अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रविवारी डेमोक्रॅटिक पक्षातून अध्यक्षीय निवडणुकीसाठी आपली उमेदवारी मागे घेत आपल्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना पाठिंबा जाहीर केला. बायडेन यांच्या माघारीनंतर अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर केलेल्या हॅरिस या एकमेव नेत्या असल्यामुळे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात हॅरिसच असण्याची सर्वाधिक शक्यता आहे. त्यांना बायडेन यांच्यापेक्षा विजयाची अधिक संधी आहे का? पक्षात आणि देशात त्यांची लोकप्रियता किती? आफ्रिकन-भारतीय वंशाची महिला असल्याचा हॅरिस यांना फायदा होईल की नुकसान? या प्रश्नांचा हा वेध…
हॅरिस-ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत अंतर किती?
बायडेन यांच्या घोषणेनंतर हॅरिस यांची अध्यक्षपदाची ‘दौड’ सुरू झाली असताना ताज्या सर्वेक्षणानुसार त्या बायडेन यांच्या तुलतेन ट्रम्पना अधिक टक्कर देतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’तर्फे संभाव्य मतदारांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ट्रम्प हे केवळ एका टक्क्याने पुढे आहेत. ट्रम्प यांच्या बाजूने ४८ टक्के आणि हॅरिस यांच्या बाजूने ४७ टक्के संभाव्य मतदार आहेत. नोंदणीकृत मतदारांमध्ये ४८ टक्के विरुद्ध ४६ टक्के, असा केवळ दोन टक्क्यांचाच फरक आहे. ॲटलांटामध्ये झालेल्या वादविवादात बायडेन यांच्या हाराकिरीनंतर टाइम्स-सिएना कॉलेजने केलेल्या संभाव्य मतदारांच्या सर्वेक्षणात दोघांमध्ये सहा टक्क्यांचा फरक होता. विशेष म्हणजे, गोळीबारातून बचावल्यानंतर ट्रम्प यांची लोकप्रियताही आतापर्यंतच्या उच्चांकावर असताना हॅरिस त्यांना मोठे आव्हान देत असल्याचे चित्र आहे. ट्रम्प यांच्यासारख्या मातबर खेळाडूला पराभूत करायचे असेल, तर सर्वप्रथम आपला पक्ष संपूर्णत: पाठीशी उभा करणे हॅरिस यांच्यासाठी गरजेचे आहे.
आणखी वाचा-स्वीस वंशाच्या सावित्री खानोलकर ज्यांनी तयार केलं परमवीर चक्र
डेमोक्रॅटिक पक्षात हॅरिस यांना किती पाठिंबा?
ॲटलांटा वादविवादानंतर डेमोक्रॅटिक पक्ष मोठ्या प्रमाणात दुभंगला होता. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापासून अनेक जण बायडेन यांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन करताना आणि बायडेन त्याला ठाम नकार देताना दिसत होते. मात्र अखेर, बायडेन पक्षांतर्गत दबावापुढे झुकल्यानंतर पक्षात लोकप्रियता मिळविण्यात हॅरिस यशस्वी झाल्याचे सध्यातरी म्हणता येईल. बायडेन यांनी माघारीच्या भाषणातच नाव पुढे केल्याचा हॅरिस यांना निश्चितच फायदा झाल्याचे चित्र आहे. बराक आणि मिशेल ओबामा यांनीही हॅरिस यांना अलीकडेच पाठिंबा जाहीर केला. त्यामुळेच अद्याप पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली नसली, तरी ७० टक्के डेमोक्रॅटिक मतदार त्यांच्या पाठीशी आहेत. केवळ १४ टक्के मतदारांना अन्य उमेदवार असावा, असे वाटत आहे. पक्ष प्रतिनिधींमध्ये तर हॅरिस यांना यापेक्षा जास्त पाठिंबा मिळत आहे. रिपब्लिकन पक्षात अंतर्गत मतदानाच्या फेऱ्या सुरू असताना ट्रम्पना होता, तितकाच जवळजवळ ९३ टक्के पाठिंबा सध्या हॅरिस यांना मिळत आहे. एका अर्थी त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित असताना आता चर्चा आणि पक्षांतर्गत स्पर्धेमध्ये अधिक वेळ न घालवता पक्षाने कमला हॅरिस यांच्यामागे उभे राहावे आणि नोव्हेंबरच्या अंतिम फेरीची तयारी सुरू करावी, असा सल्ला पक्षातील ज्येष्ठांकडून दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर हॅरिस यांचा वर्ण आणि त्या महिला असल्यावरून रिपब्लिकन पक्षातील काही जणांनी आतापासूनच अपप्रचार सुरू केला आहे.
