गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये राजा चार्ल्स यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्याने अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. या सोहळ्यात अवाढव्य खर्च करण्यात आला. अधिकृत नोंदी दाखवतात की, किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला यांच्या भव्य राज्याभिषेक सोहळ्यासाठी गेल्या वर्षी ब्रिटिश करदात्यांना तब्बल ९०.७ दशलक्ष डॉलर्स इतका खर्च आला. यूके डिपार्टमेंट फॉर कल्चर, मीडिया ॲण्ड स्पोर्ट (डीसीएमएस)ने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी पिढ्यान् पिढ्या चालत आलेला कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाचा उल्लेख केला होता. परंतु, समीक्षकांनी याचा उल्लेख पैशांची उधळपट्टी म्हणून केला होता आणि राजघराण्याला फटकारले होते. विशेषत: अशा काळात जेव्हा देश महत्त्वपूर्ण आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे. राजांच्या राज्याभिषेकात नेमका किती खर्च आला? नवीन अहवालातून काय माहिती समोर आली? त्याविषयी जाणून घेऊ.
राज्याभिषेकात एकूण किती खर्च आला?
६ मे २०२३ रोजी ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांचा भव्य प्रदर्शन सोहळ्यात राज्याभिषेक करण्यात आला. गुरुवारी डिपार्टमेंट फॉर कल्चर, मीडिया ॲण्ड स्पोर्ट (डीसीएमएस)ने आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला, ज्यामध्ये शाही कार्यक्रमाच्या खर्चाचा तपशील देण्यात आला. अहवालात म्हटले आहे की, डीसीएमएसने समारंभासाठी ६३.६ दशलक्ष डॉलर्सची रक्कम प्रदान केली होती, आणखी २७.३ दशलक्ष गृह कार्यालयाने अतिरिक्त सुरक्षा उपाय आणि पोलीस व्यवस्थेवर खर्च केले. सुमारे १०० जागतिक नेते आणि ख्यातनाम व्यक्तींनी लंडनच्या वेस्टमिन्स्टर ॲबे येथे राजाचा औपचारिक राज्याभिषेक प्रत्यक्ष पाहिला. चार्ल्स यांनी ७०० वर्षे राज्याभिषेक सिंहासनावर आसन ग्रहण केले आणि कँटरबरीच्या आर्चबिशपने त्यांच्या डोक्यावर सेंट एडवर्डचा मुकुट घातला. सप्टेंबर २०२२ मध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले.

भव्य राज्याभिषेक सोहळ्यानंतर पुढील रात्री विंडसर कॅसल येथे टेक दॅट आणि ऑली मर्स, कॅटी पेरी व लिओनेल रिची यांसारख्या तारकांचा समावेश असलेली तारांकित राज्याभिषेक मैफल झाली. डीसीएमएसच्या वार्षिक अहवालात आणि खात्यांमध्ये असे म्हटले आहे, “आपली राष्ट्रीय ओळख साजरी करण्याची आणि बळकट करण्याची ब्रिटनला ही अनोखी संधी होती.” प्राप्त माहितीनुसार, अंतिम बिल अद्याप उघड करण्यात आलेले नाही. मात्र, त्याची अंदाजे रक्कम १२५ दशलक्ष डॉलर्स पेक्षा अधिक आहे.
राज्याभिषेकाचा खर्च राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारापेक्षाही कमी
‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, किंग चार्ल्सच्या राज्याभिषेकाचा खर्च २०२२ मध्ये राणी एलिझाबेथवरील शासकीय अंत्यसंस्कार आणि संबंधित समारंभ यांसाठी करण्यात आलेल्या खर्चाच्या फार कमी होता. अंत्यसंस्कारात सुमारे २०४ दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात आले होते. ‘डीसीएमएस’च्या प्रवक्त्याने नमूद केले की, राजाच्या राज्याभिषेकादरम्यान खर्च कमी करण्यासाठीचे सर्व प्रयत्न केले गेले. ते म्हणाले, “राज्याभिषेक हा एक ऐतिहासिक प्रसंग होता; ज्याने देशभरातील लाखो लोक, क्षेत्रे यांना एकत्र आणले.” ते पुढे म्हणाले, “हा एक महत्त्वाचा राजनयिक कार्यक्रम होता. ब्रिटनला जागतिक मंचावर आणणारा आणि सर्वोत्कृष्ट ब्रिटिश संस्कृती व सर्जनशीलतेचे जगासमोर प्रदर्शन करण्याची ही संधी होती. राज्याभिषेकाचा खर्च कमी करण्याच्या निर्णयाचा हेतू राजघराण्यातील आधुनिकीकरणाचा अंश प्रतिबिंबित करणे हा होता. विशेषत: ज्या काळात सामान्य नागरिकांना महागाई आणि वाढत्या राहणीमानाच्या खर्चाचा सामना करावा लागतो. परंतु, त्यांचे सांगणे होते की, या उत्सवामुळे देशभरात आर्थिक वाढ होईल.

हेही वाचा : लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला कैद करण्यात आलेल्या तुरुंगात भुतं? काय आहे ‘स्क्विरल केज जेल’चा इतिहास?
राज्याभिषेकातील खर्चावर टीका
राज्याभिषेकाचा खर्च सार्वजनिक झाल्यानंतर समीक्षकांनी राजघराण्यावर टीका सुरू केली आहे. या कार्यक्रमाला करदात्यांच्या पैशाचा दुरुपयोग, असे संबोधण्यात आले आहे. प्रजासत्ताकाचे सीईओ ग्रॅहम स्मिथ यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले, “एखाद्या व्यक्तीच्या संचलनावर खर्च करण्यासाठी ही खूप मोठी रक्कम आहे. विशेषतः देशातील जनतेला अत्यावश्यक सेवांमध्ये कपातीचा सामना करावा लागत असताना.” गेल्या वर्षभरातील जागतिक संघर्षांमुळे वाढलेल्या चलनवाढीसह देश महामारीनंतरच्या आर्थिक दबावांशी झुंजत आहे. आर्थिक वाढ ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे राज्याभिषेकापूर्वी ‘YouGov’द्वारे सर्वेक्षण केलेल्या अर्ध्याहून अधिक ब्रिटिश नागरिकांचा असा विश्वास होता की, सरकारने या कार्यक्रमासाठी निधी देऊ नये. “ही एक उधळपट्टी होती; ज्याची आम्हाला गरज नव्हती. मोठ्या प्रमाणात गरिबीचा सामना करणाऱ्या देशामध्ये, संकटाच्या मध्यभागी ही गोष्ट अनावश्यक आणि पैशाचा निव्वळ अपव्यय करणारी होती,” अशी टिप्पणी स्मिथ यांनी केली. ते पुढे म्हणाले, “जेव्हा मुलांना शाळेत जेवण देणे परवडत नाही, तेव्हा या परेडवर ९० दशलक्ष डॉलर्स खर्च करणे पूर्णपणे चुकीचे आहे.”