कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाण्यातील एका सदनिकेचा ताबा सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नुकताच घेतला. आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँडरिंग) प्रकरणात ईडीने एप्रिल २०२२ मध्ये या सदनिकेवर टाच आणली होती. या मालमत्तेचा लवकरच लिलाव करण्यात येईल. यापूर्वीही दाऊद व त्याच्या नातेवाईकांच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून त्यातील २१ मालमत्तांचा लिलाव करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेबाबत जाणून घेऊ…
दाऊदच्या भावाची कुठली मालमत्ता जप्त?
दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाण्यातील कावेसर येथील ‘नेओपोलिस’ टॉवरमधील सदनिकेचा ताबा सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) घेतला. आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँडरिंग) प्रकरणात ईडीने एप्रिल २०२२ मध्ये या सदनिकेवर टाच आणली होती. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही सदनिका असून सुमारे ७५ लाख रुपये किंमत असलेली ही सदनिका बळजबरीने इक्बालचा विश्वासू साथीदार शेखच्या नावावर करण्यात आली होती. तसेच या प्रकरणात बनावट धनादेशाद्वारे १० लाख रुपयांचे व्यवहार दाखवण्यात आले होते.
ईडी तपास कोणत्या प्रकरणाबाबत?
ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये कासकरविरोधात दाखल खंडणीच्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी तपास करीत आहेत. त्यानंतर हे प्रकरण ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडे हस्तांतरित करण्यात आले होते. कासकर, त्याचे साथीदार मुमताज शेख आणि इसरार अली जमील यांनी दाऊद इब्राहिमच्या नावाचा गैरफायदा घेऊन बांधकाम व्यावसायिक सुरेश मेहता यांच्याकडून मालमत्ता आणि रोख रक्कम खंडणीच्या स्वरूपात उकळली होती. ईडीने दोन गुन्ह्यांच्या आधारावर या प्रकरणी चौकशीला सुरुवात केली होती. त्यात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआरए) दाऊद इब्राहिम, अनीस इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन आणि इतरांविरुद्ध दाखल केलेला गुन्हा आणि ठाणे पोलिसांनी खंडणी स्वीकारल्याप्रकरणी इक्बाल कासकर आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याचा समावेश आहे.
ईडीच्या तपासात काय?
अवैध मार्गाने मिळवलेल्या संपत्तीचे मूळ लपवण्यासाठी केलेले व्यवहार ईडीने चौकशीत उघड केले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये कासकरची चौकशी केली. त्यात त्याने भारतातील दाऊदच्या गुन्हेगारी कारवायांची माहिती दिली. आरोपींच्या घरांवर छापे घातल्यानंतर एप्रिल २०२२ पर्यंत ठाणे पोलीस अहवालाच्या पुराव्यांसह मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत खंडणी व कट रचणे याबाबतच्या संबंधित कलमांचा समावेश होता. संयुक्त अरब अमिरातीमधून २००३ मध्ये परत पाठवण्यात आलेल्या इक्बाल कासकरने भारतात दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावण्यास सुरुवात केली. कराची येथे वास्तव्यास असलेल्या दाऊदचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी गट आणि गुप्तहेर संस्थांशी संबंध असल्याचे मानले जाते. त्यामुळे हे प्रकरण कायदेशीर आणि सुरक्षेच्या पातळीवर अधिक महत्त्वाचे आहे. याशिवाय एनआयएनेही दाऊदच्या विविध कारवायांप्रकरणी देशभरात कारवाई केली.
हेही वाचा >>>२६/११ दहशवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याचा पाकिस्तानात मृत्यू; कोण होता अब्दुल रहमान मक्की?
यापूर्वी दाऊदशी संबंधित किती मालमत्ता जप्त?