आणखी वाचा-स्रियांचा सखा ते राष्ट्रपती भवनातील अशोक मंडप;अशोक वृक्षाचा प्रवास कसा?
रिपब्लिकन अपप्रचारामुळे नुकसान होईल?
अध्यक्षपदासाठी नाव जाहीर करून काही दिवस होत नाहीच, तोवर हॅरिस यांना वर्णद्वेषी-लिंगभेदी टिप्पण्यांना समोरे जावे लागत आहे. समाजमाध्यमांवर रिपब्लिकन पक्षाच्या पाठिराख्यांनी त्यांच्याविरोधात मोहीमच उघडल्याचे चित्र आहे. त्यामुळेच ‘एक्स’वरील हॅरिस यांच्यासंबंधी संदेशांपैकी ११ टक्के संदेश हे त्यांचा वंश, वर्ण किंवा महिला असण्यावर हल्ला करणारे आहेत. यात मिसूरीच्या ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट’ पदासाठी निवडणूक लढणाऱ्या एका महिला रिपब्लिकन उमेदवाराचाही समावेश आहे, हे विशेष. हॅरिस यांची आई भारतीय आणि वडील जमैकन असल्याचे सातत्याने अधोरेखित केले जात आहे. एकीकडे त्या श्वेतवर्णीय नसल्याचे ठरविले जात असतानाच त्या ‘पुरेशा कृष्णवर्णीय’ नाहीत, असाही प्रचार सुरू आहे. माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन, काँग्रेस सदस्य अलेक्झांड्रिया ओकसिओ-कोर्टेझ या डेमोक्रॅटिक पक्षातील काही प्रभावशाली महिला हॅरिस यांच्या बचावासाठी तातडीने पुढे सरसावल्या असून काही समंजस रिपब्लिकनही चुकीच्या प्रचारात न गुंतण्याचा सल्ला आपले नेते-कार्यकर्त्यांना देत आहेत. समाजमाध्यमांवर असा धुमाकूळ सुरू असताना अमेरिकन माध्यमेही हॅरिस यांना पारखू लागली आहेत.
आणखी वाचा-पॅरिस ऑलिम्पिक हे आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक पर्यावरणपूरक आयोजन का असणार आहे?
मुख्य प्रवाहातील माध्यमांचे मत काय?
हॅरिस या नेमक्या कोण आहेत, त्यांची विचारसरणी कशी आहे याची ओळख अमेरिकन मतदारांना करून देण्याच्या कामाला प्रमुख माध्यमे लागली आहेत. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या मते हॅरिस या पुरोगामी आहेत. बायडेन यांच्यापेक्षा त्यांची धोरणे अधिक डावीकडे झुकणारी असून येत्या काही आठवड्यांत कदाचित त्या आपली थोडी वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. त्यांना जिंकायचे असेल, तर तेच शहाणपणाचे आहे, असा सल्ला ‘जर्नल’ने देऊ केला आहे. हॅरिस यांनी युक्रेनला जाहीर पाठिंबा देणे आणि इस्रायलला दिलेल्या पाठबळाबद्दल मात्र शंका उपस्थित करणे या वर्तमानपत्राने अधोरेखित केले आहे. हॅरिस ताकदवान नेत्या आणि ट्रम्प यांच्या चांगल्या प्रतिस्पर्धी ठरतील, अशी पावती ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिली आहे. बायडेन यांची जागा त्यांनी ज्या गतीने घेतली, त्यावर ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने भुवया उंचावल्या आहेत. माध्यमे-समाजमाध्यमांच्या या गोंगाटात अमेरिकन जनता हॅरिस यांच्या पाठीशी उभी राहणार की पुन्हा एकदा ‘ट्रम्पराज’ अवतरणार, हे नोव्हेंबरमध्येच सप्ष्ट होईल.
amol.paranjpe@expressindia.com