जागतिक तापमान वाढ हा जगासाठी गंभीर विषय बनलेला असतानाच आता आणखी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. सोमवार (३ जुलै) हा जगातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. त्यानंतर सलग मंगळवार आणि बुधवारीदेखील उष्णतेची दाहकता जाणवली. वाढलेली उष्णता आणि हवामानात होत असलेला बदल जगासाठी धोक्याची घंटा असली तरी शास्त्रज्ञांना मात्र यामुळे कोणतेही आश्चर्य वाटत नाही. शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की, हादेखील विक्रम आगामी काळात मोडला जाऊ शकतो. मंगळवारी (४ जुलै) जगाचे सरासरी तापमान १७.१८ अंश सेल्सियस पर्यंत पोहोचल्याची नोंद झाली आहे, अशी माहिती जागतिक तापमानाचे निरीक्षण करणाऱ्या उपग्रहाद्वारे मिळाली आहे. सोमवारी पहिल्यांदा जागतिक सरासरी तापमानाने १७.०१ अंश सेल्सियसचा टप्पा पार केला होता. पुढच्या २४ तासांमध्येच ०.१७ अंशाची विक्रमी अशी तापमान वाढ झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शास्त्रज्ञांनी यावर आधीच सावधानतेचा इशारा दिला होता. स्टँडफोर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ क्रिस फिल्ड यांनी सांगितले की, जागतिक तापमान आपल्याला अतिशय उष्ण भविष्याच्या दिशेने ढकलत आहे. याचा आणखी एक पुरावा यानिमित्ताने मिळाला आहे. राष्ट्रीय महासागर आणि वातवरणीय व्यवस्थापनचे प्रमुख शास्त्रज्ञ सराह कॅपनिक म्हणाल्या की, बुधवारी (दि. ५ जुलै) ३८ दशलक्ष अमेरिकन नागरिकांना उष्णतेचा इशारा देण्यात आला होता. पॅसिफिक महासागरात निर्माण झालेल्या एल निनोच्या प्रभावामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. या प्रक्रियेसाठी जिवाश्म इंधनाचे ज्वलन हे मानवनिर्मित कारण कारणीभूत असल्याचे कॅपनिक यांनी सांगितले.

साधारण जगात ज्या भागांचा थंड प्रदेश म्हणून उल्लेख केला जातो, त्याठिकाणीही उष्णता जाणवू लागली आहे. उत्तर ग्रीनव्हील, ओंटारिओ याठिकाणी बुधवारी ३२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली गेली. ओंटारिओ शहरातील जिल स्टर्डी यांनी सांगितले की, उष्णता एवढी वाढली आहे की, मी उष्णकटिबंधीय देशात राहत असल्याचा भास होत आहे.

१७ अंश सेल्सियस उष्ण आहे का?

१७ अंश सेल्सियस तापमान हे कदाचित अधिक उष्ण वाटणार नाही. पण हे तापमान कोणत्याही एका ठिकाणचे किंवा एका क्षेत्रावरचे नाही. जमीन आणि समुद्राचे एकूण तापमान एकत्र करून त्या दिवसाचा सरासरी तापमानाचा १७ अंश आहे. बर्फाच्छादीत असलेले उत्तर किंवा दक्षिण ध्रुव क्षेत्र आणि उंच पर्वतरांगामध्ये वर्षभर शून्य अंश सेल्सियसच्या खाली तापमान असते. याचाही समावेश सरासरी तापमानात होतो. समुद्राच्या पृष्ठभागावरचे तापमान २१ अंश सेल्सियस एवढे असते, पृथ्वीवरील ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. अंटार्क्टिकचा परिसर वर्षभर बर्फाच्छादित असतो त्याठिकाणचे तापमान उणे ५० अंश सेल्सियस इतके असते. अंटार्क्टिकने पृथ्वीवरील ८.३ टक्के परिसर व्यापला आहे. यामध्ये आर्टिक्ट क्षेत्र आणि उत्तर ध्रुवाचाही समावेश आहे, या परिसराने १.२ टक्के परिसर व्यापला आहे. तर हिमनद्या आणि बर्फाच्या पर्वतरांगानी ०.५ टक्के इतका परिसर व्यापलेला आहे.

याआधी, ३ जून रोजी १७ अंश सेल्सियस पर्यंत तापमान पोहोचले होते. तसेच ऑगस्ट २०१६ रोजी एल निनो सक्रिय झाल्यामुळे १६.९२ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली होती.