रत्नागिरीतील खेड तालुक्यातील मुम्बाके येथील चारही मालमत्ता दाऊदची आई अमिना बी हिच्या नावावर असून जवळपास चार वर्षांपूर्वी ‘स्मगलर्स आणि फॉरेन एक्स्चेंज मॅनिपुलेटर ॲक्ट’अंतर्गत (साफेमा) या जमिनी जप्त करण्यात आल्या होत्या. त्यांचा २०२४ जानेवारी रोजी लिलाव करण्यात आला. या मालमत्तेची किंमत १९ लाख रुपये होती. या चार मालमत्तांपैकी एक व दोन क्रमांकाच्या मालमत्तेसाठी कोणीही बोली लावली नाही. उर्वरित दोन मालमत्तांसाठी सात जण लिलावात सहभागी झाले होते. तीन क्रमांकाच्या मालमत्तेवर सर्वाधिक म्हणजे दोन कोटी एक हजार रुपयांची बोली लावण्यात आली. लिलावात सहभागी तीन क्रमांकाची मालमत्ता १७०.९८ चौ.मी. क्षेत्रफळाची शेतजमीन आहे. त्या मालमत्तेसाठी मुळ किंमत केवळ १५ हजार ४४० रुपये ठेवण्यात आली होती. याशिवाय चौथ्या क्रमांकाच्या मालमत्तेवर तीन लाख २८ हजार रुपयांची बोली लावण्यात आली. ती मालमत्ता १७३० चौ.मी. जमीन असून त्याची मूळ किंमत एक लाख ५६ हजार २७० रुपये ठेवण्यात आली होती. दोन्ही मालमत्तांसाठी अजय श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीने सर्वाधिक बोली लावली. यापूर्वी २०१७ व २०२० मध्येही दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होता. त्यात ४.५३ कोटी रुपयांना विकलेले रेस्टॉरंट, ३.५३ कोटी रुपयांना विकलेल्या सहा सदनिका आणि ३.५२ कोटी रुपयांना विकलेल्या गेस्ट हाऊसचा समावेश आहे. दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील मालमत्तेचा डिसेंबर २०२० मध्ये सुमारे सव्वा कोटी रुपयांना लिलाव करण्यात आला होता, त्यात दोन भूखंड आणि बंद पडलेल्या पेट्रोल पंपाचा समावेश होता. खेड तालुक्यातील लोटे गावातील ही मालमत्ता दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकरच्या नावावर नोंदणीकृत होती. नागपाडा येथील ६०० चौरस फुटांच्या सदनिकाचा एप्रिल २०१९ मध्ये १ कोटी ८० लाख रुपयांना लिलाव करण्यात आला होता. ‘साफेमा’ अधिकाऱ्यांनी दाऊदच्या पाकमोडिया स्ट्रीट येथील मालमत्तेचा २०१८ मध्ये ७९ लाख ४३ हजार रुपयांच्या राखीव किमतीत लिलाव केला होता. सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने (एसबीयूटी) ३.५१ कोटी रुपयांना ही मालमत्ता खरेदी केली होती.
आणखी कोणत्या गुन्हेगारांच्या मालमत्ता?
‘साफेमा’ या केंद्रीय यंत्रणेद्वारे इकबाल मिर्चीच्या मुंबईतील दोन सदनिकांचा लिलाव १० नोव्हेंबर २०२० रोजी करण्यात आला होता. पण त्यावेळीही या मालमत्तेसाठी कोणीही बोली लावली नाही. त्यापूर्वीही ‘साफेमा’मार्फत या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. पण ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी त्यावेळी कोणीही पुढे आले नाही. ‘साफेमा’अंतर्गत या मालमत्तेची मूळ किंमत तीन कोटी ४५ लाख रुपये निश्चित झाली होती. ही किंमत अधिक वाटल्यामुळे कोणीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी बोली लावली नाही. सांताक्रुझ येथील जुहू तारा रोडवरील उच्चभ्रू वस्तीत ही मालमत्ता होती. तेथील मिल्टन को-ॲप हौसिंग सोसोसायटीमधील ५०१ व ५०२ या दोन सदनिका मिर्चीच्या होत्या. त्यांचे क्षेत्रफळ १२०० चौ.फूट इतके होते. मिर्चीची पत्नी हाजरा मेमन, दोन मुले आसीफ व जुनैद यांच्यासह १३ जणांविरोधात ईडीने डिसेंबर २०१९ मध्ये गुन्हा दाखल केला होता. मिर्चीच्या सुमारे ८०० कोटींच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली होती.