दिवसेंदिवस जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे लोकांच्या गरजाही बदलू लागल्या आहेत. लोक आपल्या आरोग्याला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. ‘विगण’सारख्या नवनवीन संकल्पनांचा लोक आपल्या आयुष्यात अवलंब करत आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक रोग येऊ लागले आहेत. त्यामुळे अनेक डॉक्टर्स आपल्या रुग्णांना मांस खाण्याची बंदी करतात. काही पर्यावरणाविषयी जागरूक लोक स्वतः मांस खाणे टाळू लागले आहे, तर दुसरीकडे ‘नॉन-व्हेज’प्रेमींची संख्याही वाढली आहे. यामुळे मागणीतही वाढ झाली आहे.
अशाच प्रश्नांच्या निराकरणासाठी आणि काही मांसप्रेमी ज्यांना काही कारणास्तव मांस सोडावे लागले अशांसाठी प्रयोगशाळेत होणारी मांस लागवड उपयुक्त ठरत आहे. अनेक देशांनी हा व्यवसाय व्यापक स्तरावर वाढवला आहे. आता कोंबडी आणि इतर मासांसह समुद्राशिवाय माशाचे मांस तयार करता येणार आहे. नेमके हे कसे शक्य होणार? आणि याची गरज का पडली? जाणून घेऊयात सविस्तर..
कोची-मुख्यालय असलेल्या इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च (आयसीएआर)मधील सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट (सीएमएफआरआय) ने एका खाजगी क्षेत्रातील स्टार्ट-अपसह सहयोगी संशोधन करार केला आहे. सीएमएफआरआय या खाजगी स्टार्ट-अपने माशाच्या मांसाच्या लागवडीसाठी मांस तंत्रज्ञान सोल्यूशन ऑफर केले असून प्रयोगशाळेत यावर काम होणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या संस्थेने नवी दिल्लीस्थित ‘नीट मीट बायोटेक’सोबत केलेला सामंजस्य करार (एमओयू) हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे.
प्रयोगशाळेत तयार होणारे मासे म्हणजे नक्की काय?
हा केवळ प्रयोगशाळेत तयार करण्यात येणारा किंवा लागवडीखाली तयार होणारा माश्याचा एक प्रकार आहे. सध्या इतर प्रकारचे मांस जसे तयार केले जात आहे अगदी तशाच प्रकारे समुद्राशिवाय सीफूड तयार करणे शक्य होणार आहे, जे अगदी सीफूडप्रमाणेच असेल; परंतु यासाठी प्राण्यांना मारण्याची गरज पडणार नाही.
माश्यामधून विशिष्ट पेशींना वेगळे करून आणि प्राण्यांच्या घटकांपासून मुक्त असलेल्या माध्यमांचा वापर करून प्रयोगशाळेत याची लागवड करून मांस तयार केले जाईल. या लागवडीतील शेवटच्या टप्प्यात ‘वास्तविक’ माशाच्या मांसाची चव, पोत आणि पौष्टिक गुण यात असेल असे जाणकारांचे सांगणे आहे.
यामध्ये सीएमएफआरआय आणि नीट मीटची भूमिका काय असेल?
सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट (सीएमएफआरआय)चे संचालक डॉ. ए. गोपालकृष्णन आणि नीट मीट बायोटेकचे सह-संस्थापक आणि सीईओ डॉ. संदीप शर्मा यांनी गेल्या आठवड्यात कोची येथे स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारानुसार, या दोन्ही संस्था प्रकल्पाशी संबंधित अनुवांशिक, जैवरासायनिक आणि विश्लेषणात्मक कार्यावर लक्ष केंद्रित करेल.
त्याच्या सेल कल्चर लॅबमध्ये, सीएमएफआरआय उच्च-मूल्य असलेल्या सागरी माशाच्या प्रजातींच्या सेल लाइन विकासावर संशोधन करेल. ही एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये पुढील संशोधन आणि विकासासाठी मत्स्य पेशी वेगळे करणे आणि त्यांची लागवड करणे समाविष्ट आहे. यात सुरुवातीला पोम्फ्रेट, किंगफिश आणि सीरफिश यांसारख्या माशाच्या पेशीवर आधारित मांस विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
नीट मीट, सेल कल्चर टेक्नॉलॉजी त्यांच्यातील कौशल्याचा वापर करून सेल वाढ माध्यमांचे ऑप्टिमायझेशन, सेल संलग्नकांसाठी स्कॅफोल्ड्स किंवा मायक्रोकॅरियर्सचा विकास आणि बायोरिएक्टर्सद्वारे उत्पादन वाढविण्यात नेतृत्व करेल. कंपनी आवश्यक उपभोग्य वस्तू, मनुष्यबळ आणि प्रकल्पासाठी आवश्यक असलेली अतिरिक्त उपकरणे देण्यातही सहकार्य करेल, असे सामंजस्य करारात म्हटले आहे.
प्रयोगशाळेत माशाचे मांस तयार करण्याची काय गरज आहे?
व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य प्रयोगशाळेत माशांचे मांस लागवड विकसित करण्यावर अनेक देशांमध्ये प्रयोग सुरू आहेत, ज्यामुळे सीफूडची सतत वाढणारी मागणी पूर्ण होईल आणि वन्य संसाधनांवर आलेला अतिरिक्त दबाव कमी होईल. जास्त मासेमारीमुळे काही माशांच्या प्रजातींवर याचा मोठा परिणाम झाला आहे. काही प्रजातींच्या संख्येमध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे, ज्यामुळे अनेक भागांत संपूर्ण सागरी परिसंस्थेवर परिणाम झाला आहे.
