प्रियंका गांधी-वढेरा या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत रिंगणात उतरणार आहेत. राहुल गांधी हे लोकसभा निवडणुकीत वायनाडबरोबरच उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून विजयी झाले. राहुल यांनी रायबरेली मतदारसंघ राखण्याचा निर्णय घेऊन बहिणीसाठी वायनाड मतदारसंघ सोडला. अर्थात हे अपेक्षितच होते. निवडणुकीपूर्वीच पक्षातून तसेच सूचित करण्यात आले होते. त्यामुळे आता ५२ वर्षीय प्रियंका गांधी यांचे दक्षिणेतून निवडणुकीच्या राजकारणात पदार्पण होईल. आणखी एक गांधी यानिमित्ताने भारताच्या सक्रिय राजकारणात उतरत आहे.

वायनाड सुरक्षित मतदारसंघ

जवळपास ४१ टक्के मुस्लिम मतदार असलेल्या उत्तर केरळमधील वायनाड मतदारसंघ काँग्रेससाठी सुरक्षित मानला जातो. येथे १३ टक्के ख्रिश्चन व साधारण ४५ टक्के हिंदू मतदारांची संख्या आहे. वायनाड मतदारसंघात २०१४ मध्ये काँग्रेस पक्षाला विजयासाठी संघर्ष करावा लागला. मात्र २०१९मध्ये राहुल गांधी हे वायनाडमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. तर अमेठीत पराभूत झाले होते. यंदा राहुल गांधी हे वायनाडबरोबरच रायबरेलीतून विजयी झाले. लोकसभेला उत्तर केरळमध्ये असलेल्या लोकसभेच्या ९ पैकी ८ जागा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने जिंकल्या. केरळमध्ये दोन वर्षांनी विधानसभा निवडणूक आहे. राज्यात गेली आठ वर्षे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीचे सरकार आहे. प्रियंका येथून लोकसभेवर जाण्याने वेगळा संदेश जाईल, त्याचा फायदा काँग्रेसला मिळेल. यंदा केरळमधील लोकसभा निकाल पाहता २०२६ मध्ये विधानसभेत काँग्रेसची सत्ता अपेक्षित आहे. राज्यातील लोकसभेच्या २० जागांपैकी १८ जागा या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला मिळाल्या. त्यात काँग्रेसला १४, मुस्लीम लीगला २ तर केरळ काँग्रेस व आरएसपी प्रत्येकी १ अशा या जागा आहेत. तर विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. राज्यात लोकसभेला भाजपला पहिल्यांदाच खाते उघडता आले. 

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “इंदिरा गांधी मोठ्या नेत्या, पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

हेही वाचा >>>विश्लेषण: संत्र्याच्या बागांवरील संकट केव्हा दूर होणार?

उत्तर प्रदेशातील गणिते

उत्तर प्रदेशातील रायबरेली हा मतदारसंघ सोडणे राहुल यांना कठीण आहे. तेथे २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होत असून, भाजपच्या विरोधात समाजवादी पक्ष-काँग्रेस ही आघाडी मैदानात उतरेल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे राहुल यांनी आपल्या कुटुंबीयांचा पारंपरिक रायबरेली मतदारसंघ राखला. गेली दोन दशके प्रियंका रायबरेली-अमेठी या गांधी कुटुंबीयांच्या अमेठी तसेच रायबरेली मतदारसंघात प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. तर सक्रिय राजकारणात पक्ष संघटनेतील महत्त्वाचे असे सरचिटणीसपद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे यंदाच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या रिंगणात उतरतील अशी चर्चा होती. मात्र अखेर पोटनिवडणुकीच्या मार्गाने त्या संसदेत पोहचतील अशी चिन्हे आहेत. 

विजय औपचारिकता?

