Union Budget 2024 अर्थमंत्री निर्मला सीतारमण मंगळवारी (२३ जुलै) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशातील आतापर्यंतचा हा ९३ वा अर्थसंकल्प असणार आहे. वर्षानुवर्षे देशाने अर्थसंकल्प सादरीकरणासाठी अर्थमंत्र्यांना त्यांच्याबरोबर ब्रीफकेस घेऊन जाताना पाहिले आहे. परंतु, २०१९ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचे सादरीकरण बदलून इतिहास रचला. त्यावेळी त्यांनी त्यांच्याबरोबर ‘बही खाता’ (वही खाते) आणला आणि अर्थसंकल्प सादर केला. त्याच्या दोन वर्षांनंतर त्यांनी या वही खात्याला ‘मेड इन इंडिया’ टॅबलेटसह बदलले आणि देशाचा अर्थसंकल्प टॅबलेटद्वारे सादर केला जाऊ लागला.
२३ जुलै रोजी निर्मला सीतारमण या सलग सातवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून सातव्यांदा अर्थसंकल्प मांडणार्या त्या पहिल्याच व्यक्ती ठरतील. अर्थसंकल्प सादरीकरणाची अनेक जण उत्सुकतेने वाट पाहत आहेत. लोकांना अर्थसंकल्पाची जितकी उत्सुकता आहे, तितकीच उत्सुकता निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादरीकरणासाठी संसदेत घेऊन जाणार्या लाल बजेट बॅगविषयीही आहे. खरे तर सीतारमण यांनीच ही परंपरा बदलली. पूर्वी अर्थसंकल्प कसा सादर केला जायचा? ही परंपरा कधी आणि का बदलली? अर्थसंकल्प सादरीकरणाचा इतिहास काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हेही वाचा : ‘Amazon Prime Day Sale’ नक्की काय असतो? ग्राहकांना वस्तूंवर मिळणारी सूट खरी असते का?
ब्रीफकेसची परंपरा कोठून आली?
बऱ्याच जणांना माहीत नाही की, बजेट हा शब्द फ्रेंच शब्द ‘Bougette’वरून आला आहे; ज्याचा अर्थ लेदर ब्रीफकेस असा होतो आणि हेच कारण आहे की, गेल्या अनेक वर्षांमध्ये अर्थमंत्री संसदेत ब्रीफकेस घेऊन जाताना आपण पाहिले आहे. ही परंपरा १८ व्या शतकात ब्रिटनमधून आली. पहिला बजेट बॉक्स १८६० साली ब्रिटनचे चान्सलर विल्यम एवर्ट ग्लॅडस्टोन यांच्यासाठी डिझाइन करण्यात आला होता. त्यांनी एक लाकडी पेटी तयार करून घेतली होती. त्या पेटीवर लेदर व काळ्या सॅटीनचा कपडा लावण्यात आला होता आणि त्यावर सोन्याने तयार करण्यात आलेला राणीचा मोनोग्राम लावण्यात आला होता.
असे म्हटले जाते की, लाल रंगाची निवड दोन कारणांसाठी करण्यात आली. पहिले कारण म्हणजे प्रिन्स अल्बर्ट यांना लाल रंग पसंत होता आणि दुसरे कारण म्हणजे राणी एलिझाबेथ प्रथम यांच्या प्रतिनिधीने १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात स्पॅनिश राजदूताला लाल ब्रीफकेस भेट म्हणून दिली होती. त्यानंतर लाल रंगाची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून ब्रिटनमध्ये ग्लॅडस्टोन बॉक्सचा वापर होऊ लागला. परंतु, २०१० मध्ये ब्रिटनमधील लाल ग्लॅडस्टोन बॅग इतकी जर्जर झाली की, अखेर त्याचा वापर बंद झाला.
भारताची बजेट ब्रीफकेस
ब्रिटनच्या पावलावर पाऊल ठेवत भारतानेही अर्थसंकल्प सादरीकरणासाठी एक ब्रीफकेस घेतली. परंतु, ब्रीफकेससाठी कोणताही विशिष्ट रंग ठरविण्यात आलेला नाही. मागील काही वर्षांत आपण अर्थमंत्र्यांना लाल, काळ्या व इतर रंगांच्या ब्रीफकेस वापरताना पाहिले आहे. २६ नोव्हेंबर १९४७ रोजी भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री आर. के. षण्मुखम चेट्टी हे ट्रेडमार्क बजेट बॅग घेऊन संसदेत गेले. १९४७ मध्ये यशवंतराव चव्हाण स्टीलची ब्रीफकेस घेऊन संसदेत गेले होते.
