भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावस्कर करंडकासाठीच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज बुमरासमोर सफाईदार खेळ करू शकला नाही. परंतु, अखेरच्या कसोटीत बुमराच्या पाठीच्या दुखापतीने डोके वर काढले. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सुटकेचा निश्वास टाकला. भारतीय संघात मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले. बुमराच्या दुखापतीचे स्पष्ट चित्र समोर आले नसले तरी त्याच्यावरील उपचार आणि त्याचे पुनरागमन याविषयी चर्चांना सुरुवात झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॅक स्पॅझम म्हणजे काय?

स्पॅझम किंवा पेटके किंवा वांब किंवा स्नायू संकोच ही एक साधारण प्रक्रिया किंवा प्रतिक्रिया आहे. स्नायूवर अतिताण पडला आणि त्याबरोबरीने शरीरात द्रवाचा (फ्लुइड्स) अंश कमी झाल्यास तात्काळ किंवा कालबद्ध स्नायू संकोच होतो आणि वेदना जाणवू लागतात. बुमरासारख्या क्रीडापटूच्या आणि वेगवान गोलंदाजांच्या बाबतीत पोटरी, मांडी तसेच पाठीच्या स्नायूंवर खूप ताण येतो. बुमरा गोलंदाजी टाकताना त्याच्या पाठीच्या खालच्या भागाचा वापर अधिक करतो. या स्नायूंच्या ताकदीमुळेच चेंडूला संवेग प्राप्त होतो. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रतिस्पर्धी गडी बाद करण्याची जबाबदारी बुमरावर सर्वाधिक होती. तसेच, पहिल्या कसोटी सामन्यातील त्याच्या विजयी, निर्णायक कामगिरीमुळे बुमराचा उत्साहही दुणावला होता. पण या भानगडीत पाठीच्या स्नायूंकडे त्याने किंवा संघ व्यवस्थापनाने पुरेसे लक्ष दिले नाही. त्यामुळे सिडनी कसोटीच्या अंतिम टप्प्यात त्याला बॅक स्पॅझम जाणवू लागले. 

हेही वाचा >>> युक्रेनकडून रशियन नैसर्गिक वायूचा पुरवठा खंडित… नैसर्गिक वायूसाठी युरोपचे रशियावरील अलंबित्व खरेच संपले?

पाठदुखी आणि बुमरा…

क्रिकेटच्या तीनही प्रारूपांतील सर्वोत्तम गोलंदाज अशी बुमराची ख्याती आहे. मात्र, सततच्या खेळाने पडलेल्या ताणामुळे बुमराला कारकीर्दीत तिसऱ्यांदा पाठदुखीला सामोरे जावे लागले आहे. सर्वांत प्रथम २०१९ आणि त्यानंतर २०२२ मध्ये बुमराला पाठीच्या दुखापतीला सामोरे जावे लागले होते. दुसऱ्या दुखापतीच्या वेळी त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करावी लागली होती. जवळपास वर्षभर तो मैदानाबाहेर होता.

पहिल्यांदा पाठदुखी कधी?

सर्वांत प्रथम २०१९ मध्ये बुमराच्या पाठदुखीने डोके वर काढले. तेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच खेळताना त्याला वेदना जाणवू लागल्या होत्या. त्यानंतरही बुमराने विंडीजचा दौरा केला. त्या दौऱ्यानंतर झालेल्या चाचणीत पाठीची समस्या समोर आली. परिणामी बुमराला क्रिकेटपासून दूर राहावे लागले. इंग्लंडमध्ये झालेल्या चाचण्यांत पाठीच्या खालच्या बाजूस फ्रॅक्चर असल्याचे दिसून आले. यावर सर्व उपचार करून बुमराने मॅच फिटनेस दाखवण्यासाठी रणजी चषकाचा सामना खेळण्याचे ठरवले. मात्र, संघ व्यवस्थापनाने त्याला अधिक ताण न घेण्याचा सल्ला दिला. तीन महिन्यांच्या पुनर्वसन कार्यक्रमानंतर २०२० च्या सुरुवातीला बुमराने न्यूझीलंड दौऱ्यातून संघात पुनरागमन केले.

हेही वाचा >>> ३४ वर्षांपासून चळवळीत… १७० हून अधिक गुन्हे, चार राज्यांत १ कोटींचे बक्षीस… नक्षलींची ‘गॉडमदर’ तारक्काचे आत्मसमर्पण का महत्त्वाचे?

बुमरा यानंतर किती स्थिरावला?

न्यूझीलंड दौऱ्यानंतर बुमरा मैदानावर परतला तरी दुखापतीच्या तक्रारी सुरूच होत्या. त्यानंतर २०२२ मध्ये पुन्हा एकदा बुमराची पाठदुखी बळावली. सुरुवातीला पुनर्वसन कार्यक्रमातून बुमराला आशिया चषक स्पर्धेत खेळविण्यात आले. ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि त्यापूर्वीच्या दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी बुमराला संघात स्थान मिळाले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात तो खेळला नाही. नंतर दोन सामने मात्र खेळला. पुढे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यापूर्वी बुमरा पाठदुखीने त्रस्त असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा बुमरा उर्वरित मालिका आणि नंतरच्या विश्वचषक स्पर्धेत खेळू शकला नाही. २०२३ मध्ये त्याच्या पाठीवर न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. या वेळी मात्र तो वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिला.

आताची दुखापत किती गंभीर?

बुमराच्या या वेळच्या दुखापतीविषयी अद्याप काहीच स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. बुमरा मायदेशी परतल्यावर न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे. त्यानंतरच त्याच्या दुखापतीचे नेमके स्वरूप समोर येईल. खेळाडूची दुखापत आणि त्यानंतरचे त्याचे पुनर्वसन हे दुखापतीच्या स्वरुपावर अवलंबून असते. ‘ग्रेड १’ श्रेणीतील दुखापत असल्यास दोन ते तीन आठवड्यात तो मैदानावर परतू शकेल. दुखापत ‘ग्रेड २’ श्रेणीतील असेल, तर पुनरागमनासाठी सहा आठवडे लागतात. जर ‘ग्रेड ३’ श्रेणीतील दुखापत असेल, तर पुनरागमनासाठी किमान तीन महिने वाट बघावी लागेल. अपवादात्मक परिस्थितीत हा कालावधी लांबू शकतो. बुमराचे भविष्य आणि पुनर्वसन कार्यक्रम याविषयी केवळ डॉक्टरच अंतिम निर्णय घेऊ शकतील असे आता सांगण्यात येत आहे.

नव्याने दुखापतीने चिंता का?

बुमराची या वेळी झालेली दुखापत सर्वार्थाने दुर्दैवी आणि भारताची चिंता वाढवणारी ठरणार आहे. ऑस्ट्रेलियात बुमरा स्वप्नवत लयीत होता. एकट्याच्या बळावर बुमराने मालिकेत रंगत भरली होती. ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज त्याला आत्मविश्वासाने खेळू शकला नाही. बुमराने या मालिकेत सर्वाधिक ३२ गडी बाद केले. आता भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकाच्या तयारीला लागणार आहे. या स्पर्धेत भारताला यशस्वी कामगिरी करायची झाल्यास बुमराने तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप त्याच्या दुखापतीबाबत स्पष्ट माहिती न मिळू शकल्याने चॅम्पियन्स करंडक सहभागाबाबत संभ्रम राहणार आहे. तो वेळेत तंदुरुस्त होईल अशीच भारतीय संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांना आशा असेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How serious is jasprit bumrah back injury likely to miss in champions trophy print exp zws