मुंबईच्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील प्रमुख देवस्थानांपैकी एक धार्मिक स्थळ आहे. भगवान गणेशाला समर्पित या मंदिरात दरवर्षी जगभरातून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. सुप्रसिद्ध व्यक्तींसह कलाकार, उद्योजक सातत्याने या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. दर मंगळवारी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. नवसाला पावणारा गणपती, अशी सिद्धिविनायकाची ख्याती आहे. सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असून, मंदिराला येणाऱ्या देणग्यादेखील वाढत आहेत. मंदिराचे एकूण उत्पन्न किती? मंदिराला देणग्या कोणत्या स्वरूपात येतात? त्याचा वापर कसा केला जातो. त्याविषयी जाणून घेऊ.
सिद्धिविनायक मंदिराला भरभरून दान
प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १३० कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले आहे. मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील आकड्याच्या तुलनेत, यंदाच्या उत्पन्नाचा आकडा लक्षणीयरीत्या वाढला आहे. येत्या वर्षात सिद्धिविनायक मंदिराचे उत्पन्न आणखी वाढू शकते, असेही सांगण्यात आले आहे. सिद्धिविनायक मंदिर समितीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १३० कोटी रुपयांच्या विक्रमी वार्षिक उत्पन्नाची नोंद केली आहे. ३१ मार्च रोजी मंदिरातील व्यवस्थापन समितीची बैठक पर पडली. याच बैठकीत सादर केलेल्या वार्षिक अर्थसंकल्पात ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ (टीओआय)ने दिलेल्या वृत्तानुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षात मंदिर समितीने ११४ कोटी रुपयांच्या उत्पन्नाची नोंद केली होती. २०२३-२४ च्या तुलनेत यंदा १५ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे, असे या समितीच्या कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी सांगितले. श्री सिद्धिविनायक समितीचे उपकार्यकारी अधिकारी संदीप राठोड यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले, “प्रशासनाच्या कार्यक्षमतेमुळेच ११४ कोटी रुपयांचे अपेक्षित उत्पन्न विक्रमी १३३ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. उत्पन्नाचा हा आकडा समितीच्य स्वतःच्या अंदाजापेक्षा १५ टक्क्यांनी जास्त आहे.”

चांगल्या सोई-सुविधांमुळे मंदिराच्या वार्षिक उत्पन्नात वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तम सुविधांमुळे दर्शन सुरळीत होते आणि भक्तांना आनंददायी अनुभव मिळतो, असे ते म्हणाले. राठोड म्हणाले, “जर दर्शनासाठीच्या रांगा नियोजितपणे आणि वेगाने पुढे सरकल्या, तर जास्तीत जास्त लोक दर्शन घेऊ शकतात. त्यामुळे देणग्याही वाढतात.” संदीप राठोड यांनी हेदेखील निदर्शनास आणून दिले की, योग्य नियोजनामुळे प्रत्येक भाविकाला मंदिरात दर्शनासाठी १० ते १५ सेकंदांचा वेळ मिळतो. त्या तुलनेत इतर मोठ्या मंदिरांमध्ये केवळ पाच ते सात सेकंदच दर्शनासाठी मिळतात. त्यामुळे लोकांची मंदिरात दान देण्याची इच्छा जागृत होते, असे त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले. समितीच्या कल्याणकारी कामांसाठी हे पैसे वापरले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मंदिरात भक्तांकडून देण्यात येणाऱ्या देणग्या, ऑनलाइन पद्धतीने दिल्या जाणाऱ्या देणग्या, पूजा किंवा एखादा विधी करण्याकरिता दिले जाणारे दान, लाडू आणि इतर प्रसादाची विक्री, तसेच अर्पण केले जाणारे सोने-चांदी यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचे मूल्यांकन या समितीद्वारे केले जाते. “आम्ही महागाईनुसार मिळालेल्या देणग्यांचे मूल्यांकन करतो. अन्नपदार्थांच्या किमती आणि सोन्याच्या किमती वाढल्या तरी मंदिरातील सोने-चांदीच्या अधिकाधिक वस्तूंचा लिलाव होत असल्याचे पाहायला मिळते. मंदिरातील प्रसादाची विक्रीदेखील ना-नफा-ना-तोटा तत्त्वावरच केली जाते,” असे यांनी सांगितले.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये श्री सिद्धिविनायक मंदिराचे उत्पन्न १५४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता मंदिर समितीने वर्तवली आहे. मंदिर समितीने ३० मार्च रोजी हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला आणि गुढीपाडव्यानिमित्त १.३३ कोटी रुपयांच्या २०७ सोन्याच्या वस्तूंचा लिलाव केला. देशभरातली श्रीमंत मंदिरांच्या यादीत केरळमधील तिरुवनंतपुरममधील पद्मनाभस्वामी मंदिर, जम्मूमधील वैष्णोदेवी मंदिर, महाराष्ट्रातील शिर्डी साईबाबा मंदिर, उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील राम मंदिर, आंध्र प्रदेशातील तिरुमला वेंकटेश्वर मंदिर, अमृतसर येथील सुवर्ण मंदिर, केरळमधील गुरुवायूर मंदिर, ओडिशाच्या पुरीमधील जगन्नाथ मंदिर, गुजरातमधील सोमनाथ मंदिर आणि वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर या देवस्थानांचा समावेश आहे.
सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू
आता मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही, असे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट (एसएसजीटीटी)ने सांगितले. या जानेवारी महिन्यातच हा नियम लागू करण्यात आला आहे. मंदिर समितीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “भक्तांनी भारतीय पारंपरिक कपडे घालावेत. नियमांनुसार शरीर पूर्णपणे झाकले जाईल, असे कपडे परिधान करावेत. सिद्धिविनायक मंदिरात देशभरातून रोज हजारो भाविक येत असतात. त्यात अनेकांचा पेहराव हा इतरांना संकोच वाटणारा ठरतो. या स्वरूपाच्या तक्रारी सातत्याने मंदिर प्रशासनाकडे येत असल्याने मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे.
मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. हा निर्णय २८ जानेवारीपासून लागू झाला आहे. समितीचे सदस्य राहुल लोंडे यांनी स्पष्ट केले, “आम्ही अलीकडेच एक बैठक घेतली. या बैठकीत पूजास्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी पोशाखांवरील काही नियम लागू करण्याचा सामूहिक निर्णय घेण्यात आला. आम्ही कोणी काय घालावे, हे ठरवत नाही आहोत. आमचे केवळ एवढेच सांगणे आहे की, मंदिरात येणाऱ्या व्यक्तींनी भारतीय संस्कृतीला साजेसे कपडे परिधान करूनच मंदिरात प्रवेश करावा. हा नियम पुरुष आणि महिला दोघांनाही लागू आहे.”
या निर्णयामागील कारणे स्पष्ट करताना ते म्हणाले, “अनेकदा आपल्याला असे भाविक भेटतात जे टी-शर्ट आणि शॉर्ट्स घालून मंदिरात प्रवेश करतात. काही जण शरीर प्रदर्शित करणारे कपडे परिधान करून येतात. प्रत्येक जागेचे काही महत्त्व असते. दररोज सरासरी ७५,००० ते ९०,००० लोक मंदिरात येतात”.