प्रसिद्ध भारतीय चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांच्या कलाकृती पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांना एम. एफ. हुसेन म्हणूनदेखील ओळखले जाते. एका वकिलाने तक्रार दाखल केल्यानंतर दिल्लीतील न्यायालयाने डीएजी येथे प्रदर्शित केलेल्या त्यांच्या दोन आक्षेपार्ह चित्रांना जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी (२० जानेवारी) धार्मिक भावना दुखावल्याने वकील अमिता सचदेवा यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाने हिंदू देवता हनुमान आणि गणेश दर्शविणाऱ्या हुसेन यांच्या कलाकृती जप्त करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यांनी आक्षेपार्ह पेंटिंग्ज प्रदर्शित केल्याबद्दल डीएजी, पूर्वी दिल्ली आर्ट गॅलरी आणि त्याचे संचालक यांच्याविरुद्ध एफआयआरची मागणी केली आहे. पटियाला हाऊस कोर्टाचे न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी साहिल मोंगा यांनी बुधवारी एफआयआरवरील आपला निर्णय राखून ठेवला आहे. नेमके हे प्रकरण काय आहे? त्यांची चित्र वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची कारणे काय? एम. एफ. हुसेन नेहमी वादात का सापडतात? ते जाणून घेऊ.

हेही वाचा : पाकिस्तान ‘ISI’चे शिष्टमंडळ बांगलादेशात; दोन देशांची वाढती मैत्री भारतासाठी चिंताजनक? कारण काय?

एम. एफ. हुसेन यांची चित्रे जप्त करण्याचे आदेश

दिल्ली उच्च न्यायालयात काम करणाऱ्या वकील अमिता सचदेवा यांनी ४ डिसेंबर रोजी ‘एक्स’वर डीएजीमध्ये प्रदर्शित झालेल्या एम. एफ. हुसेन यांच्या दोन चित्रांबद्दल नाराजी व्यक्त करणारी एक पोस्ट लिहिली. त्यांनी आरोप केले की, आर्ट गॅलरीत आक्षेपार्ह पेंटिंग्जचे छायाचित्रण केले आणि हुसेन यांच्याविरुद्धच्या मागील एफआयआरचे संशोधन केल्यानंतर, पाच दिवसांनी पोलिस तक्रार दाखल केली.

प्रसिद्ध भारतीय चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांच्या कलाकृती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

त्यांनी असेही स्पष्ट केले की, १० डिसेंबर २०२४ रोजी तपास अधिकारी यांच्या भेटीदरम्यान चित्रे काढून टाकण्यात आली आणि खोटा दावा केला गेला की, ती कधीही प्रदर्शित झाली नाहीत. ‘डीएजी’ने ‘हुसेन : द टाइमलेस मॉडर्निस्ट’ या प्रदर्शनाचे आयोजन २६ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर या कालावधीत केले होते, ज्यात ११५ हून अधिक कलाकृतींचा समावेश होता. सचदेवा यांनी हुसेनच्या चित्रांचे प्रदर्शन करण्यात आले, त्या दिवसांचे गॅलरीतील सीसीटीव्ही फुटेज मागवण्याची विनंती न्यायालयाला केली.

४ जानेवारी रोजी न्यायाधीश साहिल मोंगा यांनी सांगितले की, तपास अधिकाऱ्याने दाखल केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की सीसीटीव्ही फुटेज जतन केले होते आणि अहवालाबरोबर सादर केले होते, असे वृत्त ‘दी इंडियन एक्सप्रेस’ने दिले आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत असे आढळून आले की, केवळ कलाकारांचे मूळ कार्य प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन एका खासगी जागेत आयोजित केले गेले होते. सचदेवा चे बाजू मांडणारे वकील मकरंद आडकर यांनी न्यायालयाला सांगितले की, चौकशी अहवालात नमूद केल्याप्रमाणे ही चित्रे सार्वजनिक ठिकाणी दाखवण्यात आली होती, खासगी ठिकाणी नाही.

तक्रारदार स्वत: प्रत्यक्षदर्शी असल्याचे त्यांनी सांगितले. “सनातन धर्मातील अत्यंत पूज्य देव हनुमान आणि गणेश यांचा चित्रांमध्ये अपमान करण्यात आला. ही अश्लीलता आहे. हा हिंदू देवतांचा अपमान करण्याचा हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण प्रयत्न आहे,” असे सचदेवा यांचे प्रतिनिधित्व करणारे वकील मकरंद आडकर यांनी न्यायालयाला सांगितले. “हजारो लोकांनी आमच्या देवतांना पाहिले. त्यांना उपहासाची वस्तू ठरवण्यात आले,” असे ते पुढे म्हणाले. सचदेवा यांच्या वकिलाने त्यानंतर डीएजीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस)च्या कलम २९९ (दुर्भावनापूर्ण कृत्ये, कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू) अंतर्गत मालक आणि संचालक यांच्यामार्फत एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.

