राहुल खळदकर
भारतीय संस्कृतीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही धार्मिक विधी, अनुष्ठानात नारळ वापरला जातो. गणेशोत्सवात नारळ विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. नवसपूर्तीसाठी गणरायाला नारळांचे तोरण अर्पण केले जाते. एकट्या पुणे-मुंबई शहरात गणेशोत्सवात ४० ते ५० लाखांहून जास्त नारळांची विक्री होते.
नारळाची आवक कोठून होते?
सर्वत्र वापरात असणाऱ्या नारळाची सर्वाधिक लागवड आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांत होते. या राज्यांत नारळाच्या लागवडीस पोषक वातावरण आहे. देशभरात या तीन राज्यांतून नारळ विक्रीस पाठविले जातात. नारळाचे विविध प्रकार आहेत. नवा नारळ, मद्रास, पालकोल, सापसोल या जातीचे नारळ बाजारात उपलब्ध आहेत. तोरणांसाठी शक्यतो नवा नारळ वापरला जातो.
आणखी वाचा-नागपूरमध्ये पावसाने इतका विध्वंस कसा घडवला?
गणेशोत्सवात नारळांची आवक किती?
पुणे-मुंबईतील बाजारपेठेत गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांतून नारळाची आवक सुरू होते. पुण्यातील मार्केट यार्डात दररोज तीन ते पाच हजार पोती नारळाची आवक होते. नवी मुंबईतील वाशी बाजारपेठेत पाच ते सहा हजार पोती नारळाची आवक होते. एका पोत्यात शंभर नारळ असतात. साधारणपणे पुणे-मुंबईतील बाजारात उत्सवाच्या कालावधीत दररोज आठ ते दहा लाख नारळांची आवक बाजारात होते आणि नारळाची विक्री मोठ्या प्रमाणावर होते.
यंदा नारळाची लागवड कशी?
यंदाच्या हंगामात नारळांची लागवड चांगली झाली आहे. नारळाला मागणी चांगली असून, वाहतूक खर्च वाढल्याने नारळाचे दर टिकून राहणार आहेत. नारळांची आवक मोठ्या प्रमाणावर होत असले, तरी दरात घट होणार नाही. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीत नारळाला सर्वाधिक मागणी असते. गणेशोत्सवात सर्वाधिक आवक नव्या नारळाची होते.
आणखी वाचा-कॅनडात शिखांचे प्रमाण एवढे जास्त का? स्थलांतरास कधीपासून सुरुवात झाली?
गणेशोत्सवात कोणत्या नारळाची चलती?
आकाराने छोटा आणि मध्यम असलेला नवा नारळ धार्मिक विधीसाठी वापरला जातो. सत्कार समारंभासाठी नवा नारळ वापरला जातो. तोरण अर्पण करण्यासाठी नव्या नारळाला मागणी असते. आंध्र प्रदेशमधील पालकोल आणि मद्रास नारळाला किराणा माल विक्रेत्यांकडून मागणी असते. मद्रास, सापसोल नारळ आकाराने मोठा असतो. खोबरे चवीला उत्तम असते. करोना संसर्गात तोरणासाठी वापरल्या जाणाऱ्या नव्या नारळाला मागणी कमी होती. करोना संसर्ग कमी झाल्याने गणेशोत्सवात नारळाच्या मागणीत वाढ झाली आहे.
हाॅटेल व्यावसायिक कोणता नारळ वापरतात?
उत्सवाच्या कालवधीत पुणे-मुंबईत भाविक मोठ्या संख्येने येतात. खाद्यपदार्थ विक्रीत मोठी वाढ होते. हाॅटेल-केटरिंग व्यावसायिक, तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून नारळाच्या मागणीत वाढ होते. मोदकासाठी नारळाला मागणी असते. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी सापसोल आणि मद्रास जातीच्या नारळांना मागणी असते. हाॅटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ, मिठाई विक्रेत्यांकडून सापसोल, मद्रास जातीच्या नारळांच्या मागणीत वाढ होते.
आणखी वाचा-युनेस्को: जागतिक वारसा यादीत ‘या’ हिंदू मंदिरांचा समावेश… का महत्त्वाची आहेत ही मंदिरे ?
नारळ विक्रीतून उलाढाल किती?
पूजा, तोरणांसाठी नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. एकट्या पुणे, मुंबई परिसरातच उत्सव कालावधीत दररोज २० ते २५ लाख नारळांची विक्री होत आहे. यंदा गणेशोत्सवात नारळ विक्रीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत प्रकारानुसार २० ते ४० रुपये दरम्यान आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, मुंबईतील लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव, तसेच अष्टविनायकाचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सवात भाविकांची गर्दी होते. अनेक भाविक नवस करतात. नवसपूर्तीसाठी अनेक जण नारळांचे तोरण अर्पण करतात. सण-उत्सवात आर्थिक उलाढाल वाढते. गणेशोत्सवात राज्यभरात नारळ विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
महाराष्ट्रात कांदा आणि दक्षिणेत नारळ?
महाराष्ट्रात कांदा, उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. दक्षिणेकडील राज्यांत नारळाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. नारळ लागवडीतून शेतकऱ्यांना मोठा नफा मिळतो. नारळापासून तेल तयार केले जाते. नारळाच्या शेंड्यापासून कुंचे, पायपुसणी तयार केली जातात. दक्षिणेकडील राज्यातील कृषिव्यवस्थेत नारळ म्हणजे कल्पवृक्ष आहे.
rahul.khaladkar@expressindia.com