पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर असून नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमध्ये या दौऱ्याच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पंतप्रधान झाल्यापासून पंतप्रधान मोदींचा हा सहावा दौरा आहे. मात्र या वेळी पहिल्यांदा ते राज्यांनाही भेट देणार आहेत. २००९ पासून ते पहिले भारतीय असतील, ज्यांना हा सन्मान मिळत आहे. २० ते २४ जून असा अमेरिकेचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान मोदी इजिप्तसाठी रवाना होणार आहेत. अमेरिकेच्या दौऱ्यात जवळपास २० वेगवेगळ्या शहरांमध्ये भारतीय आणि अमेरिकन नागरिक पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी जमणार आहेत. वॉशिंग्टन येथे पंतप्रधान मोदी दोन महत्त्वाच्या संरक्षणविषयक करारावर स्वाक्षरी करणार आहेत. या वेळीही काही अमेरिकन नेते मोदींप्रति प्रेम व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या सर्व दौऱ्यादरम्यान पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयकडून खोडा घातल्याची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे, अशी माहिती ‘फर्स्टपोस्ट’ या वेबसाइटने दिली आहे.
मोदींच्या दौऱ्यात अडथळा निर्माण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न
गुप्तचर यंत्रणेमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने (Inter-Services Intelligence) अमेरिकेतील खलिस्तानी समर्थक संघटना आणि भारतविरोधी गटांसह मागच्या दिवसात बैठका घेतल्या आहेत. वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोध प्रदर्शन करण्यासाठी ‘आयएसआय’ने या संस्थांना पैसे पुरविल्याला दावा सूत्रांनी केला असल्याची माहिती ‘फर्स्टपोस्ट’ने दिली आहे. युनायटेड स्टेट्समध्ये खलिस्तानी चळवळ अजूनही सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय उच्चायुक्तालय कार्यालयाच्या भिंतीवर खलिस्तानवाद्यांनी अमृतपाल सिंह याच्या अटकेचा निषेध करण्यासाठी भारतविरोधी मजकूर लिहिला होता.
२०२१ मध्ये, अमरिकेतील हड्सन इन्स्टिट्यूटने ‘पाकिस्तान डीस्टॅबिलिजेशन प्लेबुक: खलिस्तानी ॲक्टिव्हिजम इन द यूएस’ हा अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार खलिस्तान समर्थक अमेरिकेत आपली ताकद वाढवत असल्याचे नमूद करण्यात आले होते. “जोपर्यंत अमेरिकी सरकार खलिस्तानशी निगडित अतिरेकी आणि दहशतवादी कारवायांवर प्राधान्याने लक्ष देत नाही, तोपर्यंत भारतातील पंजाबमध्ये सध्या हिंसक घटनांमध्ये कार्यरत असलेल्या किंवा हिंसा घडविण्याची तयारी करणाऱ्या गटांना ओळखणे कठीण जाऊ शकते,” असा उल्लेख या अहवालात करण्यात आला होता.
हे वाचा >> पीएम नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा, २० हून अधिक अमेरिकन कंपन्यांना भेटणार; भारताला ‘हा’ फायदा होणार
‘रॉयटर्स’ने दिलेल्या माहितीनुसार इंडियन अमेरिकन मुस्लीम कौन्सिल (IAMC) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निषेध आंदोलन घेण्याची शक्यता आहे. ‘आयएएमसी’वरील वेबसाइटनुसार भारतीय मुस्लिमांचे अमेरिकेत प्रतिनिधित्व करणारी ही सर्वात मोठी संस्था आहे. ‘द संडे गार्डियन’ने दिलेल्या बातमीनुसार ‘आयएएमसी’ या संस्थेचे पाकिस्तानशी जवळचे संबंध आहेत. मानवाधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून या संस्थेतर्फे भारतावर सतत टीका करण्यात येत असते.
या व्यतिरिक्त गुप्तचर यंत्रणेने अमेरिकेतील वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यातील मार्गावर मोदींच्या विरोधातील फलक दाखविण्याचेही नियोजन काही संघटनांनी केले आहे. शिवाय दौऱ्याच्या मार्गावर जे लोक प्रत्यक्ष आंदोलन करणार आहेत, त्यांना त्या ठिकाणी नेण्यासाठी बसची सुविधाही देण्यात येत आहे.