‘डीएजी’ची प्रतिक्रिया काय?

या वादाला उत्तर देताना डीएजीने सांगितले की, ते चौकशीत पोलिसांना मदत करत आहेत. त्यांनी पुढे नमूद केले की, तब्बल पाच हजार लोकांनी प्रदर्शनाचा आनंद घेतला आणि प्रेस तसेच लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. कलादालनाने पुढे निदर्शनास आणून दिले की, प्रदर्शनातील कोणत्याही कलाकृतीवर आक्षेप घेणारा तक्रारकर्ता एकमेव होता. “तक्रारकर्त्याने स्वत: सोशल मीडिया व टेलिव्हिजन न्यूज मीडियावर रेखाचित्रांच्या प्रतिमा प्रदर्शित आणि प्रसिद्ध केल्या आहेत. त्याच प्रतिमांनी त्यांच्या वैयक्तिक धार्मिक भावना दुखावल्या आहेत,” असेही ते पुढे म्हणाले.

त्यात म्हटले आहे की तपशीलवार पोलीस तपासात गॅलरीद्वारे कोणताही गुन्हा आढळला नाही. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’नुसार, ‘डीएजी’ने मंगळवारी सांगितले, “नुकत्याच झालेल्या प्रदर्शनात एम. एफ. हुसेन यांच्या काही निवडक चित्रांची तपासणी बाकी आहे. डीएजी परिस्थितीचा आढावा घेत असून, सल्ला घेत आहे. आम्ही आतापर्यंतच्या कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी नाही. आमच्याकडे असलेल्या समस्यांबद्दल नवीन माहिती मिळताच आम्ही आपल्याला कळवू.”

एम. एफ. हुसेन यांच्याभोवती फिरणारे वाद

पद्मविभूषणने सन्मानित एम. एफ. हुसेन यांना ‘भारताचा पिकासो’ म्हणून ओळखले जाते. धर्माभिमानी मुस्लिम असणाऱ्या एम. एफ. हुसेन यांनी रामायण, महाभारत, करबलाची लढाई, शीख साहित्य व ख्रिश्चन धर्म यांच्यापासून प्रेरित चित्रे तयार केली, असे ‘द प्रिंट’च्या वृत्तात नमूद आहे. भारतीय आधुनिक कला जागतिक नकाशावर आणण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांच्या बहुतेक कलाकृतींची प्रशंसा झाली; परंतु काही वादग्रस्तही ठरल्या. हुसेन यांना आक्षेपार्हतेचा सामना करावा लागला आणि हिंदू देवीच्या चित्रासाठी त्यांच्यावर अश्लीलतेचा आरोप केला गेला. २००६ मध्ये त्यांनी भारतमातेच्या नग्न चित्रासाठी जाहीर माफी मागितली. हुसेन यांनी त्याच वर्षी भारत सोडला आणि ते लंडनला स्थायिक झाले.

हेही वाचा : IPO लिस्ट होण्यापूर्वी करता येणार ट्रेडिंग, सेबी नवीन प्लॅटफॉर्म सुरू करणार? याचा गुंतवणूकदारांना कसा होणार फायदा?

दोन वर्षांनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या भारतमातेच्या चित्रामुळे जनभावना दुखावल्याचा आरोप करीत तीन खटले दाखल केले. सर्वोच्च न्यायालयाने २००८ मध्ये हुसेन यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करण्यास नकार देऊन, त्यांना मोठा दिलासा दिला. ‘बीबीसी’ वृत्तानुसार या निर्णयात न्यायालयाने नमूद केले की, त्यांची चित्रे अश्लील नाहीत आणि भारतीय प्रतिमा व इतिहासात नग्नता सामान्य आहे. “असे अनेक विषय, छायाचित्रे व प्रकाशने आहेत. या सर्वांवर गुन्हे दाखल करणार का? मंदिराच्या वास्तूंचे काय? हुसेन यांचे कलाविषयक काम आहे. जर तुम्हाला ते पाहायचे नसेल, तर ते पाहू नका. मंदिराच्या संरचनेत असे अनेक कला प्रकार आहेत,” असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. भारतात गैरवर्तन, मारहाण आणि अनेक कायदेशीर खटल्यांचा सामना करणाऱ्या हुसेन यांचे २०११ मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी लंडनमध्ये निधन झाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How mf husains paintings are courting controversy again rac