संदीप कदम
दक्षिण आफ्रिकेत शुक्रवारपासून (१० फेब्रुवारी) महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेच्या गेल्या पर्वात भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या वेळी भारताचा एक पाऊल पुढे जात जेतेपद मिळवण्याचा प्रयत्न असेल. मात्र, त्यासाठी त्यांना अनेक संघांचे आव्हान असणार आहे. भारताची स्पर्धेसाठीची तयारी कशी आहे, भारताला कोणकोणत्या संघांचे आव्हान असेल, कोणत्या खेळाडू भारतासाठी निर्णायक ठरतील याचा घेतलेला आढावा.
फलंदाजीची मदार अजूनही हरमनप्रीत, मानधनावर?
कर्णधार हरमनप्रीत काैर आणि उपकर्णधार-सलामीवीर स्मृती मानधना यांच्यावर भारतीय फलंदाजीची मदार असेल. त्यातच नुकतेच भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवणारी कर्णधार शफाली वर्माकडून सर्वांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. मानधना आक्रमक खेळासाठी ओळखली जाते. तिने १०५ ट्वेन्टी-२० सामन्यांत २५४५ धावा केल्या आहेत. ट्वेन्टी-२० प्रारूपात तिने १९ अर्धशतके झळकावली आहे. तसेच, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या महिला ट्वेन्टी-२० लीगमध्येही ती सहभागी होत असल्याने जगातील अनेक अनुभवी खेळाडूंविरुद्ध खेळण्याचा अनुभव तिच्याकडे आहे. त्यामुळे भारताच्या चांगल्या सुरुवातीची जबाबदारी मानधनावर असेल. तिची सलामीची साथीदार शफालीने गेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. आतापर्यंत खेळलेल्या ४९ सामन्यांत तिने ११९८ धावा केल्या आहेत. त्यामध्ये पाच अर्धशतकांचा समावेश आहे. हरमनप्रीतही भारतासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडेल. ट्वेन्टी-२० मध्ये तिने १३७ सामने खेळले असून त्यात २६९४ धावा केल्या आहे. संघात सर्वाधिक अनुभव तिच्याकडे आहे. तसेच युवा रिचा घोष, हरलीन देओल आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्याकडूनही भारताला अपेक्षा असतील.
कोणत्या अष्टपैलू खेळाडूंवर भारत अवलंबून?
दीप्ती शर्मा, देविका वैद्य आणि पूजा वस्त्रकार या अष्टपैलू खेळाडूंच्या कामगिरीवर भारताची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील वाटचाल अवलंबून असेल. दीप्तीने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत नेहमीच योगदान दिले आहे. दीप्तीने ८७ ट्वेन्टी-२० सामन्यांत ९१४ धावा केल्या असून ९६ गडी बाद केले आहेत. नुकत्याच झालेल्या तिरंगी ट्वेन्टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर तिला मदतही मिळताना दिसली. ती चांगल्या लयीतही आहे. देविका वैद्यने भारताकडून ११ ट्वेन्टी-२० सामनेच खेळले आहेत. फारसा अनुभव नसला, तरी कोणत्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करण्यास ती सक्षम आहे. पूजा वस्त्रकारने भारताचे ४३ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या काही काळात दुखापतींमुळे ती संघाबाहेर होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेत झालेल्या तिरंगी मालिकेत तिने सहभाग नोंदवला होता. ती मोठे फटके मारण्यातही सक्षम आहे. त्यामुळे पूजाची भूमिकाही निर्णायक असेल.
भारताच्या वेगवान गोलंदाजी विभागात अनुभवाची कमतरता का जाणवते?
वेगवान गोलंदाजी ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. झुलन गोस्वामीच्या निवृत्तीनंतर भारताकडे अनुभवी वेगवान गोलंदाज नाहीत. शिखा पांडेकडे (५९ ट्वेन्टी-२० सामने) बराच अनुभव असला, तरी बऱ्याच काळानंतर ती भारतीय संघात आली आहे. रेणुका ठाकूर, अंजली सरवानी यांना तितकासा अनुभव नसल्याने संघाच्या वेगवान माऱ्याची धुरा शिखावर असेल. आपल्या छोटेखानी कारकीर्दीत रेणुकाने चमक दाखवली. तिने २७ ट्वेन्टी-२० सामन्यांत २४ गडी बाद केले. अंजलीकडे अवघ्या सहा आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळाल्यास ती स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल.
भारतासमोर साखळी फेरीत कोणत्या संघांचे आव्हान?
ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा ब-गटात समावेश करण्यात आला असून त्यांचे इंग्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्याशी साखळी सामने होतील. भारतीय संघ पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी १२ फेब्रुवारीला खेळेल. यानंतर भारताचे अनुक्रमे वेस्ट इंडिज (१५ फेब्रुवारी), इंग्लंड (१८ फेब्रुवारी) आणि आयर्लंड (२० फेब्रुवारी) या संघांविरुद्ध सामने होतील. भारताने आजवर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे दोन्ही संघांत होणाऱ्या सामन्यात भारताचे पारडे जड समजले जात आहे. भारताचा दुसरा सामना गतविजेत्या वेस्ट इंडिजशी होणार आहे. नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेत भारताने विंडीजविरुद्धही चमकदार कामगिरी केली होती. तिसऱ्या सामन्यात भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असेल. इंग्लंडचा संघ ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील एक मजबूत संघ समजला जातो. हेदर नाईटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने २००९च्या पहिल्या विश्वचषकाचे जेतेपद मिळवले होते. त्यांच्याकडे गोलंदाजांची चांगली फळी आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज कॅथरीन स्किव्हर-ब्रंट आणि फिरकीपटू सोफी एक्लेस्टोनसारखे गोलंदाज आहेत.
ऑस्ट्रेलिया जेतेपदासाठी प्रमुख दावेदार का?
यंदा ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे सातवे पर्व असून पाच वेळा ऑस्ट्रेलियन संघाने जेतेपद पटकावले आहे. २०२०च्या विश्वचषकातही ऑस्ट्रेलियाचा संघ विजेता ठरला होता. त्यानंतर क्रिकेटच्या या प्रकारात ऑस्ट्रेलियाला इतर संघांकडून फारसे आव्हान मिळालेले नाही. गेल्या २२ महिन्यांत ऑस्ट्रेलियाचा महिला संघ ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये केवळ एकदाच पराभूत झाला आहे. त्यामुळे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला या वेळीही जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे.