How Net Run Rate is Calculated T20 World Cup 2022 Pakistan: टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानचा झिम्बाब्वेनं एका धावेने पराभव केल्यामुळे आता पाकिस्तानचं उपांत्यफेरीतील स्वप्न धुसर झालं आहे. मात्र नेट रन रेटच्या जोरावर पाकिस्तानला अजूनही या स्पर्धेत टिकून राहण्याची संधी आहे. आपले उर्वरित सर्व सामने जिंकणे, भारताने त्यांचे सर्व सामने जिंकणे, दक्षिण आफ्रिकेचा आणि झिम्बाब्वेचा त्यांच्या उर्वरित सामन्यांपैकी किमान दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्यास पाकिस्तानला उपांत्यफेरीमध्ये दाखल होता येईल. मात्र या साऱ्यामध्ये नेट रन रेटचाच सर्वाधिक वाटा असेल. नेट रन रेटवर अशाप्रकारे एखादा संघ पुढील फेरीसाठी पात्र होणार की नाही हे ठरवण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही इंडियन प्रिमियर लिगमध्येही अशाप्रकारची परिस्थिती अनेकदा निर्माण झाली जेव्हा समान गुण असतानाही नेट रन रेटच्या आधारे संघ पात्र, अपात्र ठरले आहेत. पण अनेकदा चर्चेत असणारं नेट रन रेट हे प्रकरण आहे तरी का? ते मोजतात कसं? यामध्ये केवळ धावांचा विचार केला जातो का? किती गडी बाद झाले किती षटकांचा खेळ झाला याचा काही विचार यामध्ये केला जातो का? यासारखे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडतात. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा केलेला हा प्रयत्न…
नेट रन रेटची तोंड ओळख…
नेट रन रेट म्हणजेच गुणतालिकेमध्ये एनआरआर या मथळ्याखाली सामान्यपणे सर्वात उजवकीडे दिसणारे आकडे असं सांगितल्यास लगेच उणे किंवा अधिकमधील आकडेवारी तुमच्या डोळ्यासमोर येईल. मागील अनेक दशकांपासून ही पद्धत सामान्यपणे दोन किंवा तीनहून अधिक संघ खेळत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सामाना अनिर्णित राहिला किंवा पुढील फेरीसाठी संघांना पात्र अपात्र ठरवण्यासाठी वापरली जाते. अनेकदा या नेट रन रेटच्या आधारावर संघांची वाटचाल अवलंबून असते. खास करुन विश्वचषक किंवा जागतिक कसोटी मालिकेसारख्या स्पर्धांमध्ये या नेट रन रेटचा फार मोठा वाटा असतो. अनेकांना हा काय प्रकार असतो हे कळत नाही. पण तसं याचं गणित फार सोप्प आहे.
कसं ठरतं नेट रन रेट?
संघाच्या निव्वळ धावगतीचा दर म्हणजेच नेट रन रेट हा संपूर्ण स्पर्धेचा विचार करुन ठरवला जातो. एखाद्या संघाने संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक षटकामध्ये केलेल्या सरासरी धावांमधून त्या संघाविरुद्ध प्रति षटक सरासरी किती धावा करण्यात आल्या हे वजा करून मोजला जातो.
नक्की वाचा >> Zimbabwe Beat Pakistan: “पुढच्या वेळेस…”; झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांनीही पाकिस्तानची लाज काढली; ‘ती’ पोस्ट चर्चेत
पूर्ण षटकं खेळण्याआधीच संघ बाद झाला तर काय?
एखाद्या सामन्यामध्ये संपूर्ण षटकं न खेळताच पूर्ण संघ तंबूत परला तर अशा स्थितीमध्ये नेट रन रेट हे संपूर्ण षटकांचा विचार करुन मोजला जातो. म्हणजेच २० षटकांच्या सामन्यामध्ये एखादा संघ १५ षटकांमध्येच बाद झाला तरी नेट रन रेट मोजताना संपूर्ण २० षटकं ग्राह्य धरली जातात. तो संघ किती षटकांमध्ये बाद झाला हे अशावेळी नेट रन रेट मोजताना ग्राह्य धरलं जात नाही.
कोणत्या सामन्यांचं नेट रन रेट काढलं जात नाही?
ज्या सामन्यांचा पूर्ण निकाल लागतो त्याच सामन्यांचा नेट रन रेट मोजला जातो. ज्या सामन्यांचा निकाल लागत नाही म्हणजेच जे अनिर्णित राहतात त्यांचा विचार नेट रनरेटमध्ये केला जात नाही. गुण वाटून दिले तरी त्याचा फरक नेट रन रेटवर पडत नाही. तो आधीच्या सामन्यांनुसार ग्राह्य धरला जातो. जेव्हा सामना रद्द केला जातो, परंतु डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल दिला जातो त्यावेळी, एनआरआर मोजण्यासाठी दुसऱ्या टीमनं खेळ थांबला, त्यावेळेपर्यंत झालेल्या षटकांमध्ये किती धावा केल्या तितक्या धावांचा विचार पहिल्या टीमसाठी केला जातो. सामना पूर्ण होतो, परंतु तो संपायच्या आधी डकवर्थ लुईसचा वापर केला गेला असेल तर दुसऱ्या टीमला एकूण षटकांमध्ये ज्या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी दिलेलं असेल त्यापेक्षा एक कमी धाव पहिल्या टीमसाठी धरण्यात येते.