मनमोहन सिंग यांच्याकडे ब्रिटनमधील ग्लॅडस्टोन बॉक्ससारखीच ब्रीफकेस होती. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याकडेही ब्रिटिशांप्रमाणेच लाल रंगाची लेदरची ब्रीफकेस होती आणि अरुण जेटली २०१५ मध्ये राखाडी रंगाची ब्रीफकेस घेऊन संसदेत गेले होते. मात्र, अर्थसंकल्प सादर करताना सर्वच अर्थमंत्र्यांनी ब्रीफकेसचा वापर केला नाही. १९५७-५८ व १९६४-६५ मध्ये अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी आणि १९५९-१९६४, तसेच १९६७-७० मध्ये मोरारजी देसाई यांनी त्यांची अर्थसंकल्पीय भाषणे फाइल्समध्ये ठेवली.
सीतारमण यांनी ब्रीफकेसची परंपरा कशी बदलली?
ब्रीफकेसची परंपरा २०१९ पर्यंत सुरूच होती. परंतु, जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला तेव्हा त्यांनी ही परंपरा मोडीत काढत इतिहास रचला. त्यांनी पहिल्या अर्थसंकल्पात बजेट पेपर्स घेऊन जाण्यासाठी ब्रीफकेसऐवजी ‘बही खाता’चा (वही खाते) पर्याय निवडला. भारतीय घरे, दुकाने व लहान उद्योगांनी वर्षानुवर्षे त्यांचा अर्थसंकल्प व्यवस्थापित करण्यासाठी अशाच वही खात्याचा वापर केला आहे, हेच निर्मला सीतारमण यांना आपल्या पहिल्या अर्थसंकल्पातून प्रतिबिंबित करायचे होते, असे सांगण्यात येते. त्यांना या बदलाविषयी विचारले असता, “बजेट २०१९ साठी मी ब्रीफकेस नेली नाही. आमचे ब्रीफकेस नेणारे सरकार नाही. ब्रीफकेस ही ‘ब्रीफकेस घेणे, ब्रीफकेस देणे’ अशा इतरही गोष्टी सूचित करते. मोदीजींचे सरकार हे ‘ब्रीफकेस सरकार’ नाही.”
अर्थसंकल्पाची कागदपत्रे ब्रीफकेसऐवजी लाल कपड्यांत का ठेवण्यात आली, यावर मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यन यांनी सांगितले, “हे भारतीय परंपरेचे आणि पाश्चात्त्य विचारांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याचे प्रतीक आहे. हा अर्थसंकल्प नसून ‘बही खाता’ (वही खाते) आहे.” २०२० मध्येही त्यांनी वही खात्याद्वारेच अर्थसंकल्प सादर केला.
२०२१ मध्ये ‘बही खात्या‘च्या जागी टॅबलेट
२०२१ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुन्हा एकदा अर्थसंकल्पाच्या सादरीकरणात बदल केला. ‘बही खाता’ची जागा त्यांनी टॅबलेटला पसंती दिली. पंतप्रधान मोदींच्या ‘डिजिटल इंडिया’साठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले. ‘सीएनबीसीटीव्ही १८’च्या रिपोर्टनुसार, सीतारमण यांनी सॅमसंग निर्मित ‘मेड इन इंडिया’ टॅबलेटवरून अर्थसंकल्प वाचून दाखवला. हा टॅबलेट ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेला लाल रंगाचा पाउच, स्टेट एम्बलम ऑफ इंडियाचा शिक्का या दोन्ही वस्तू मेड इन इंडिया असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.
हेही वाचा : ‘बैजूज’च्या संस्थापकांची १७,५४५ कोटींची संपत्ती शून्यावर कशी आली? स्वत:च्या कंपनीतला अधिकार का गमावला?
बजेट बॅगमध्ये नक्की काय असते?
लाल बॅगेबद्दल बरीच चर्चा झाली. मात्र, बॅगच्या आत काय असते, हे फार कमी लोकांना माहीत आहे. सोप्या भाषेत सांगायचे, तर ब्रीफकेस किंवा आता टॅबलेटमध्ये अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण आणि आर्थिक कागदपत्रे असतात. अर्थसंकल्प सादरीकरण पूर्ण झाल्यानंतरच ही कागदपत्रे उघड केली जातात.