सैद्धांतिकदृष्ट्या, प्रयोगशाळेत लागवड केलेल्या माशाच्या मांसामध्ये अन्न सुरक्षा आणि पर्यावरणीय फायदे सुनिश्चित करण्याची महत्त्वपूर्ण क्षमता आहे. पारंपरिक मासेमारीचा भार कमी करण्यासह, प्रयोगशाळेत लागवड करण्यात आलेले माशाचे मांस प्रतिजैविक आणि पर्यावरणीय प्रदूषणमुक्त असेल. प्रदूषित महासागरातील मायक्रोप्लास्टिक्स किंवा जड धातूंशी त्याचा संपर्क होणार नाही.
कोणते देश प्रयोगशाळेत माशाचे मांस तयार करत आहेत?
हेही वाचा : Bugdet 2024: सर्वसामान्यांच्या बजेटमधून काय आहेत अपेक्षा?
प्रयोगशाळेत लागवड केलेल्या माशाच्या मांसाचे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक उत्पादन होण्यास कदाचित काही वर्षे बाकी आहेत. परंतु, अनेक देशांनी या अग्रगण्य तंत्रज्ञानामध्ये मोठी प्रगती केली आहे. या तंत्रज्ञानात इस्रायल आघाडीवर असून इस्रायलनंतर सिंगापूर, अमेरिका आणि चीन यांचा नंबर येतो.
या महिन्याच्या सुरुवातीला, इस्रायल आधारित फोर्सिया फूड्सने प्रयोगशाळेत लागवड करण्यात आलेल्या गोड्या पाण्यातील ईल मांसाचे यशस्वीपणे उत्पादन केले आणि येत्या काही वर्षांत हे मांस बाजारात उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी, इस्रायलच्या स्टीकहोल्डर फूड्सने सांगितले की, सिंगापूर आधारित उमामी मीट्सच्या सहकार्याने, प्रयोगशाळेत वाढलेल्या प्राण्यांच्या पेशींचा वापर करून शिजवण्यासाठी तयार करता येणारे फिश फिलेट ३डी प्रिंट केले आहे.
“या प्रकल्पाचा उद्देश या क्षेत्रातील विकासाला गती देणे आणि या उदयोन्मुख उद्योगात भारत मागे राहणार नाही याची खात्री करणे आहे”, असे डॉ. गोपालकृष्णन यांनी सीएमएफआरआय-नीट मीट यांच्यातील सार्वजनिक खाजगी भागीदारीबद्दल सांगितले.
“भारत आणि इतर देश, जसे की सिंगापूर, इस्त्रायल आणि यूएसए राष्ट्रांमधील अंतर भरून काढण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कारण हे राष्ट्र आधीच सीफूड संशोधनात प्रगती करत आहेत… हे सहकार्य या क्षेत्रातील अग्रेसर संस्था नीट मीटच्या तांत्रिक ज्ञानासोबत आणि सीएमएफआरआयच्या सागरी संशोधन कौशल्याचा लाभ घेऊन शक्य होणार आहे. यामुळे भारतातील समुद्री खाद्य उत्पादनासाठी शाश्वत आणि सुरक्षित भविष्याचा मार्ग मोकळा होईल,” असे त्यांनी सांगितले. नीट मीटचे डॉ. शर्मा यांनी विश्वास व्यक्त केला की, प्रकल्पाच्या संकल्पनेचा पुरावा येत्या काही महिन्यांत स्थापित केला जाईल.
प्रयोगशाळेत इतर कोणत्या प्रकारचे मांस तयार केले जात आहे?
डच फार्माकोलॉजिस्ट मार्क पोस्ट हे २०१३ मध्ये संवर्धित मांसाच्या संकल्पनेचा पुरावा सादर करणारे पहिले व्यक्ती होते. जगभरातील अनेक कंपन्या आता कोंबडी, डुक्कर, कोकरू, गोमांस, मासे यांच्या पेशींमधून प्रयोगशाळेत उगवलेले मांस विकसित करण्यावर काम करत असल्याची नोंद आहे.
एक जागतिक नॉनप्रॉफिट थिंक टॅंक असलेल्या गुड फूड इन्स्टिट्यूट, ज्यामध्ये भारताचा अध्यायही आहे. यानुसार, २०२२ च्या अखेरीस या उद्योगाने सहा महाद्वीपांमध्ये १५० पेक्षा जास्त कंपन्यांची वाढ केली आहे, ज्यांना २.६ अब्ज रुपयांच्या गुंतवणुकीचे समर्थन आहे. यासह अनेक कंपन्या मूल्य साखळीसह तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तयार केल्या आहे.”
हेही वाचा : घरबसल्या ॲमेझॉनवरून आता खरेदी करता येणार ‘कार’; कंपनी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत
जून २०२३ मध्ये, यूएस कृषी विभागाने देशात प्रयोगशाळेत उगवलेल्या कोंबडीच्या मांसाच्या विक्रीला मंजुरी दिली. दोन कॅलिफोर्नियास्थित कंपन्यांना, गुड मीट आणि अपसाइड फूड्स, रेस्टॉरंट्स आणि सुपरमार्केटमध्ये प्रयोगशाळेत उगवलेले चिकन मांस पुरवण्याची परवानगी देण्यात आली.