नक्की वाचा >> Zimbabwe Beat Pakistan: झिम्बाब्वेच्या संघातून खेळणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजाने मिळवून दिला विजय; ठरला सामनावीर
उदाहरणासकट समजून घेऊयात…
हे अधिक योग्य पद्धतीने समजून सांगण्यासाठी १९९९ च्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपच्या नेट रन रेटचं उदाहरण घेऊयात. दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यावेळी अ गटामध्ये होता. साखळी सामन्यांनतर दक्षिण आफ्रिकेची गुणतालिकेमधील स्थिती खालीलप्रमाणे होती…
एकूण सामने – ३
विजयी सामने – ३
पराभूत सामने- ०
अनिर्णित सामने – ०
एकूण गुण – ६
नेट रन रेट – +१.४९५
ग्राह्य षटकं आणि धावा (फॉर) – ६७८/१४७.२
ग्राह्य षटकं आणि धावा (अगेन्स्ट) – ४६६/१५०
या वरच्या आकडेवारीमध्ये तीन महत्तवाचे आकडे म्हणजे नेट रन रेट, फॉर आणि अगेन्स्टची आकडेवारी. यामधील नेट रन रेटची आकडेवारी ही अगेन्स्ट मधील भागाकारामधून आलेल्या उत्तराला फॉर समोरील भागाकारातून आलेल्या उत्तरातून वजा केल्यानंतर मिळाली आहे. आता हे सविस्तरपणे समजून घेऊयात.
फॉर म्हणजे काय?
दक्षिण आफ्रिकेने तीन संघांविरुद्ध खेळताना केलेल्या धावांची ही आकडेमोड आहे. या तक्त्यामधील आकडेवारी ही भारत, श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतरची आहे. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने कशी कामगिरी केलेली पाहूयात…
भारताविरुद्ध – ६ गडी बाद २५४ धावा (४७.२ षटकांमध्ये)
श्रीलंकेविरुद्ध – ९ गडी बाद १९९ धावा (५० षटकांमध्ये)
इंग्लंडविरुद्ध – ७ गडी बाद २२५ धावा (५० षटकांमध्ये)
या तिन्ही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने एकूण ६७८ धावा केल्या होत्या. यासाठी त्यांनी १४७ षटकं आणि दोन चेंडू घेतले. म्हणजेच सहा चेंडूंचं षटकं पकडलं तर १०० च्या टप्प्यात षटकं ही १४७.३३३ इतकी होतात. याचा भागाकार केल्यास म्हणजेच ६७८ भागीले १४७.३३३ चं उत्तर ४.६०२ इतकं येतं. म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये दक्षिण आफ्रिकेने ४.६०२ धावा केल्या.
अगेन्स्ट म्हणजे काय?
दक्षिण आफ्रिकेवरुद्ध तिन्ही संघांनी किती धावा केल्या याची ही आकडेवारी आहे. या सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघ कसे खेळले पाहूयात
भारत – ५ गडी बाद २५३ धावा (५० षटकांमध्ये)
श्रीलंका – १० गडी बाद ११० धावा (३५.२ षटकांमध्ये)
इंग्लंड – १० गडी बाद १०३ धावा (४१ षटकांमध्ये)
नक्की वाचा >> Video: आनंदी आनंद गडे… सूर्यकुमारने शेवटच्या चेंडूवर Six मारत अर्धशतक पूर्ण केल्यावर कोहलीचं मैदानातच मजेदार सेलिब्रेशन
यापैकी श्रीलंका आणि इंग्लंडचे संघ संपूर्ण षटकांचा खेळ होण्याआधीच बाद झाले. मात्र रन रेटचा विचार करताना या संघांनी संपूर्ण षटकांचा खेळ केला असं ग्राह्य धरलं जातं. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिस्पर्धी संघांचा रन रेट मोजताना ४६६ (२५३+ ११०+ १०३) धावा भागिले १५० (५०+ ५०+ ५०) याचं उत्तर ३.१०७ इतकं येतं. म्हणजेच प्रतिस्पर्ध्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येक षटकाला ३.१०७ धावा केल्या.
नेट रन रेट किती?
आता नेट रन रेटच्या सूत्रानुसार संघाने प्रतिस्पर्ध्याविरोधात केलेल्या धावांच्या सरासरीमधून त्या संघाविरुद्ध करण्यात आलेल्या धावांची सरासरी वजा करायची. त्यामुळेच या वरील आकडेवारीनुसार दक्षिण आफ्रिकेचं नेट रन रेट हे ४.६०२ मधून ३.१०७ वजा केल्यावर मिळणारं उत्तर म्हणजेच १.४९५ असं येईल.