हा परदेशी कपड्यांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करीत होते, तेव्हा ते चरख्यावर सूत कातून तयार केलेले कपडे वापरण्यासही सांगत होते. “तुम्ही जे उत्पादित करता, तेच वापरा”, असा त्यांचा आग्रह होता. चरख्यावर उत्पादित केलेले कापड आपल्याला पुढे घेऊन जाईल, असे त्यांचे मत होते.

“१९१५ साली गांधी यांनी खादी चळवळ सुरू केली. त्यामुळे ग्रामीण भागातील गरिबांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ मिळेल, तसेच रोजगारनिर्मितीही होईल, असा त्यामागे उद्देश होता. चरख्यावर सूत कातून तयार केलेले स्वदेशी कापड हे भारतीयांना आर्थिक मुक्ततेकडे नेईल, असा त्यांचा विश्वास होता. परकीय देशांवरील अवलंबित्व कमी करणे आणि परकीय कच्च्या मालाऐवजी स्वदेशी कापड वापरून स्वावलंबी होणे, याकडे टाकलेले हे पहिले पाऊल होते. हेच आत्मनिर्भर भारताचे तत्त्व आहे”, असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीनिमित्त केला आहे.

महात्मा गांधी यांना सुरुवातीलाच कळले होते की, बेरोजगारी भारतासाठी त्रासदायक विषय बनू शकते आणि त्यातून बाहेर पडून रोजगारनिर्मितीसाठी खादी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. पाऊस नसताना शेतकऱ्यांकडे फारसे शेतातील काम नसते. अशा काळात जर चरख्यावर सूत कातण्याचे काम त्यांनी केले, तर ते त्यात व्यग्रही राहतील. या कामासाठी फारसे भांडवलही लागत नाही. खादी उद्योगामध्ये महिलांना स्वातंत्र्य चळवळीशी जोडण्याची क्षमता आहे, हेदेखील त्यांनी जाणले होते. “मी शपथ घेऊन सांगतो की, या स्वदेशी (खादी) चळवळीमुळे भारतातील अर्थउपाशी, अर्धरोजगार असलेल्या महिलांना काम मिळू शकते. महिलांना सूत कातण्याची संधी मिळावी आणि त्यातून तयार होणारे खादीचे कापड भारतातील नागरिकांनी वापरावे; जेणेकरून गरीब स्त्रियांना त्या परिस्थितीतून बाहेर काढता येईल”, अशी भूमिका त्यावेळी महात्मा गांधी यांनी मांडली होती. महात्मा गांधी यांच्यासाठी खादी हे केवळ वस्त्र नव्हते, तर स्वातंत्र्य मिळवण्याचे प्रतीक होते.

विशेष म्हणजे २२ सप्टेंबर १९२१ रोजी गांधी यांनी खादीने तयार केलेला पोशाखाचा त्याग करून केवळ कमरेला गुंडाळण्याइतकेच वस्त्र वापरायला सुरुवात केली. मद्रास (चेन्नई) ते मदुराई असा रेल्वेने प्रवास करीत असताना तिसऱ्या श्रेणीच्या डब्यात खादी वापरण्यासंबंधी ते सांगत असताना एका शेतकऱ्याने “खादी विकत घेण्यासाठी आम्ही गरीब आहोत”, असे उत्तर दिले. त्यानंतर महात्मा गांधी यांनीही स्वतःच्या वस्त्राचा त्याग केला.

गांधी यांना रेल्वेत भेटलेल्या त्या शेतकऱ्याने अंगावर बनियन, पूर्ण धोतर व डोक्यावर कापड गुंडाळले होते. शेतकऱ्यामुळे महात्मा गांधी यांनाही त्या प्रकारचे कपडे घालण्यासाठी प्रवृत्त केले. “माझ्या जीवनाच्या वाटचालीत मी जे निर्णय घेतले, ते कोणत्या ना कोणत्या महत्त्वपूर्ण प्रसंगावर आधारित आहेत. ते निर्णय घेताना खोलवर विचार केल्यामुळेच मला त्याचा कधीही खेद वाटला नाही”, अशी प्रतिक्रिया त्यावेळी महात्मा गांधी यांनी दिली होती. तसेच, त्यांनी स्वीकारलेल्या मार्गावर प्रत्येकाने चालावे, असा अट्टहासही कधी धरला नाही. नवजीवन या दैनिकात त्यांनी लिहिलेल्या लेखात म्हटले, “माझ्या सहकाऱ्यांनी किंवा वाचकांनी केवळ लंगोटी वापरावी, असे माझे म्हणणे नाही. पण माझी इच्छा आहे की, त्यांनी विदेशी कापडावरचा बहिष्कार नीट समजून घ्यावा आणि विदेशी कापडावर पूर्ण बहिष्कार टाकून खादीची निर्मिती होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.”

