अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी शरिफुल इस्लाम शहजाद ऊर्फ विजय दास (३०) याला ठाण्यातून अटक करण्यात पोलिसांना अखेर मुंबई पोलिसांना यश आले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि मोबाइल पेमेंटचा आधार घेत सैफ अली खानच्या घरापासून अगदी वरळीपर्यंत माग पोलिसांनी काढला. मग ठाण्यातील झुडुपात लपलेल्या आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई पोलिसांनी शेकडो सीसीटीव्हींचे चित्रीकरण तपासले. या ७० तासांच्या शोधमोहिमेचा आढावा.

सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी कुठे गेला?

वांद्रे येथील सदनिकेत सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी शरिफुल बराच काळ वांद्रे परिसरात फिरत होता. त्यानंतर लकी जंक्शन येथून वांद्रे रेल्वे स्थानकावर आरोपी गेला. तेथून त्याने लोकलद्वारे दादर स्थानक गाठले. त्यावेळी कबुतरखाना येथील मोबाइल वस्तूंच्या दुकानातून आरोपीने हेडफोन खरेदी केला. पण त्यावेळी त्याने रोख रक्कम दिली होती. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा माग काढला असता शरिफुल वरळी बावन्न चाळ परिसरातील सेंच्युरी मिल येथील एका टपरीवर बराच काळ रेंगाळल्याचे दिसले. यावेळी वरळी परिसरातही आरोपी गेला होता.

हे ही वाचा… व्हाईट हाऊस हल्ल्याप्रकरणी भारतीय वंशाचा माणूस अटकेत; साई वर्षित कंदुला कोण आहे?

महत्त्वाची माहिती कशी मिळाली?

आरोपी दोन वेळा भुर्जी व पराठा विकणाऱ्या टपरीवाल्याशी बोलतानाही सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसून आले. त्यानंतर गुन्हे शाखेची पथके त्या परिसरात तैनात करण्यात आली. त्यांनी टपरीवाल्याची माहिती घेतली असता त्याचे नाव नवीन एक्का असल्याचे कळले. तसेच तो वरळी कोळीवाड्याच्या जवळील जनता कॉलनीत राहतो अशी माहिती पोलिसांना मिळाली. शरिफुल हा टपरीवाल्याचा मित्र असल्याच्या संशयावरून ७ पोलीस पथके वरळी कोळीवाडा परिसरात शनिवारी फिरत होती. वरळी कोळीवाडा बस थांब्याजवळील विक्रेत्यांना आरोपीचे छायाचित्र दाखवून त्याची चौकशी पोलीस करत होते. त्यावेळी टपरीवाला नवीन एक्का हा जनता कॉलनीतील जयहिंद मित्र मंडळातील ६८५ क्रमांकाच्या घरात राहतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी तपासणी केली असता घर बंद होते. शेजाऱ्यांनाही नवीन एक्काबाबत माहिती नव्हती. परंतु ते घर राजनारायण प्रजापती यांचे असल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना साांगितले. तसेच त्याचा मुलगा विनोद प्रजापती यांचा मोबाइल क्रमांक दिला. प्रजापती यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधला असता त्यांनी एका टपरीवाल्याला घर भाड्याने दिल्याचे सांगितले. टपरीवाल्याची चौकशी केली असता आरोपीने मोबाइलद्वारे पैसे भरल्यामुळे पोलिसांना आरोपीचा मोबाइल क्रमांक मिळाला. त्यानंतर प्रजापती यांच्या घरात राहणाऱ्या टपरीवाल्याला पोलिसांनी बोलावले. त्यांच्याकडून आरोपीचा मोबाइल क्रमांक पोलिसांच्या हाती लागला.

पोलीस ठाण्याला कसे पोहोचले?

मोबाइल क्रमांकाच्या माध्यमातून शरिफुल ज्या व्यक्तींच्या संपर्कात होता, त्या व्यक्तींची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून आरोपी काही काळ ठाण्यात कामाला असल्याची माहिती मिळाली. ठाण्यात आरोपीच्या शोधासाठी वीसहून अधिक पथके आणि १०० हून अधिक पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले. रात्री १० वाजता आरोपीने आपला मोबाइल बंद केल्यानंतर पोलिसांनी प्रत्येक घराची तपासणी करण्यास सुरुवात केली पण त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यावेळी पोलिसांनी तेथील लेबर कँपमधील झुडुपांमध्ये शोध घेतला. सुरुवातीला तेथे कोणी दिसले नाही. पण पोलिसांनी पुन्हा पाहणी केली. त्यावेळी झुडुपांमध्ये कोणी झोपल्याचे दिसून आले. पोलीस पथक तेथे जवळ गेले असता आरोपी पळू लागला. अखेर शोध मोहिमेदरम्यान उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने त्याचा पाठलाग करून आरोपीला पकडले.

हे ही वाचा… Indira Gandhi: मलूल चेहरा, कोमेजलेलं गुलाब ते म्हातारी चेटकीण; पंतप्रधानपदी भारतीय महिला का ठरली होती चर्चेचा विषय?

आता पुढे काय होणार?

शरिफुलला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात पोलीस शरिफुलला घटनास्थळी नेऊन सर्व प्रकरणाची पडताळणी करणार आहेत. याशिवाय सैफ अली खान याचाही जबाब याप्रकरणी नोंदवण्यात येणार आहे. शरिफुलला पहिल्यांदा पाहिलेली सैफची नर्स लिमा यांच्याकडून आरोपीची ओळख पटवली जाईल. सैफवर हल्ला करण्यासाठी आरोपीने वापरलेल्या चाकूचे दोन तुकडे पोलिसांनी जप्त केले आहेत. तिसऱ्या तुकड्याच्या शोधासाठी पोलीस आरोपीची चौकशी करतील. याशिवाय आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्यामुळे तो भारतात कसा आला, त्याने विजय दास नाव का बदलले, याबाबत पोलीस तपास करणार आहेत. या प्रकरणी आरोपीला भारतीय कागदपत्रे बनवण्यात कोणी मदत केली, याचीही तपासणी करण्यात येईल.

Story img Loader