प्रसिद्धी व प्रकाशझोतापासून कायम दूर राहिलेले नोएल टाटा यांच्याकडे दिवंगत रतन टाटा यांनी उद्योग क्षितिजावर गाठलेली उंची आणि वलय नाही, हे ते स्वतःदेखील मान्य करतात. परंतु त्यांनी यशस्वीपणे चालविलेल्या कंपन्यांतून त्यांनी त्यांच्या नेतृत्वगुणाची धमक दाखवून दिली आहे. त्यांच्याकडे आता १६५ अब्ज डॉलरची महसुली उलाढाल असलेल्या टाटांच्या उद्योग साम्राज्याचे दिशादर्शन करणाऱ्या टाटा न्यासांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. जागतिक आणि देशांतर्गत आव्हानांमधून टाटा समूहाच्या मार्गक्रमणासाठी त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार, हे निश्चितच…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रतन टाटा यांचे उत्तराधिकारी…

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनानंतर, त्यांच्याकडे अध्यक्षपद असलेल्या टाटा न्यासांवर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ६८ वर्षे वय असलेले नोएल टाटा यांचेच नाव प्राधान्याने चर्चेत होते. टाटा कुटुंबातील सदस्य असणे आणि समूहातील अनेक कंपन्यांचे त्यांनी केलेले यशस्वी नेतृत्व पाहता तेच सशक्त दावेदारही होते. दिवंगत रतन टाटा हे नवल टाटा आणि त्यांची पहिली पत्नी सुनी टाटा यांचे पुत्र होते. तर, नोएल हे नवल टाटा आणि त्यांची दुसरी पत्नी सिमोन टाटा यांचे पुत्र अर्थात रतन टाटा यांचे सावत्र बंधू. जिमी टाटा हे रतन टाटा यांचे आणखी बंधू, पण त्यांना कुटुंबांच्या व्यवसायात स्वारस्य नाही आणि त्यांचा कोणत्याही कंपन्यांत सहभागही नाही. शिवाय अविवाहित राहिल्याने, रतन टाटा यांना अपत्य अथवा वारसदार असण्याचा प्रश्नच नव्हता. त्याचप्रमाणे नोएल हे सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट या प्रमुख न्यासाच्या संचालनात २०१९ पासून कार्यरत होते. हे सर्व घटक पाहता, नुकतीच वेगवेगळ्या टाटा न्यासांच्या विश्वस्तांच्या संयुक्त बैठकीतून टाटा न्यासांच्या प्रमुखपदासाठी त्यांच्या नावावर संपूर्ण सहमतीने शिक्कामोर्तबही केले गेले.

हेही वाचा >>>विश्लेषण : एके काळी सर्वोत्तम, आता गच्छंती… पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमवर अशी वेळ का आली?

टाटा न्यासांचे प्रमुख म्हणून भूमिका काय?

टाटा समूहातील वेगवेगळ्या कंपन्यांची सूत्रे हाती असलेल्या टाटा सन्सचे तब्बल ६६ टक्के भागभांडवल हे वेगवेगळ्या टाटा न्यासांकडे आहे. या न्यायाने टाटा न्यासांकडे टाटा समूहाची मालकी आहे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. त्यामुळे टाटा न्यासांचे अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांची भूमिका ही सबंध टाटा समूहाचे नियंत्रक, रक्षक, मार्गदर्शक आणि धोरणकर्ते अशी असेल. टाटा सन्स अथवा समूहातील कोणत्याही कंपनीत काही चुकीचे अथवा विपरीत घडत असेल, तर त्यांचा हस्तक्षेप महत्त्वाचा ठरेल. दिवंगत सायरस मिस्त्री यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत घेतलेले निर्णय हे समूहाच्या हिताला बाधक असल्याचे लक्षात आल्यावर, तत्कालीन टाटा न्यासांचे अध्यक्ष या नात्याने रतन टाटा यांनी असाच हस्तक्षेप करत, मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर केले जाईल हे पाहिले आहे.