वायनाडमध्ये आता डावी आघाडी उमेदवारी देणार काय, हा मुद्दा आहे. भाजपची येथे फारशी ताकद नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना येथून एक लाख ४१ हजार मते मिळाली. तर राहुल गांधी यांना ६ लाख ४७ हजार, त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ॲनी राजा यांना दोन लाख ८३ हजार मते पडली. यावरून काँग्रेसचा या मतदारसंघातील प्रभाव लक्षात येतो. काँग्रेसचा राज्यातील मित्रपक्ष असलेला मुस्लीम लीगचे येथे भक्कम संघटन आहे. त्यामुळे वायनाडमध्ये प्रियंका यांचा विजय ही औपचारिकता मानली जाते.

हेही वाचा >>>वेळेआधी दाखल होऊनही महाराष्ट्रात मोसमी पावसाची वाटचाल का मंदावली? बरसणार केव्हा?

कुटुंबाचे दक्षिणेशी नाते

गांधी कुटुंबात उत्तरेबरोबरच दक्षिणेतील अन्य एका ठिकाणावरून लढण्याची परंपरा आहे. इंदिरा गांधी या कर्नाटकातील चिकमंगळूर येथे नोव्हेंबर १९७८ मध्ये पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. याखेरीज १९८० मध्ये तत्कालीन आंध्र प्रदेशातील मेडक मतदारसंघातूनही त्यांना यश मिळाले होते. तर सोनिया गांधी १९९९ मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठीबरोबरच कर्नाटकातील बेल्लारी येथूनही लोकसभेवर विजयी झाल्या होत्या. एकूणच दक्षिणेकडे गांधी कुटुंबीयांना भरघोस पाठिंबा मिळाला आहे. आजी आणि आईपाठोपाठ प्रियंका या दक्षिणेतून लोकसभेत जाण्याच्या प्रयत्नात आहेत. संसदेत गांधी कुटुंबाचे तीन सदस्य दिसतील. सोनिया गांधी या राज्यसभेत आहेत. तर लोकसभेत राहुल व प्रियंका हे भाऊ-बहीण असतील. वायनाडच्या मतदारसंघात अजून पोटनिवडणूक जाहीर व्हायची आहे. मात्र मतदारसंघातील समीकरणे पाहता प्रियंका यांना ही लढत फारशी कठीण जाणार नाही. प्रियंका या वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात रिंगणात उतरतील अशी चर्चा होती. याखेरीज अमेठी, रायबरेली येथून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र या दोन्ही मतदारसंघात त्यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराची सूत्रे सांभाळली. गेल्या वर्षी झालेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयात प्रियंका यांचा महत्त्वाचा वाटा होता.

संसदेत नवे सत्ताकेंद्र?

प्रियंका या विजयी झाल्यावर विरोधकांच्या गटात संसदेत आणखी एक सत्ताकेंद्र निर्माण होईल काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. दोन निवडणुकांनंतर यंदा संसदेत विरोधकांचे बळ सत्ताधाऱ्यांना लोकसभेत जेरीस आणेल इतपत आहे. विरोधी पक्षनेतेपद प्रियंका यांना मिळणार नाही हे उघड आहे. मात्र त्यांचे पक्षातील स्थान पाहता विरोधी पक्षनेत्याप्रमाणेच काँग्रेस संसदीय पक्षात त्यांचे एक स्थान निर्माण होईल काय? प्रचारात प्रियंका यांच्या टीकेचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होता. त्यांच्या प्रचारसभांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता संसदेत त्यांच्या कामगिरीची उत्सुकता असेल. याखेरीज उत्तरेकडील राज्यांबरोबरच दक्षिणेतून आम्ही विजयी होऊ शकतो असे सांगण्याची अप्रत्यक्ष संधी काँग्रेसला या निमित्ताने मिळेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांना दक्षिणेतून उभे राहण्यासाठी विरोधकांनी आव्हान दिले होते. राहुल गांधी यंदा दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले. आता प्रियंका यांच्या उमेदवारीने गांधी कुटुंबाचे दक्षिण भारतातून लोकसभेला उभे राहण्याची परंपरा कायम राहिली आहे.

hrishikesh.deshpande@expressindia.com

Story img Loader