– अनिकेत साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युक्रेनियन सैन्याच्या कडव्या प्रतिकाराने फारसे काही साध्य होत नसताना रशियाने आरएस – २८ सरमत या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची (आयसीबीएम) चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र एकाच वेळी १० शस्त्रास्त्रे वाहून नेऊ शकते. पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवरील लक्ष्य ते भेदू शकते, असा दावा केला जात आहे. रशियाच्या नव्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा हा आढावा.

आरएस – २८ सरमतचा प्रवास कसा?

लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रासाठी रशिया २००० पासून क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम राबवित आहे. त्याच्या भात्यात आर – ३६ एम, एसएस – १८ आणि एसएस – १९ ही आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आहेत. यातील काहींच्या जागी अतिप्रगत क्षेपणास्त्र समाविष्ट करण्यावर संशोधन प्रगतीपथावर आहे. निधीची चणचण आणि रचनेतील समस्यांमुळे लांबणीवर पडलेली ही चाचणी अखेर दृष्टिपथास आली. आरएस – २८ सरमतला नाटोने सेटन – दोन हे नाव दिले आहे. उत्तर रशियाच्या प्लेसेत्स्क येथून ते अवकाशात सोडले गेले. त्याला कामचट्का द्वीपकल्पातील सहा हजार किलोमीटरचे लक्ष्य दिले गेले होते. ही चाचणी झाली असली तरी याच वर्षात रशियन सैन्यात दाखल होण्याआधी त्याच्या आणखी पाच चाचण्या केल्या जातील. यापूर्वी सरमतच्या प्रतिरूप (डमी) तसेच संगणकीय आभासी पद्धतीने अनेकदा चाचण्या पार पडल्या आहेत.

या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे वेगळेपण काय?

सरमत ११ ते १८ हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. २०० टनापेक्षा अधिक वजनाची शस्त्रास्त्रे ते वाहून नेते. त्यामध्ये एकाच वेळी १० वेगवेगळ्या लक्ष्यांवर शस्त्रास्त्रे डागण्याचे तंत्रज्ञान अंतर्भूत आहे. ध्वनीहून अधिक वेगाने मार्गक्रमणासाठी लहान आकाराचे वाहन सोबत नेऊ शकणारे हे पहिलेच क्षेपणास्त्र आहे. इलेक्ट्रॉनिक प्रणालीचे अद्ययावतीकरण, मार्गदर्शन प्रणाली आणि पर्यायी शस्त्रास्त्रे वाहून नेण्याच्या क्षमतेने ते घातक ठरते. त्याचा माग काढणे वा त्याला निष्भ्रम करणे अमेरिकेसह पाश्चात्य देशातील टेहेळणी उपकरणे आणि क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेसाठी आव्हानात्मक मानले जाते. सरमतची उंची आणि वजन जुन्या क्षेपणास्त्राप्रमाणेच आहे. परंतु, त्याचा वेग आणि शस्त्रास्त्र डागण्याची क्षमता अधिक असल्याचे काही अहवाल सांगतात. सरमत हे द्रव इंधनावर चालणारे क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र घनरूप इंधनावर आधारित आहे.

रशियन दावे काय ?

सरमत हे जगातील सर्वांत लांब पल्ल्याचे लक्ष्यभेद करणारे क्षेपणास्त्र असल्याचा दावा चाचणीनंतर रशियन संरक्षण मंत्रालयाने केला. अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पृथ्वीवरील कोणत्याही लक्ष्यावर ते मारा करू शकते याकडे लक्ष वेधले. हे अद्वितीय शस्त्र आमच्या सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता मजबूत करेल. बाह्य धोक्यांपासून रशियाची सुरक्षितता विश्वासार्हपणे करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवीन क्षेपणास्त्र शत्रूला विचार करायला लावेल, असे त्यांनी सूचित केले. चाचणीसाठी निवडलेली वेळ लक्षात घ्यायला हवी. अमेरिकेसह पाश्चात्य राष्ट्रांनी कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. युक्रेन युद्धात अपेक्षित सरशी झालेली नाही. या स्थितीत रशियाने लष्करी क्षमता वृद्धिंगत करीत असल्याचे दर्शविणे हा दबाव तंत्राचा भाग आहे.

नामकरण कसे झाले?

भटक्या लढाऊ जमातीवरून क्षेपणास्त्रास सरमत हे नाव दिले गेल्याचे सांगितले जाते. मध्ययुगीन काळात सध्याच्या दक्षिण रशिया, युक्रेन आणि कझाकिस्तानमध्ये या जमातीचा दबदबा होता. ब्रिटानिका विश्वकोशातून त्याबाबत अधिक स्पष्टता होते. सरमाटियन्स घोडेस्वारी आणि युद्धतंत्रात निपुण होते. प्रशासकीय क्षमता, राजकीय कौशल्यातून त्यांचा प्रभाव वाढला. युरल्स आणि डॉन नदी दरम्यानच्या प्रदेशावर त्यांनी नियंत्रण मिळवले. डॉन नदी ओलांडून सिथियन्सवर विजय प्राप्त केला. दुसऱ्या शतकापर्यंत दक्षिण रशियाचे राज्यकर्ते म्हणून त्यांनी जागा घेतल्याचे विश्वकोष नमूद करतो.

चाचणीबद्दल जगाचे मत काय?

रशिया अतिप्रगत आंतरखंडीय क्षेपणास्त्र विकसित करीत असल्याचे जगजाहीर आहे. पाच वर्षांपूर्वी खुद्द पुतीन यांनी त्याची घोषणा केली होती. पाश्चात्य राष्ट्रांशी बिघडलेल्या संबंधांमुळे त्यास चालना मिळाली. नाझी जर्मनीच्या पाडावानिमित्त रशियात नऊ मे हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर, रशियन नागरिकांना तांत्रिक आघाडीवर काहीतरी यश मिळाल्याचे दाखविण्याची ही धडपड असल्याची टीका होत आहे. हे अशा वेळी घडत आहे, जेव्हा युक्रेन युद्धात रशियन तंत्रज्ञानाचे समाधानकारक परिणाम दिसले नाही. काहींना सरमतच्या विलक्षण क्षमतेमुळे जमिनीवर आणि उपग्रहाधारीत रडार तसेच लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणेला आव्हान निर्माण झाल्याचे वाटते.