भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक स्पर्धेतील सामना पावसामुळे पूर्ण झाला नसला, तरीही या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीची चर्चा राहिली. रोहित शर्मा व विराट कोहलीसारख्या फलंदाजांना बाद केल्याने भारताच्या फलंदाजांचा डावखुऱ्या गोलंदाजांसमोर कमकुवतपणा पुन्हा समोर आला. भारताचे दिग्गज फलंदाज वारंवार आफ्रिदीला का गारद होतात, त्याचा स्विंग खेळणे अवघड आहे का, याचा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांना खेळताना नेहमी अडचण का येते?

जागतिक क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज डावखुरे वेगवान गोलंदाज होऊन गेले. ज्यामध्ये वसीम अक्रम, चमिंडा वास यांची नावे समोर येतात. सध्याच्या काळात शाहीन शाह आफ्रिदी व ट्रेंट बोल्टसारखे गोलंदाज फलंदाजांच्या अडचणी वाढवताना दिसत आहेत. मुळातच डावखुऱ्या गोलंदाजांचा ‘इन स्विंग’ व ‘आऊट स्विंग’ खेळण्यास उजव्या हाताच्या फलंदाजांना अडचणी येताना दिसतात. त्यातच या गोलंदाजांना पोषक वातावरण मिळाल्यास ते आणखीनच घातक सिद्ध होत असतात. त्यामुळे फलंदाजांना त्यांचा स्विंग ओळखणे कठीण जाते. विशेष करून उजव्या हाताने खेळणाऱ्या फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागतो. या द्वंद्वात नेहमीच गोलंदाजांचे पारडे जड राहते. भारताविरुद्धच्या सामन्यात आफ्रिदीने ३५ धावांत ४ गडी बाद करत भारताच्या दिग्गज फलंदाजांच्या अडचणीत भर पाडली होती.

हेही वाचा – विश्लेषण : युद्धाच्या धामधुमीत युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांची हकालपट्टी का? नव्या संरक्षणमंत्र्यांसमोर किती मोठे आव्हान?

शाहीन शाह आफ्रिदी इतका घातक का ठरतो?

पाकिस्तान संघाला चांगल्या वेगवान गोलंदाजांचा वारसा आहे. वकार युनिस, वसीम अक्रम, उमर गुल यांच्यासह आताचे हॅरिस रौफ, युवा नसीम शाह हेदेखील फलंदाजांसाठी घातक ठरताना दिसत आहेत. मात्र, आफ्रिदीने या सर्वांमध्ये वेगळा ठसा उमटवला आहे. आतापर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीत त्याने ४१ एकदिवसीय सामन्यांत ८२ गडी बाद केले आहेत. आफ्रिदी युवा असला तरीही, अनेक फलंदाजांच्या मनात त्याने दहशत निर्माण केली आहे. आतापर्यंतच्या आशियाई चषकातील दोन सामन्यांत त्याने सहा बळी मिळवले आहेत. आफ्रिदी चेंडू दोन्ही बाजूने वळवण्यात सक्षम आहे. त्यामुळे फलंदाजांना त्याच्या चेंडूचा अंदाज लावणे कठीण जाते. उजव्या फलंदाजांना त्याला खेळणे कठीण जाते. तसेच चांगली उंची, आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्यातही तो सक्षम आहे. तसेच, ‘फुल लेन्ग्थ’ व ‘यॉर्कर’ चेंडूही टाकण्यात त्याचा हातखंडा असल्याने सध्याच्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्व फलंदाजांना त्याचा सामना करणे अवघड जात आहे. परिस्थितीनुसार तो आपल्या गोलंदाजीत बदल करतो, तसेच चेंडूवरील त्याचे नियंत्रणही कमालीचे आहे.

रोहित, विराट यांना डावखुऱ्या गोलंदाजांसमोर अडथळे का येतात?

