कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारतीय गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचा आरोप केला आहे. भारताने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. जस्टिन यांच्या या विधानानंतर आता भारत आणि कॅनडा यांच्यात तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर हरदीपसिंग निज्जर कोण होता? कॅनडात राहून भारतविरोधी करावाया करणाऱ्या, खलिस्तान चळवळ पुनरुज्जीवित करण्यासाठी पंजाबमधील तरुणांना उद्युक्त करणाऱ्या दहशतवादी संघटनांवर भारताने कशी कारवाई केली? अशा संघटना चालवणाऱ्या निज्जर तसेच इतरांवर काय आरोप आहेत? हे जाणून घेऊ या….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खलिस्तान टायगर फोर्स दहशतवादी संघटना म्हणून घोषित

१ जुलै २०२० रोजी भारत सरकारने खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) या संघटनेविरोधात कठोर कारवाई केली. भारत सरकारने या संघटनेचा हर्षदीपसिंग निज्जर याच्यासह अन्य आठ जणांना दहशतवादी म्हणून घोषित केले. परदेशात राहून भारतविरोधी कारवाया करणे, परदेशातून पंजाबमधील शीख तरुणांना अतिरेकी गटात सामील होण्यास प्रवृत्त करणे या आरोपांखाली भारताने ही कारवाई केली. यातील निज्जर याचा चालू वर्षातील जून महिन्यात गोळ्या घालून खून करण्यात आला. याच वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात भारत सरकारने केटीएफ या संघटनेलादेखील दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. यूएपीए कायद्याअंतर्गत सरकारने ही कारवाई केली.

परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका काय?

हा निर्णय घेताना परराष्ट्र मंत्रालयाने खलिस्तान टायगर फोर्स ही संघटना दहशतवादी पृवत्तीला प्रोत्साहन देते, असे म्हटले होते. “ही एक दहशतवादी संघटना आहे. पंजाबमध्ये दहशतवादाचे पुनरूज्जीवन करण्याचा या संघटनेचा उद्देश आहे. ही संघटना भारताची प्रदेशिक अखंडता, एकता, राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व याला आव्हान देत आहे. तसेच ही संघटना दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देत आहे. पंजाबमध्ये ही संघटना लोकांची हत्या करण्यास प्रोत्साहित करते,” असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.

वेगवेगळ्या संघटनांकडून खलिस्तान चळवळीला प्रोत्साहन

निज्जर याच्यासह अन्य आठ जणांना भारताने दहशतवादी घोषित केलेले आहे. हे सर्वजण वेगवेगळ्या संघटनात कार्यरत असून त्यांनी पंजाबमधील असंतोषाला चालना देण्याचे काम केलेले आहे. अमेरिकेत असलेला ‘शिख्स फॉर जस्टीस’ या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य गुरपतवंत सिंग पन्नू, पाकिस्तानमधील ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ या दहशतवादी संघटनेचा वधवासिंग बब्बर, ‘इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन’ ही संघटना चालवणारा लखबीरसिंह रोडे, पाकिस्तानमधील ‘खलिस्तान झिंदाबाद फोर्स’ या संघटनेचा प्रमुख रणजितसिंग, ‘खलिस्तान कमांडो फोर्स’ संघटनेचा प्रमुख परमजितसिंग, जर्मनीतील ‘खलिस्तान झिंदाबाद फोर्स’ संघटनेचा सदस्य भूपंदरसिंग भिंडा, याच संघटनेशी संबंधित असलेला आणि सध्या जर्मनीत असलेला गुरुमितसिंग, बब्बर ‘खालसा इंटरनॅशनल संघटने’चा प्रमुख असलेला परमजितसिंग अशी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्यांची नावे आहेत.

पंजाबमध्ये दहशतवाद पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न

दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेला गुरपतवंत सिंग पन्नू त्याची संघटना शीख्स फॉर जस्टीसच्या माध्यमातून उघडपणे भारतविरोधी मोहीम राबवत होता. गुरपतवंत सिंह याबाबत परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. “दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेले सर्व नऊ जण हे भारताच्या बाहेर राहून देशविरोधी कृत्य करत होते. भारतातील अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. पंजाबमध्ये दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचा ते प्रयत्न करत होते. विशेष म्हणजे देशविरोधी कृत्य करण्यासाठी ते सर्वजण एकमेकांना मदतही करत होते,” असे शासकीय अधिकाऱ्याने सांगितले.