याचबरोबर ‘आयएसआय’ने मोदींच्या अमेरिका दौऱ्याआधी ट्विटरवर मोदीविरोधी ट्रेण्ड चालविण्यासाठी काही लोकांकडे काम दिल्याचीही माहिती मिळत आहे. #ModiNotWelcome आणि #SaveIndiafromHinduSupremacy अशा प्रकारचे हॅशटॅग ट्रेण्ड करून मोदींच्या दौऱ्यानिमित्त भारताविरोधी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
न्यूयॉर्कमध्ये २१ जून रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा केला जाणार आहे. त्याच दिवशी काही लोकांनी ‘हाऊडी डेमोक्रॅसी’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात भारतातील वाढत्या अन्यायावर प्रकाश टाकला जाईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. या कार्यक्रमाशी आयएसआयचा काही संबंध आहे का? हे अद्यापही उघड झालेले नाही.
भारत-अमेरिका संबंधाकडे पाकिस्तान कसा पाहतो?
मोदींचा अमेरिका दौरा हा भारत आणि यूएसच्या द्विपक्षीय संबंधासाठी महत्त्वपूर्ण आहेच, त्याशिवाय त्याकडे पाकिस्तानचीही नजर असणार आहे. इस्लामाबादमधील जाणकार सांगतात त्याप्रमाणे, पाकिस्तानचे मंत्री जाहीरपणे काहीही बोलत असले तरीही भारत आणि अमेरिका यांच्यात वाढणाऱ्या जवळिकीमुळेही पाकिस्तान सरकार नाखूश आहे. रविवारी (दि. १८ जून) पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “युनायटेड स्टेट्स भारताबरोबर संबंध अधिक घनिष्ठ करीत असेल तर त्यात आम्हाला काहीच अडचण नाही. त्याचा पाकिस्तानला काहीही फरक पडणार नाही.”
हे ही वाचा >> PM Modi US Visit : एलॉन मस्क ते फालू शाह, पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर ‘या’ २४ सेलिब्रेटींना भेटणार
ख्वाजा आसिफ म्हणाले, “युनायटेड स्टेट्स आणि भारताचे संबंध दृढ होत असले तरी त्याची आम्हाला काहीच अडचण नाही आणि त्याचा आमच्यावर काही फरक पडत नाही. आमच्या देशाच्या सीमा चीन, अफगाणिस्तान, इराण आणि भारताशी जोडलेल्या आहेत. शेजारी राष्ट्रांच्या संबंधात काही कुरबुरी झाल्या असतील तर त्यात सुधार करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आम्हाला शांततेत राहायचे आहे. जर सीमेवर शांतता नसेल तर आम्ही आमच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणू शकणार नाही.”
कसा आहे पंतप्रधान मोदींचा दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ जून रोजी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करणार आहेत. तिथून ते वॉशिंग्टन राज्याच्या भेटीवर जातील. वॉशिंग्टनमध्ये मोदींना २१ वेळा बंदुकीची सलामी देण्यात येणार आहे, तसेच त्यांच्यासाठी ‘व्हाइट हाऊस’मध्ये एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे, ज्याची तिकिटे आधीच विकली गेली आहेत. तसेच या दौऱ्यात ते अमेरिकेच्या संसदेत भाषण करणार आहेत. अमेरिकेच्या संसदेत दोनदा भाषण करण्याची संधी मिळालेले मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरणार आहेत.
२३ जून रोजी वॉशिंग्टन डीसीमधील रोनल्ड रेगन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राच्या इमारतीमध्ये काही मोजक्या निमंत्रित अनिवासी भारतीयांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. या भेटीदरम्यान भारताच्या वाढत्या विकासावर चर्चा केली जाणार आहे.
अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी मोदींच्या दौऱ्याबाबत माहिती देताना सांगितले, “पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे इथे उत्साहाचे वातावरण आहे. यूएसमधील राज्याच्या राज्यपालांनी स्वागतपर संदेश आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज्य विधिमंडळ आणि संसदेचे सदस्य, उद्योगपती, विचारवंत आणि भारतीय नागरिक या सर्वांनाच पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याबद्दल उत्सुकता आहे. हवाई ते अलास्का सर्वच ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत होईल.”