इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने आता जगाची चिंता वाढवली आहे. इराणने इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर शेकडो बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यानंतर इस्रायलने इशारा दिला आहे की, या हल्ल्याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील. दोन्ही देशांत सुरू असलेल्या संघर्षाची झळ संपूर्ण जगाला बसत आहे. दोन देशांतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याचे कारण काय? याचा भारतावर कसा परिणाम होणार? जाणून घेऊ.
नक्की काय घडतंय?
इराण क्षेपणास्त्र हल्ल्याची योजना आखत असल्याच्या वृत्तापूर्वीच तेलाचा बाजार दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. पश्चिम आशिया बहुतांश जगाचे खनिज तेल उत्पादन आणि निर्यातकेंद्र असल्यामुळे संघर्ष वाढल्याचा विपरीत परिणाम लगेच तेलाच्या किमतीवर दिसून येतो. त्यामुळे इराणच्या इस्रायल विरुद्ध आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लष्करी हल्ल्यानंतर बुधवारी तेलाच्या किमती दोन टक्क्यांहून अधिक वाढल्या. दोन्ही देशांत तणाव वाढल्यामुळे प्रदेशातून कच्च्या तेलाच्या उत्पादनात व्यत्यय येऊ शकतो. ‘ब्रेंट फ्युचर्सचा’ दर बुधवारी २.२ टक्क्यांनी वाढून ७५.१९ डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचला. दरम्यान, यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटचा दर २.४ टक्क्यांनी वाढून ७१.५३ डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचला. मंगळवारी इराणने तेल अवीव येथे क्षेपणास्त्रांचा बंदोबस्त सुरू केल्यानंतर, ब्रेंट फ्युचर्स २.६ टक्क्यांनी वाढून ७३.५६ डॉलर्स प्रति बॅरलवर स्थिरावला, तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट २.४ टक्के वाढून ६९.८३ वर स्थिरावला. या वर्षाच्या सुरुवातीला तेलाच्या जागतिक किमती ९० डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचल्या.
हेही वाचा : इराण विरुद्ध इस्रायल : कोणाचं सैन्य अधिक शक्तिशाली? कोण ठरणार वरचढ?
भारतावर काय परिणाम होणार?
भारतात रात्रभरापासून इंधनाचे दर बदलले नाहीत. कारण आज गांधी जयंतीनिमित्त भारतात व्यापार बंद आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर १००.३४ रुपये आहे, तर डिझेलचा दर ८९.९७ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर ९४.७२ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर ८८.५९ रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर १०४.९५ रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलचा दर ९१.७६ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १००.७ रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलचा दर ९२.३४ रुपये प्रति लिटर आहे. “या इंधनांची किरकोळ विक्री किंमत (आरएसपी) मार्चपासून बदललेली नाही,” असे कॉर्पोरेट रेटिंग्स ‘आयसीएआर’चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि समूह प्रमुख गिरीशकुमार कदम यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात जे काही घडत आहे ते पाहता उद्या भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. ज्या ग्राहकांना पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची आशा आहे, त्यांच्यासाठी ही वाईट बातमी आहे आणि नफा कमावणाऱ्या भारतीय तेल कंपन्यांसाठी चांगली बातमी आहे. पण हा तात्पुरता बदल असेल. युद्धाचा तेलाच्या किमतींवर झालेला परिणाम कायमस्वरूपी राहणारा नाही, असे काही जाणकार सांगतात.
तज्ज्ञांचे मत काय?
इराणने बुधवारी पहाटे सांगितले की, इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ला आता थांबवण्यात आला आहे, तर इस्रायल आणि अमेरिकेने इराणला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. इस्रायलने इराणवर हल्ला केल्यास इराणच्या तेल सुविधांचे नुकसान होऊ शकते किंवा ते नष्टही होऊ शकतात,” असे तेल निर्यात करणारे तामस वर्गा म्हणाले. इराणने केलेल्या हल्ल्यात १८० पेक्षा जास्त बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश असल्याचे इस्रायलने सांगितले आहे. इराणला विनाशकारी परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही इस्रायलने दिला. वर्गा यांनी नमूद केले की, इराण किंवा त्याच्या सहयोगींच्या प्रतिशोधामुळे २०१९ प्रमाणे तेल सुविधांवर हल्ला होऊ शकतो किंवा होर्मुझची सामुद्रधुनी बंद होऊ शकते; यापैकी कोणतीही घटना तेलाच्या किमती लक्षणीयरीत्या वाढवेल, असे ते म्हणाले.
युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलने बुधवारी पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षावर बैठक नियोजित केली आणि युरोपियन युनियनने तात्काळ युद्धबंदीचे आवाहन केले. इराणचे तेल उत्पादन ऑगस्टमध्ये दर दिवशी ३.७ दशलक्ष बॅरलवर पोहोचले. हा सहा वर्षांतील सर्वात उच्चांकी आकडा आहे, असे ‘एएनझेड’ विश्लेषकांनी सांगितले. कॅपिटल इकॉनॉमिक्सने एका नोटमध्ये म्हटले आहे, “इराणने केलेल्या मोठ्या हल्ल्यामुळे अमेरिकाही या युद्धात उतरण्याचा धोका आहे. जागतिक तेल उत्पादनात इराणचा वाटा सुमारे चार टक्के आहे, परंतु इराणचा पुरवठा खंडित झाल्यास सौदी अरेबिया उत्पादन वाढवणार की नाही, हा मुख्य प्रश्न निर्माण होऊ शकतो.
ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंण्ट्रिझ (OPEC+) मधील सदस्यांनी बाजाराचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या गटात रशियाचाही समावेश आहे. डिसेंबरपासून हा गट मासिक उत्पादन १,८०,००० बॅरलने वाढवणार आहे. परंतु, सौदी अरेबियाच्या तेल मंत्र्यांनी सांगितले की, OPEC+ सदस्यांनी मान्य केलेल्या उत्पादन मर्यादेचे पालन न केल्यास तेलाच्या किमती प्रति बॅरल ५० डॉलर्सपर्यंत खाली येऊ शकतात. एक स्वतंत्र राजकीय रणनीतीकार क्ले सीगल यांनी एका इमेलमध्ये म्हटले आहे की, इस्रायल इराणवर थेट हल्ला करण्यासाठी आपले लष्करी आक्रमण वाढवण्यास मागेपुढे पाहणार नाही, त्यामुळे इराणच्या तेल संपत्तीला लक्ष्य केले जाऊ शकते. इराणी तेल उत्पादन किंवा निर्यात सुविधांवर इस्रायली हल्ल्यामुळे व्यत्यय येऊ शकतो, असे सीगल म्हणाले.
भीतीचे कारण काय?
इराण-समर्थित गट येमेनमधील हौथींनी होडेदाह बंदरावरील जहाजांवर हल्ले केले आहेत. गाझा पट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात पॅलेस्टिनींबरोबर हौथींनी गेल्या नोव्हेंबरपासून येमेनजवळील आंतरराष्ट्रीय शिपिंगवर हल्ले सुरू केले आहेत. “संघर्षात आणखी वाढ झाल्यास इराणचे सैन्य, हुथी आणि इराकी निमलष्करी, पश्चिम आशियातील तेल उत्पादकांवर म्हणजे सौदी अरेबियावर हल्ले करू शकतात,” असे तामस वर्गा म्हणाले. ते पुढे म्हणाले, “आता तेल पुरवठ्यावर परिणाम होईल अशी खरी भीती आहे आणि चित्र स्पष्ट होईपर्यंत चिंता कायम राहणार आहे.”