निज्जर करायचा द्वेषयुक्त, बंडखोरीला चालना देणारी विधाने

“निज्जर हा मूळचा जालंधर येथील भरसिंगपुरा या गावातील रहिवासी आहे. केटीएफ संघटनेला आर्थिक मदत करणे, तरुणांना प्रशिक्षण देणे, या संघटनेचा विस्तार करणे अशा प्रकारच्या कामांत त्याचा समावेश होता. राष्ट्रीय तपास संस्थाने (एनआयए) त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत. तसेच तपासादरम्यान निज्जर याने सोशल मीडिया, फोटो, व्हिडीओंच्या माध्यमातून द्वेषयुक्त, बंडखोरीला चालना देणारी विधाने केलेली आहेत,” असे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

एनआयएला तपास करण्याचे केंद्राचे निर्देश

गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी या संघटना खलिस्तानी चळवळीला पाठिंबा देण्यासाठी पंजाबमधील स्थानिक गुंड, गुन्हेगारांची मदत घेत होत्या. हे दहशतवादी स्थानिक गुंडांना आर्थिक मदत तसेच इतर सामानही पुरवत होते. सुगावा लागल्यामुळे भारत सरकारने एनआयएला या संपूर्ण नेटवर्कचा तपास करण्यास सांगितले होते. तसेच गुन्हेगारीचे हे संपूर्ण जाळे मोडून काढण्यास सांगितले होते. अगोदर या प्रकरणाचा तपास पंजाबाचे पोलीस करत होते. मात्र नंतर या प्रकरणाचा तपास एनआयएला सोपवण्यात आला होता.

एनआयएने तपास केल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले होते. “सध्या तुरुंगात असलेला दिल्लीतील गुंड नवीन बाली आणि हरियाणातील गुंड कौशल चौधरी हे कॅनडास्थित दहशतवादी अर्शदीपसिंग गिल उर्फ अर्श डल्ला याच्या संपर्कात होते. डल्ला हा केटीएफ या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता. तो निज्जरच्या वतीने या संघटनेचे काम पाहायचा. एनआयएला आपल्या तपासात बाली, चौधरी आणि अर्शदीप हे तिघेही केटीएफ या संघटनेला निधी मिळावा यासाठी लोकांना धमकी द्यायचे,” असे एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले.

स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या गँग मोठ्या झाल्या

या दहशतवादी संघटना पंजाबमधील स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांच्या मदतीने गुन्हेगारी कारवाया करायचे. मात्र पुढे आपले गुन्हेगारी विश्व आणखी व्यापक करण्यासाठी या टोळ्या एकत्र येऊन काम करू लागल्या. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात याचाही उल्लेख आहे. “स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या गँग कालानंतराने मोठ्या झाल्या. कमी रक्कम मोजून चांगले नेमबाज शोधण्यासाठी तसेच राज्या-राज्यांमध्ये आपल्या कारवाया करण्यासाठी या गँग स्वत:चा विस्तार करू पाहात होत्या. पुढे या गुन्हेगारी टोळ्यांना आणखी अत्याधुनिक शस्त्रांची गरज भासू लागली. त्यासाठी या टोळ्या नंतर खलिस्तानचे समर्थन करणाऱ्या संघटनांच्या संपर्कात आल्या. या टोळ्या शस्त्रास्त्रांच्या बदल्यात खलिस्तानचे समर्थन करणाऱ्या परदेशातील संघटनांसाठी हत्या तसेच खंडणी मागण्याचे काम करू लागल्या,” असे एनआयएने आपल्या आरोपपत्रात नमूद केलेले आहे.

स्थानिक गुंडाना कॅनडात नोकरी लावण्याचे आमिष

“निज्जर, अर्शदीप आणि इतरांनी मिळून काही दहशतवादी टोळ्यांची स्थापान केली. त्यांनी या टोळ्यांत अनेकांची भरती केली. पंजाब राज्यात अस्थिरता, भीती निर्माण व्हावी यासाठी त्यांनी वेगवेगळ्या लोकांचे अपहरण, खून केले. निज्जर आणि अर्शदीप या दोघांनी अनेकांना कॅडनात चांगल्या पगाराची नोकरी, व्हिजा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्यामार्फत दहशत निर्माण केली. अगोदर ते स्थानिक गुंडांना पंजाबमधील उद्योगपतींना धमकी देण्यास, खंडणी मागण्यास सांगायचे. मात्र पुढे या गुंडाना दहशतवादी कृत्य करण्यास सांगितले जाऊ लागले. लोकांना मारण्यास सांगितले जाऊ लागले,” असे एनआयने म्हटले आहे.

वेगळ्या खलिस्तानसाठी पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करायची होती

एनआयएच्या म्हणण्यानुसार निज्जरने गुरुमित राम राहीमच्या डेरा सच्चा सौदाचा भाग असलेल्या शक्तीसिंग यांना मारण्याचा कट रचला होता. गुरु ग्रंथ साहीब या पवित्र ग्रंथाचा अवमान केल्याच्या शक्तीसिंग यांच्यावर आरोप होता. याच कथित कृत्याचा सूड म्हणून निज्जर याने हा कट रचला होता. हे कृत्य करून निज्जरला पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करायची होती, असे एनआयएचे म्हणणे आहे. केटीएफ ही एक दहशतवादी संघटना असून तिला पंजाबमध्ये दहशतवाद निर्माण करायचा आहे. वेगळ्या खलिस्तानची निर्मिती करण्यासाठी अशा प्रकारचे कृत्य केले जात होते, असेही एनआयएचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How nia break hardeep singh nijjar and other terriost network who support separate khalistan prd
Show comments