काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या १९ व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (२३ डिसेंबर) ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली. त्यात त्यांनी निरसिंहराव यांच्या सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणा अधोरेखित करत त्यामुळे भारताच्या प्रगतीवर भाष्य केलं. राव यांनी भारताच्या आण्विक कार्यक्रमात महत्त्वाचं योगदान दिलं. तसेच ‘लूक ईस्ट’ या परराष्ट्र धोरणाला यश आल्याचंही खरगेंनी नमूद केलं.

विशेष म्हणजे नरसिंहराव भारताचे पंतप्रधान होण्याच्या एक वर्ष आधी त्यांना त्यांची राजकीय कारकीर्द संपली असं वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी दिल्लीतील त्यांची पुस्तकं, आवडतं कम्प्युटर पॅकिंग करून हैदराबादला मुलाकडे पाठवून दिलं. याशिवाय त्यांनी तामिळनाडूतील एका मठाला पत्र लिहून सांगितले की, ते मुख्य भिक्षू बनण्याचा विचार करत आहेत. त्यांना काही दिवसांआधीच हे पद घेण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र, त्यांनी तेव्हा तो नाकारला होता.

असं असताना पी. व्ही. नरसिंहराव काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे पंतप्रधान कसे झाले, असा प्रश्न विचारला जातो. याच प्रश्नाचा हा आढावा…

बाहेर पडण्याच्या मार्गावर…

विनय सीतापती यांच्या ‘द मॅन हू रीमेड इंडिया: ए बायोग्राफी ऑफ पी.व्ही. नरसिंह राव’ या पुस्तकानुसार, १९९० मध्ये नरसिंहराव यांनी ऐकले की, काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राजीव गांधी पुढील वर्षी काँग्रेसने लोकसभा निवडणूक जिंकल्यास मंत्रिमंडळात बदल करून तरुणांना संधी देण्याचा विचार करत आहेत. या कुजबुजीमुळे नरसिंहराव काहीसे निराश झाले. त्यांनी सलग आठ निवडणुका जिंकल्या होत्या आणि ६९ व्या वर्षांचे झाले होते. त्यामुळे त्यांनी निवृत्तीनंतरच्या आयुष्याचं नियोजन करायला सुरुवात केली होती. मात्र, २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूतील श्रीपेरंबदुर येथे प्रचार सभेत राजीव गांधींची हत्या झाली. या दुःखद घटनेने नरसिंहराव यांचा राजकीय प्रवासच बदलला.

पी. व्ही. नरसिंहराव यांचं पुनरागमन

राजीव गांधी यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर काही तासातच नरसिंहराव १० जनपथवर अंत्यसंस्कारासाठी पोहोचले. तेव्हा तेथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी नरसिंहरावांना बाजूला घेतले आणि राव हेच काँग्रेसचे पुढचे अध्यक्ष असावेत, असं पक्षातील सर्वसाधारण मत असल्याचं सांगितलं. तसेच पक्षांतर्गत संघर्षाच्या अफवांना रोखण्यासाठी आजच अध्यक्षपद स्वीकारणे योग्य होईल, असंही मुखर्जींनी नमूद केलं. याबाबत नरसिंहराव यांनी आपल्या डायरीत नोंद केलेली आढळते.

प्रणव मुखर्जींनी ही बातमी दिल्यानंतर नरसिंहरावांना आनंद झाला. मात्र, त्यांनी आपला आनंद उघडपणे दाखवला नाही. त्यांनी ती माहिती स्वतःजवळच ठेवली. सीतापती यांनी आपल्या पुस्तकात सांगितलं, “नरसिंहराव सावध राहण्यात हुशार होते. ७ वर्षांपूर्वी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा प्रणव मुखर्जी यांनी त्यांचा उत्तराधिकारी होण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, घराणेशाहीतील जागेवर सामान्य माणसाने हक्क सांगितल्याने त्यांना त्याची राजकीय किंमत मोजावी लागली होती. आता कुठे त्यांचे पुनर्वसन करण्यात आले होते.”

इतकंच नाही, तर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत नरसिंहराव यांच्याशिवाय अनेकजण इच्छुक होते. यात अर्जुन सिंह, एन. डी. तिवारी, शरद पवार आणि माधव राव शिंदे यांचा समावेश होता. त्यावेळी सोनिया गांधींना राजीव गांधींचा उत्तराधिकारी निवडण्यास सांगण्यात आले. सोनिया गांधी पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या प्रत्येक नेत्याला चांगल्या प्रकारे ओळखत होत्या.

सीतापती यांच्या म्हणण्यानुसार, “महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार तरुण आणि शक्तीशाली नेते होते. परंतु त्यांनी १९७८ मध्ये मुख्यमंत्री बनण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये फूट पाडून पक्षाशी विश्वासघात केला होता. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंह आणि माधव राव शिंदे यांना पक्षातील एकमेकांच्या प्रतिस्पर्धी गटांनी विरोध केला होता. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी या शर्यतीत आघाडीवर होते. मात्र, त्यांनी यापूर्वी राजीव गांधींच्या सूचनेचे उल्लंघन केले होते आणि लोकसभा निवडणूक लढले होते. त्या निवडणुकीत ते हरलेही होते. याबाबत नरसिंहराव यांनी त्यांच्या डायरीत नोंद केलेली आढळते.

एकूणच या सर्व घडामोडींमुळे काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत नरसिंहराव यांची निवड झाली. ‘द इंडियन एक्स्प्रेस’वरील एका लेखात यावर संजय बारू यांनी सांगितलं, “नरसिंहराव यांच्या उमेदवारीला राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्याकडून भक्कम पाठिंबा मिळाला. त्याचा नरसिंहरावांना फायदा झाला. वेंकटरमण यांनी संख्याबळाचा पुरावा न मागता सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं.

या सर्व घडामोडींमध्ये केरळच्या के करुणाकरन यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे दक्षिण भारतातून काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आले होते. त्यामुळे त्यांनाही भारताचा पहिला दक्षिण भारतीय पंतप्रधान व्हावा असं वाटत होतं.

बारू पुढे म्हणाले की, त्यावेळी नरसिंहराव हे सर्वात अनुभवी काँग्रेस नेत्यांपैकी एक होते. त्यांनी एका राज्याचे मुख्यमंत्रीपद, पक्षाचे सरचिटणीसपद भूषवलं होतं. देशाचे परराष्ट्र व्यवहार, संरक्षण, गृह आणि मानव संसाधन विकास मंत्री म्हणून काम केलं होतं. काँग्रेस अध्यक्षपदासाठी नरसिंहराव यांचे नाव इंदिरा गांधींचे प्रधान सचिव पी. एन. हक्सर यांनी सुचवले होते.

हेही वाचा : भारतीय दंड संहितेची जागा घेतलेल्या न्याय संहितेत नवं काय? नेमके बदल काय?

सीतापतींच्या पुस्तकानुसार, हक्सर यांनी असा युक्तिवाद केला की, नरसिंहराव हे एक बुद्धिजीवी होते. त्यांना शत्रू नव्हते आणि ते पक्षाला एकसंध ठेवू शकतात. इतर उमेदवार पक्ष फोडू शकतात. २९ मे १९९१ रोजी नरसिंहराव यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर पुढच्याच महिन्यात काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ४८७ पैकी २३२ जागा जिंकून सत्तेत पुनरागमन केले. तेव्हा नरसिंहराव पंतप्रधान झाले.

Story img Loader