एल निनो इम्पॅक्ट

एल निनोचा जेव्हा विकास होत असतो, तेव्हा विक्रमी तापमानाची नोंद होते, यात काही आश्चर्य नाही. जागतिक हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले की, पूर्व विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरात एल निनोचा प्रभाव वाढत असल्यामुळे हे वर्ष कदाचित नेहमीपेक्षा उष्ण असण्याची शक्यता आहे. जागतिक हवामान विभागाचे सरचिटणीस पेट्टेरी तलास यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले की, एल निनोचा प्रभाव जसा जसा वाढत जाईल, तसे उष्णतेचे विक्रम मोडले जातील आणि जगातील काही भागात आणि काही ठिकाणच्या समुद्राच्या भागात कमालीची उष्णता जाणवेल.

मरिन विद्यापीठाच्या क्लायमेट रिअॅनलायजर प्रोजेक्टने सोमवार (३ जुलै) आणि मंगळवारी (४ जुलै) रोजी जी विक्रमी तापमानाची नोंद झाली होती, त्याची आकडेवारी क्लायमेट फोरकास्ट सिस्टिम ऑफ द नॅशनल सेंटर्स फॉर एनव्हार्यमेंटल प्रेडिक्शन (NCEP) च्या माध्यमातून मिळवली होती. NCEP हा राष्ट्रीय महासागर आणि वातवरणीय व्यवस्थापनचा भाग आहे.

काहींना धोका, तर काहींना दिलासा

तापमानात वाढ ही जगभरातील लोकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. जेव्हा उकाडा वाढेल, तेव्हा मानवांना विविध शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागेल. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांचा त्याचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. “लोकांना आणि आपल्या शरीराला अद्याप याची सवय नाही”, अशी प्रतिक्रिया इरिनान सॅफेल यांनी दिली. सॅफेल ॲरिझॉना राज्यातील हवामानतज्ज्ञ असून तीव्र हवामान आणि हवामान बदल क्षेत्रातील जाणकार आहेत. “वाढत्या तापमानाचा कुणाला अधिक धोका आहे, जाणून घेणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे लोकांच्या शरीराला हायड्रेट ठेवावे लागेल. ज्या लोकांना बाहेर पडून काम करावे लागते, त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. शरीराला अधिक त्रास न देता थंडावा मिळेल, असा प्रयत्न करत राहिले पाहीजे.”, असेही ते म्हणाले.

आपण इथवर कसे पोहोचलो आणि पुढे कुठे जाणार?

युएनचे पर्यावरण कार्यक्रमाचे संचालक इंगेर अँडरसन म्हणाले की, जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक अभूतपूर्व अशी उष्णतेची लाटेला तोंड देत आहेत. आपण विज्ञानाकडे दुर्लक्ष करून मोठी जोखीम उचलली आहे. आपल्या निष्क्रियतेमुळे जगातील गरीब आणि असुरक्षित घटकातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ला निनाचा प्रभाव आता संपत आला असून मागच्या दोन वर्षांपासून तापमानात वाढ होत आहे. २०२३ हे वर्ष सुरुवातीपासूनच अतिशय उष्ण असल्याचे जाणवले आहे. युकेच्या हवामान विभागाने मंगळवारी (४ जुलै) जाहीर केले की, मागचा जून हा सर्वात उष्ण महिना होता. त्याआधी अमेरिकेतील NOAA संस्थेने सांगितले की, यावर्षीचा मार्च महिना हा दुसरा सर्वाधिक उष्ण, मे तिसरा सर्वाधिक उष्ण आणि फेब्रुवारी व एप्रिल महिना चौथा सर्वाधिक उष्ण महिना म्हणून गणला गेला आहे.

तापमान वाढीमुळे कॅनडातील जंगलात वारंवार वणवा पेटण्याच्या घटना घडत आहेत. तर चीनमध्ये काही उष्णतेच्या लाटा पाहायला मिळाल्या. तापमान वाढीमुळे या दोन्ही घटनांच्या शक्यतेमध्ये पाच पटींनी वाढ झाली असल्याचे रॅपिड ॲट्रिब्यूशन स्टडीजच्या अभ्यासातून समोर आले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How monday 3 july and tuesday 4 july have now become the hottest days on earth causes what lies ahead kvg