नोएल यांचे उद्यमी कर्तृत्व वादातीत…

ससेक्स विद्यापीठातून पदवी आणि फ्रान्समधून व्यवसाय व्यवस्थापनाचे पदव्युत्तर शिक्षण मिळविलेले नोएल टाटा हे सध्या टाटा समूहात ट्रेन्ट लिमिटेड, व्होल्टास, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि टाटा इंटरनॅशनल या कंपन्यांचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. टाटा स्टील आणि टायटन या कंपन्यांचे उपाध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात टाटा इंटरनॅशनलमधून केली आणि नंतर १९९९ मध्ये ते ट्रेंटचे व्यवस्थापकीय संचालक बनले. टाटा समूहाच्या किराणा व्यवसायात विस्तार आणि या क्षेत्रातील दमदार स्पर्धक म्हणून पुढे आणण्यात नोएल यांचे नेतृत्व आणि कर्तब कामी आले आहे. फॅशन परिधानांचे साखळी दालन ‘वेस्टसाइड’च्या दक्षिण मुंबईतील एका दालनापासून याला सुरुवात झाली. आज ते नेतृत्व करीत असलेल्या ट्रेंटच्या अधिपत्याखाली विविधांगी ८२३ दालनांचे महाकाय जाळे विस्तारले आहे. ट्रेंटच्या सर्वात मोठ्या यशांपैकी एक म्हणजे २०१६ साली सुरू झालेले झुडियो हे दालन शृंखला होय. आज झुडियो ही भारतातील सर्वात मोठी परिधान विक्रेती नाममुद्रा बनली आहे. दालनाची संख्या आणि महसुलाच्या बाबतीत वेस्टसाइडलाही तिने मागे टाकले आहे. तर ट्रेंटच्या एकूण महसुलात एक तृतीयांशाहून अधिक तिचे योगदान आहे. ब्रिटिश नाममुद्रा टेस्कोशी भागीदारी करत, मुंबई, बेंगळुरू, अहमदाबाद आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये स्टार बाजार, स्टार डेली, स्टार मार्केट या नावाने वाण-सामानांची दालने सुरू झाली आहेत. ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या विक्रीचे क्रोमाची देशभरातील १३० शहरांमध्ये विस्तारलेली ४०० दालने देखील नोएल यांच्या संकल्पना आणि देखरेखीत घडले आहे. शिवाय फॅशन परिधान क्षेत्रातील झारा, वैयक्तिक निगा क्षेत्रातील सिस्ले आणि पादत्राणे उत्पादक वूल्व्हरिन या सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय नाममुद्रांचा भारतात वावर सुरू होण्यामागे देखील नोएल टाटा यांचीच कल्पकता आहे.

हेही वाचा >>>मुंबईतील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी कायमची की तात्पुरती?

शापूरजी पालनजी समूहाशी जुळवणी?

नोएल टाटा यांच्याकडे नेतृत्व आल्यामुळे टाटा समूह आणि शापूरजी पालनजी (एसपी) समूह यांच्यातील ताणलेले संबंध काहीसे निवळण्याची आशा आहे. टाटा सन्समध्ये एसपी समूह हा १८.४ टक्के हिस्सेदारीसह सर्वात मोठा खासगी भागधारक आहे. शापूरजी पालनजी कुटंबातील दिवंगत सायरस मिस्त्री यांच्या २०१६ मधील टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून झालेल्या हकालपट्टीने या दोन कुटुंबातील वाद वाढला आहे. सायरस मिस्त्री यांची बहीण आलू मिस्त्री ही नोएल टाटा यांची पत्नी आहे. हे नाते एसपी समूहाशी त्यांचे संबंध दृढ करणारेही आहे. एसपी समूहाने टाटा सन्समधील भागभांडवल तारण ठेऊन केलेली कर्जउचल याबाबतही टाटा समूहाची नाराजी आहे. या संबंधाने दोन समूहात न्यायालयीन संघर्ष सुरू होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने एसपी समूहाची बाजू उचलून धरणारा कौल दिला. नोएल टाटांकडे नेतृत्व आल्याने या संबंधाने अडसरही दूर होतील आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या एसपी समूहावरील वित्तीय ताण कमी होणे अपेक्षित आहे.

sachin.rohekar@expressindia.com