अमेरिकन रग्बीपटू, टीव्ही आणि चित्रपट अभिनेते ओरेंथल जेम्स सिम्पसन, अर्थात ‘ओजे’ सिम्पसन यांचे आयुष्य अनेक अर्थांनी नाट्यमय राहिले. महाविद्यालयात असल्यापासून झोतात असलेल्या सिम्पसन यांची पाठ प्रसिद्धीने कधीच सोडली नाही. मात्र क्रीडा, अभिनय, जाहिरात क्षेत्रात वाहवा मिळवितानाच त्यांच्या आयुष्याला जबरदस्त कलाटणी मिळाली, ती त्यांच्यावर झालेल्या दुहेरी हत्येच्या आरोपामुळे. त्यावेळी ते खटल्यातून कसे सुटले? त्यानंतर काय घडले? त्यांना पुन्हा तुरुंगाची हवा का खावी लागली, अशा काही घटनांचा त्यांच्या मृत्यूपश्चात घेतलेला हा मागोवा…

ओजे प्रसिद्धीच्या झोतात कधी आले?

१९४७ साली जन्म झालेले सिम्पसन यांचा एक पाय मुडदूस झाल्यामुळे धनुष्याकृती होता. मात्र अत्यंत गरिबीत बालपण गेले असताना या अपंगात्वावर मात करत, सिम्पसन एक सर्वोत्तम अमेरिकन रग्बीपटू बनले. कॅलिफोर्निया विद्यापीठात शिकत असताना १९६८ साली त्यांना सर्वोत्तम महाविद्यालयीन फुटबॉलपटू म्हणून गौरविण्यात आले. (अमेरिकेमध्ये रग्बी या खेळाचा उल्लेख फुटबॉल असा केला जातो व आपण ज्याला फुटबॉल म्हणतो, त्याला अमेरिकेत सॉकर या नावाने ओळखले जाते.) त्यानंतर न्यूयॉर्क राज्यातील बफेलो येथे त्यांनी आपल्या आयुष्याचा बराच काळ घालवला. रग्बीमध्ये चेंडू घेऊन समोरच्या गोलपोस्टपर्यंत वेगाने धावत जाण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले होते. १९७९ मध्ये दुखापतींमुळे निवृत्ती स्वीकारावी लागल्यानंतर त्यांनी नवे क्षेत्र निवडले आणि हॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून त्यांनी ठसा उमटविला. १९७३ ते १९९४ या काळात त्यांनी द टॉवरिंग इन्फर्नो, नेकेड गन सिरीज अशा २०पेक्षा जास्त चित्रपटांत अभिनय केला. याच काळात अनेक अमेरिकन कंपन्यांबरोबर ब्रँड अँडेसिडर म्हणून त्यांनी कोट्यवधींचे करार केले. मात्र १९९४ साली घडलेली एक घटना त्यांच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देऊन गेली.

CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

हेही वाचा >>>अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?

सिम्पसन यांचे आयुष्य कशामुळे बदलले?

१२ जून १९९४ या दिवशी सिम्पसन यांची दुसरी पत्नी निकोल ब्राऊन सिम्पसन आणि तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमन यांचे मृतदेह लॉस एंजलिस येथील निकोल यांच्या घराबाहेर आढळून आले. या दोघांचा खून झाल्याचे स्पष्ट होते आणि पहिला थेट संशय दोन वर्षांपूर्वी निकोल यांच्याशी घटस्फोट घेतलेले सिम्पसन यांच्यावरच घेतला गेला. सिम्पसन यांनी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. आपल्या पांढऱ्या ब्रोन्को गाडीतून एका सहकारी फुटबॉलपटूसह पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या अनेक गाड्यांनी त्यांचा पाठलाग केला व एका वृत्तवाहिनीने हा सर्व घटनाक्रम प्रसारित केला. तेव्हापासून ही घटना ‘ब्रोन्को चेज’ नावाने प्रसिद्ध झाली. अखेर आपल्या घराजवळ सिम्पसन यांनी शरणागती पत्करली. १९९५ साली त्यांच्या विरोधात दुहेरी हत्येचा खटला सुरू झाला. ‘शतकातील सर्वांत गाजलेला खटला’ असे याचे वर्णन केले जाते.

