संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यामधून अमेरिकन मतदार ५ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान करणार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या अवघ्या एक आठवड्यापूर्वी दोन्ही उमेदवारांनी देशाला चालविण्यासंबंधीची विविध धोरणे मांडली आहेत. दोन्ही उमेदवारांमधील एक जण अब्जाधीश असल्याचा दावा करतो आणि दुसरा मध्यमवर्गीय असल्याचा दावा करतो. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की दोघांपैकी श्रीमंत कोण? कोणाकडे किती संपत्ती? त्याचविषयी जाणून घेऊ.
कमला हॅरिस किती श्रीमंत?
फोर्ब्सच्या अहवालानुसार सध्या अमेरिकेच्या उपाध्यक्षांची एकूण संपत्ती अंदाजे आठ दशलक्ष डॉलर्स इतकी आहे; पण ही संपत्ती त्यांच्या राजकीय कारकिर्दीतून आलेली नाही. कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर २००४ मध्ये त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या जिल्हा वकील झाल्या, तेव्हा त्यांचा वार्षिक पगार १,४०,००० डॉलर्स होता. २०१० मध्ये त्यांचा पगार वाढून २,००,००० डॉलर्सपेक्षा अधिक झाला. २०१० मध्ये त्या कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल झाल्या आणि त्यांचा पगार १,५९,००० पर्यंत घसरला.
सात वर्षांनंतर २०१७ मध्ये त्या अमेरिकेच्या सिनेटमध्ये सामील झाल्या आणि तेव्हा त्यांना १,७४,००० डॉलर्स इतका वार्षिक पगार मिळू लागला. फोर्ब्सने अहवाल दिला आहे की, २०१२ मध्ये त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर हॅरिस आणि त्यांच्या बहिणीने त्यांचे ओकलँडचे घर ७,१०,००० डॉलर्समध्ये विकले, अशी माहिती स्थानिक रिअल इस्टेट एजंट जेरी बेव्हर्ली यांनी दिली. अमेरिकेच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांचा वार्षिक पगार २,१८,००० डॉलर्स आहे.
आता असा प्रश्न निर्माण होतो की, त्यांची संपत्ती आली कुठून? फोर्ब्सने अहवाल दिला की, त्यांची बहुदशलक्ष डॉलर्सची संपत्ती मुख्यत्वे हॅरिस यांनी २०१२ मध्ये त्यांचे पती सेकंड जेंटलमन डग एमहॉफ यांच्याबरोबर खरेदी केलेल्या घरामुळे आहे. २०२१ पासून त्यांच्या घराची किंमत अंदाजे एक दशलक्षाने वाढून ४.४ दशलक्ष झाली आहे. या जोडप्याकडे एकत्रितपणे २.९ दशलक्ष डॉलर्स ते ६.६ दशलक्ष डॉलर्स रोख आणि सेवानिवृत्ती निधी आहे. कमला हॅरिस यांची संपत्ती त्यांच्या पुस्तक व्यवसायातूनदेखील वाढली. त्यांच्या लेखन कार्यक्रमातून त्यांना रॉयल्टी मिळते. त्याद्वारे त्यांनी ५,००,००० डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम कमावली. त्या व्हाईट हाऊसची शर्यत हरल्या तरी हॅरिस यांच्या एकूण संपत्तीवर परिणाम होणार नाही. कारण- त्यांना या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या कॅलिफोर्निया पेन्शनमधून अंदाजे ८,२०० डॉलर्स प्रतिमहिना मिळण्यास सुरुवात होईल.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीचे काय?
फोर्ब्सच्या अहवालानुसार, ट्रम्प यांची आजची एकूण संपत्ती आठ अब्ज डॉलर्स आहे. सप्टेंबरच्या अखेरीस त्यांची संपत्ती ३.९ अब्ज डॉलर्स होती. तेव्हापासून त्यांच्या संपत्तीत दुपटीने वाढ झाली आहे. त्यांना या संपत्तीतील सर्वांत मोठा भाग त्यांच्या ट्रुथ सोशल पॅरेंट कंपनीकडून मिळतो. परंतु, ट्रम्प यांनी त्यांच्या रिअल इस्टेट होल्डिंगमधून लाखो रुपये कमावले आहेत. ट्रम्प यांच्याकडे न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवर, फ्लोरिडातील तीन घरे व लास वेगासमधील ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेल आहे.
हेही वाचा : गरोदर महिला आणि मुलांसाठी ‘U-WIN Portal’ची सुरुवात; याचा कसा होणार फायदा?
त्यासह ट्रम्प यांच्याकडे मार-ए-लागो क्लब, सहा यूएस गोल्फ कोर्स, मियामी रिसॉर्ट व तीन युरोपियन गोल्फ कोर्स यांसह त्यांच्या इतर मालमत्तांची किंमत ८१० दशलक्ष डॉलर्स आहे. परंतु, ट्रम्प यांची संपत्ती अनेक काळापासून विवादित राहिली आहे. न्यूयॉर्कचे अॅटर्नी जनरल लेटिशिया जेम्स यांनी अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांविरुद्ध दिवाणी खटला सुरू केला आहे. त्याव्यतिरिक्त ट्रम्प मोठ्या कायदेशीर खर्चातही अडकले आहेत. त्यांच्यावर ५४० दशलक्ष डॉलर्सची देणी आहेत. त्यांच्यावर अनेक खटलेही सुरू आहेत.