रोहित व विराट हे आफ्रिदीविरुद्ध बाद झाल्याने पुन्हा एकदा डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्धची त्यांची कमकुवत बाजू समोर आली. त्यातच नव्या चेंडूने या दोन्ही फलंदाजांना खेळताना अडचणी येतात. २०२१ पासून कोहली चार वेळा डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला बाद झाला आहे. त्यांच्याविरुद्ध कोहलीला २१.७५च्या सरासरीने ८७ धावाच करता आल्या आहेत. तर, कर्णधार रोहित शर्माला २०२१ पासून डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने तब्बल सहा वेळा बाद केले आहे. रोहितला त्यांच्याविरुद्ध खेळताना २३च्या सरासरीने १३८ धावाच करता आल्या आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही फलंदाज सुरुवातीच्या चार षटकांत अधिक वेळा बाद झाले आहेत. त्यामुळे भारतात होणारी आगामी विश्वचषक स्पर्धा पाहता या दोन दिग्गज फलंदाजांना आपल्या या चुकांवर मेहनत घ्यावी लागणार आहे. या दोन्ही फलंदाजांना आफ्रिदीच्याविरुद्ध ‘स्विंग’ चेंडूंचा सामना करताना अडथळा येतो. आफ्रिदी दोन्ही बाजूने चेंडू ‘स्विंग’ करतो. त्यामुळे विराट आणि रोहित यांना त्याचा सामना करताना अडचण येते. आफ्रिदीच्या ‘इन स्विंग’ चेंडूवर त्यांना त्रिफळाचीत किंवा पायचीत होण्याची शक्यता असते. ‘आऊट स्विंग’ चेंडूवर त्यांच्या बॅटची कड लागण्याची शक्यता असते. तसेच ‘इन स्विंग यॉर्कर’ खेळणेही या फलंदाजांना कठीण जाते.

हेही वाचा – महाराष्ट्र-तेलंगणा सीमावाद पुन्हा का वाढतो आहे?

विराट, रोहित यांना आपल्या फलंदाजीत काय सुधारणा करावी लागेल?

विराट आणि रोहित या दोन्ही फलंदाजांना डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा ‘इन स्विंग’ चेंडू खेळताना अडथळा येतो. त्यामुळे त्यांना यावर मार्ग काढावा लागेल. यासाठी त्यांना चेंडू खेळण्यासाठी ‘क्रीझ’च्या बाहेर येऊन फलंदाजी करावी लागेल. जेणेकरून ‘स्विंग’ खेळताना फारशी अडचण होणार नाही. तसेच, पायचीत बाद होण्याची शक्यताही कमी होते. यासह दोन्ही फलंदाजांना बॅट आणि पॅड यामधील अंतर चेंडू खेळताना कमी केले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या बॅटला कड लागून त्रिफळाचीत होण्यापासून वाचता येईल. तसेच, ‘आऊट स्विंग’ चेंडूचा सामना करताना आपल्या टप्प्यातील चेंडूवर प्रहार करावा, जेणेकरून चेंडू बॅटची कड घेणार नाही. यासह ‘कव्हर ड्राईव्ह’ केवळ ‘फुल लेंथ’ चेंडूवर खेळावा. तसेच, ‘बॅकफूट’ व ‘फ्रंटफूट’वर आपला बचावात्मक खेळ आणखी भक्कम करावा. यासह सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही काळ गोलंदाजाच्या ‘स्विंग’चा अंदाज घ्यावा. त्यानंतरच मोठे फटके मारण्यास त्यांनी प्राधान्य द्यावे. एकदा गोलंदाजाला समजून खेळल्यास धावा करण्यास अडचण येत नाही. कोहलीला बऱ्याच वेळा ‘स्लिप’मध्ये झेल देताना पाहिले आहे. यावर उपाय म्हणून त्याने बाहेरचे चेंडू सोडावे. मैदानात जम बसल्यानंतर आपले नियमित फटके मारावे, असे जाणकारांचे मत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How shaheen afridi repeatedly take rohit virat wickets is his swing difficult to play print exp ssb