हत्येच्या खटल्यातून सिम्प्सन कसे सुटले?

महाविद्यालयीन काळात दिलेल्या एका मुलाखतीत ‘लोक मला अमेरिकन म्हणून ओळखतात. कृष्णवर्णीय म्हणून नव्हे,’ असे सिम्पसन म्हणाले होते. मात्र माजी पत्नी आणि तिच्या मित्राच्या हत्येचा आरोप झाल्यानंतर त्यांनी आपला वर्ण हाच सर्वांत मोठा बचावाचा मुद्दा केला. सिम्पसन कृष्णवर्णीय असल्यामुळे त्यांना या खटल्यात गोवले गेले आहे, असा दावा त्यांच्या वकिलांनी केला. पुराव्यादाखल त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याची ध्वनिफीतही ऐकविण्यात आली. या दाव्यानंतर अमेरिकेमध्ये दोन टोकाचे मतप्रवाह तयार झाले होते. अखेर रक्ताने माखलेला घटनास्थळी सापडलेला एक हातमोजा सिम्पसन यांना हातात घालायला सांगितले गेले आणि तो त्यांच्या हातात बसला नाही. हा पुरावा (बहुसंख्य कृष्णवर्णीय असलेल्या) ज्युरींनी ग्राह्य धरला व सिम्पसन यांची आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. मात्र १९९७ साली ब्राऊन आणि गोल्डमन कुटुंबीयांनी सिम्पसन यांच्यावर पुन्हा फौजदारी खटला भरला आणि त्यात ३ कोटी ३५ लाख डॉलर नुकसानभरपाई म्हणून सिम्पसन यांना द्यावे लागले.

हेही वाचा >>>विश्लेषण: अरुण गवळीची सुटका होणार का? न्यायालयाने काय म्हटले? राज्य सरकारची भूमिका काय?

पुन्हा जेलवारीचे कारण काय?

१९९४ ते १९९७ या काळातील घटनांनतर सिम्पसन हे शांत आयुष्य जगत होते. तरी २००६ साली ते पुन्हा एकदा चर्चेत आले ते माध्यम सम्राट रुपर्ट मर्डोक यांच्या कंपनीबरोबर केलेल्या ३५ लाख डॉलरच्या करारामुळे… या करारात सिम्पसन यांचे लेखन असलेल्या पुस्तकाचे हक्क आणि फॉक्स वाहिनीला मुलाखत यांचा समावेश आहे. ‘इफ आय डिड इट’ (जर मी ते केले असते) असे या भावी पुस्तकाचे शीर्षक होते. यात सिम्पसन यांनी केलेल्या हत्येचे ‘काल्पनिक’ विवेचन करण्यात आले होते. मात्र कालांतराने या पुस्तकाचे स्वामित्वहक्क गोल्डमन कुटुंबाकडे आले आणि त्यांनी या पुस्तकातील ‘इफ’ हा शब्द अत्यंत छोटा केला व शेवटी ‘कन्फेशन ऑफ द किलर’ (खुन्याचा कबुलीजबाब) असे उपशीर्षक जोडले. त्यानंतर दोन वर्षांनी, २००८मध्ये सिम्पसन यांच्या आयुष्यात आणखी एक नामुष्कीची घटना घडली. लास वेगासमधील एका हॉटेलमध्ये चार साथीदारांसह संग्राह्य वस्तूंची विक्री करणाऱ्यांना बंदुकीच्या धाकावर सिम्पसन यांनी धमकाविले. आपल्या फुटबॉल कारकीर्दीतील काही संस्मरणीय वस्तू हे लोक विकत असल्यामुळे आपण हस्तक्षेप केला असे सिम्पसन यांचे म्हणणे होते. मात्र दरोडा आणि धमकाविण्याचा आरोप आरोप सिद्ध झाला आणि त्यांना ३३ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती, शिक्षेचा किमान नऊ वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर ते अर्जित रजेवर बाहेर येऊ शकले. आपली मुले आणि नातवंडांच्या उपस्थितीत वयाच्या ७६व्या वर्षी ते कर्करोगाशी आपली लढाई हरले आणि त्यांच्या जीवनपटावर ‘द एण्ड’ ही पाटी लागली.

amol.paranjpe@expressindia.com

Story img Loader