आफ्रिकन देशांत एमपॉक्स म्हणजेच मंकीपॉक्सची साथ वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केले आहे. गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा ही वेळ आली आहे. आफ्रिकेतील बाराहून अधिक देशांत पसरत असलेल्या या साथीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज संघटनेने व्यक्त केली आहे. ही साथ का धोकादायक ठरते आहे, याबाबत…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमपॉक्स म्हणजे काय?

एमपॉक्स हा प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत आढळणारा साथीचा आजार आहे. हा आजार देवीच्या रोगासारखा असतो, पण कमी संसर्गजन्य आहे. एमपॉक्स झालेल्या व्यक्तीचा वा प्राण्याचा अगदी नजीकचा संपर्क आला, तर किंवा या विषाणूने दूषित झालेले मांस खाल्ले, तर त्यातून हा रोग पसरतो. लैंगिक संबंधांद्वारेही या रोगाची लागण होऊ शकते. यामुळे गर्भावरही परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा >>>सर्वोच्च न्यायालयाकडून ३९ ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती; निवड प्रक्रियेत झाला मोठा बदल, जाणून घ्या

या आजाराची पार्श्वभूमी काय आहे?

या रोगाचा शोध १९५८ मध्ये लागला. संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या माकडांमध्ये याचा प्रादुर्भाव आढळला. या आजाराच्या मानवाला झालेल्या संसर्गाचे प्रथम निदान १९७० मध्ये काँगोमध्ये झाले. जागतिक आरोग्य संघटनेने जुलै २०२२ मध्ये एमपॉक्स साथीबाबत प्रथमच जागतिक स्वास्थ्य आणीबाणी जाहीर केली होती. त्या वेळी आधी कधीही न आढळलेल्या ७० देशांत हा आजार आढळून आला होता. तेव्हापासून आतापर्यंत ११६ देशांतील एक लाख लोकांना याचा संसर्ग झाला आहे. युरोप, आशिया आणि अमेरिकेत त्या मानाने या रोगाची साथ कमी आहे. आफ्रिकेत मात्र काही भागांत अतिशय नाजूक स्थिती आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीपासून २८ जुलैपर्यंतची आकडेवारी पाहिली, तर आफ्रिकेत गेल्या वर्षीच्या तुलनेत याचा प्रादुर्भाव १६० टक्क्यांनी अधिक आहे.

एमपॉक्सची साथ सध्या कुठे?

संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, काँगोमध्ये एमपॉक्सचा सर्वाधिक प्रादुर्भाव असून, तेथे १५ हजार ६०० जणांना संसर्ग झाला आहे, तर ५३७ जण दगावले आहेत. हा प्रादुर्भाव २०२२ पेक्षा अधिक तीव्र आहे. या रोगामुळे दगावलेल्या रुग्णांपैकी ९६ टक्के मृत्यू एकट्या काँगोमध्ये नोंदवले गेले आहेत. या आजाराची लागण प्रथमच बुरुंडी, केनिया, रवांडा आणि युगांडा या पूर्व आफ्रिकेतील देशांतही नोंदवली गेली आहे. ही साथ कशी रोखायची, याबाबत वैद्यकीय जगतात अजूनही पुरेसे ज्ञान निर्माण झालेले नाही. परिणामी, या साथीचा प्रसार जगभरात होण्याची शक्यता असून, अमेरिकेने त्यांच्या देशातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना दक्ष राहण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा >>>भारताला अमेरिकेकडून मिळणार ‘हंटर किलर’; काय आहे MQ-9B? कोटींची गुंतवणूक करून भारत हे ड्रोन का खरेदी करत आहे?

आफ्रिका सोडून अन्य कुठे रुग्ण?

स्वीडिश आरोग्य यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वीडनमध्ये एमपॉक्सचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला आहे. त्याच्यावर स्टॉकहोममध्ये एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा रुग्ण आफ्रिकेत असताना त्याला एमपॉक्सचा संसर्ग झाल्याचे स्वीडिश आरोग्य यंत्रणांनी नमूद केले आहे. आत्ताच्या साथीमध्ये आफ्रिकेबाहेर आढळलेला हा पहिलाच एमपॉक्सचा रुग्ण आहे.

एमपॉक्सची लक्षणे काय आहेत?

या आजारात ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी यांच्या जोडीने अंगावर पुरळ येऊन त्याचे मोठे फोड होतात. ही लक्षणे दोन ते चार आठवडे टिकतात. पूरक काळजी आणि लक्षणांवर मात करणे इतकेच उपचार सध्या तरी उपलब्ध आहेत. हा आजार कुमारवयीनांसाठी आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्यांसाठी अधिक धोकादायक असतो, असे याचा पूर्वाभ्यास सांगतो. त्याचप्रमाणे एचआयव्हीसारखी सहव्याधी असलेल्यांनाही यामुळे जीविताचा धोका उत्पन्न होऊ शकतो.

यावर उपचार कसे केले जातात?

सन २०२२ मध्ये लशींचा वापर करण्यात आला होता. मात्र, सध्याची बिकट स्थिती आटोक्यात आणण्यासाठी त्या पुरेशा नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जगभरातच या लशींचा तुटवडा आहे. त्यामुळे समाजात वावरताना सुरक्षित अंतर राखणे एवढीच गोष्ट रोगाचा फैलाव रोखण्यास उपयोगी पडू शकते. पण, काँगोसारख्या देशात, जेथे अनेक देशांतर्गत विस्थापित शहरांमधील आश्रय शिबिरांत राहतात, त्यांच्यासाठी असे अंतर राखणे फार अवघड आहे. काँगोने आता लसीकरणासाठी दोन एमपॉक्स लशींना मान्यता दिली आहे.

एमपॉक्सचा सर्वाधिक धोका कोणाला?

एमपॉक्सचा विषाणू अधिक धोकादायक बनला असून, काँगोमधील मृत्यूदर ३ टक्के इतका आहे. गेल्या साथीच्या वेळी तो ०.२ टक्के होता. महिला आणि मुलांमध्ये हा आजार झपाट्याने पसरत असून, रुग्णालये भरली असल्याने नवजात शिशूंना संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे.

siddharth.kelkar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How serious is monkeypox why was this infection declared a global health emergency print exp news amy