१९०५-०६ दरम्यान स्वदेशी चळवळीने वेग धरला होता. देशाच्या अनेक भागांत राष्ट्राभिमानी लोकांनी एकत्र येऊन परदेशी कपडे आणि इतर मालाची होळी केली. या स्वदेशी चळवळीच्या काही वर्षांनंतर १९१५ रोजी महात्मा गांधी यांनी गुजरातच्या अहमदाबादमधील साबरमती आश्रमातून खादी चळवळीची सुरुवात केली. या चळवळीमुळे शेकडो, हजारो भारतीयांनी खादी वापरण्यास सुरुवात केली; ज्यामुळे इंग्लंडच्या लँकेशायर येथील कारखान्यातून तयार होऊन आलेल्या कापडाच्या दुकानांना टाळे ठोकावे लागले होते.

हे वाचा >> विश्लेषण : नोटांवर महात्मा गांधींचा फोटो कधी आणि का छापला? वाचा इतिहास…

खादी चळवळीने स्वातंत्र्य चळवळीला जनआंदोलनाचे स्वरूप दिले आणि ग्रामीण भागातही ही चळवळ पोहोचवली. चरखा हे राष्ट्रवादाचे चिन्ह बनले आणि गांधी यांच्या सूचनेनुसार भारतीय तिरंग्याच्या मध्यभागी चरख्याचे चिन्ह अवतरले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतातील खादी चळवळ

खादी चळवळीमुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जगातील सर्वांत मोठ्या सहकारी संस्थांची निर्मिती झाली. १९५७ साली केंद्र सरकारने कायदा संमत करून खादी आणि ग्रामीण उद्योग आयोगाच्या (Khadi and Village Industries Commission – KVIC) माध्यमातून खादी उद्योगाला संस्थात्मक स्वरूप दिले. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि अधिक संधी निर्माण करण्याचे ध्येय या संस्थेच्या माध्यमातून ठेवण्यात आले. KVIC च्या माध्यमातून उत्पादकांना कच्चा माल पुरविण्यात आला. उत्पादनासाठी नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, उत्पादनाचा दर्जा कायम राखणे आणि उत्पादित झालेल्या मालाला बाजारपेठ व त्याचे विपणन करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सहकार्य पुरविण्यात आले.

पण, कालांतराने तत्कालीन पंतप्रधान नेहरूंच्या कार्यकाळात औद्योगिक आणि तांत्रिक उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यात आल्यामुळे भारतीय हातमागासह खादी चळवळ मागे पडली. शेतीनंतर हातमाग हा ग्रामीण भागात सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असूनही देशाच्या वस्त्रोद्योग धोरणाने हातमागाला मदतीचा हात दिला नाही. सिंथेटिक कापडाने बाजारात प्रवेश केल्यानंतर हातमाग विणकारांसमोर आणखी समस्या निर्माण झाल्या. १९८० च्या दशकात देशात पॉलिस्टर कापड लोकप्रिय झाले. कालांतराने खादीला राजकारण्यांच्या गणवेशापेक्षा फार जास्त महत्त्व उरले नाही.

वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अहवालाचा हवाला देऊन स्क्रोल या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, देशात तयार होणाऱ्या एकूण कापडापैकी यंत्रमागावर तयार होणाऱ्या कापडाचा वाटा ६० टक्के असून, हातमागाचा वाटा केवळ १५ टक्के आहे.

हे वाचा >> गांधीजींचे ग्रामीण अर्थकारण आणि आजची आव्हाने

खादी पुन्हा चर्चेत

मोदी सरकारने आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडून पुन्हा एकदा भारतीय हातमागावर लक्ष केंद्रित केले आहे. २०१४ साली भाजपाचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्याच वर्षी ७ ऑगस्ट २०१५ हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. ७ ऑगस्ट १९०५ रोजी स्वदेशी चळवळ सुरू झाली होती. या दिवसाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्याची संकल्पना मांडली गेली.

भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर मागच्या शतकात बलशाली असलेल्या खादी उद्योगाला उभारी देण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे खादी उद्योग मरणासन्न अवस्थेत पोहोचला. जे लोक खादी परिधान करतात, त्यांच्याही मनात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होऊ लागला. पण, आता या दृष्टिकोनात बदल करणे आवश्यक आहे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त मांडली.

मागच्या नऊ वर्षांमध्ये फॅशन इंडस्ट्रीमध्ये खादीने आपले स्थान प्राप्त केले आहे. आदित्य बिर्ला ग्रुप आणि रेमंडसारख्या ब्रँड्सनीही खादीपासून तयार केलेले कपडे विक्रीस उपलब्ध केले आहेत. खादीपासून तयार झालेले आकर्षक कपडे परिधान करून मॉडेल्सनी रॅम्प वॉक केलेला आहे; ज्यामुळे खादीची जाहिरात होण्यास मदत झाली. “मागच्या नऊ वर्षांत खादीचे उत्पादन तीन पटींनी वाढले आणि खादी कापडाची विक्रीही पाच पटींनी वाढली आहे. हातमाग व्यवसायाची वार्षिक उलाढाल जवळपास ३० हजार कोटींवरून एक लाख ३० हजार कोटींच्या वर पोहोचली आहे. तसेच विदेशांतही खादीच्या कपड्यांची मागणी वाढत आहे”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने दिली.

Story img Loader