काहीच दिवसात ‘पठाण’ या चित्रपटातून तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणारा शाहरुख खान चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच वाद निर्माण झाला असून सोशल मीडियावर त्याला बॉयकॉट करायची मागणी होताना दिसत आहे. याबरोबरच शाहरुख खानचं नाव नुकतंच जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्याच्या यादीत चौथ्या स्थानावर असल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं आहे.
या यादीत शाहरुख खान हा एकमेव भारतीय अभिनेता आहे आणि त्याने या यादीत बऱ्याच बड्याबड्या हॉलिवूडस्टार्सनासुद्धा मागे टाकलं आहे. आज तब्बल ६००० कोटीहून अधिक संपत्ती असणाऱ्या शाहरुख खानचा इथवरचा प्रवास जेवढा वाटतो तितका सोपा नव्हता. दिल्लीच्या सामान्य कुटुंबातील एक सामान्य मुलगा मुंबईत अभिनेता बनायचं स्वप्न घेऊन येतो आणि जगातील सर्वात चौथा श्रीमंत अभिनेता म्हणून त्याला ओळख मिळते ही फार अभिमानास्पद बाब आहे.
आणखी वाचा : बॉलिवूडचा ‘पठाण’ ठरला जगातील चौथा सर्वात श्रीमंत अभिनेता; ‘या’ हॉलिवूड स्टार्सना शाहरुखने टाकलं मागे
टेलिव्हिजन ते चित्रपट प्रवास :
‘फौजी’, ‘सर्कस’, ‘वागळे की दुनिया’ या अशा काही टीव्ही मालिकांमधून शाहरुख खानने त्याच्या अभिनयाची सुरुवात केली. त्याआधी तो दिल्लीमध्ये बेरी जॉन यांच्याकडे नाटकाचं प्रशिक्षण घेत होता. आई वडिलांचं अकस्मात निधन आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेणाऱ्या शाहरुखने अभिनयाचं स्वप्न उराशी बाळगून मुंबई गाठली. मुंबईतील मरीन लाईन्सवर बसून आपल्या परिस्थितीवर नाराज असलेल्या या तरुण शाहरुखने “मी एक दिवस या शहरावर राज्य करेन” असं उद्गार काढलं आणि त्याने ते करून दाखवलं.
‘दिवाना’ चित्रपटातून शाहरुखने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली, पण त्याआधी त्याने केलेले काही चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत तर काही नंतर प्रदर्शित झाले. त्यानंतर त्याने ‘बाजीगर’, ‘डर’सारख्या चित्रपटातून नकारात्मक भूमिका साकारत तेव्हाच्या प्रस्थापित नटांना आव्हान दिलं. नंतर करण जोहर आणि यश चोप्रा या दोन दिग्गजांनी त्याला ‘रोमॅंटिक हीरो’च्या भूमिकांमध्ये ज्यापद्धतीने सादर केलं त्यामुळेच तो बॉलिवूडचा ‘रोमान्स किंग’ बनला. खासकरून १९९० आणि २००० च्या दशकात शाहरुख खान हे नाव प्रत्येकाच्या तोंडी होतं. तरुणाईच्या गळ्यातला तो ताईत बनला. शाहरुखच्या काही चाहत्यांना त्याचं यश चोप्रा आणि करण जोहरच्या बॅनरखाली काम करणं पसंत पडलं नाही, कारण शाहरुखच्या कामात एकसुरूपणा येत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. पण शाहरुख काम करत राहिला आणि लोकांचं मनोरंजन करत राहिला. २०१८ साली आलेल्या ‘झीरो’ या चित्रपटामुळे शाहरुखला चांगलाच फटका बसला आणि त्यानंतर त्याने तब्बल ४ वर्षं मोठ्या पडद्यापासून फारकत घेतली.
शाहरुख खान एक बिझनेसमन :
शाहरुख खान हा उत्तम अभिनेता आहे हे आपल्याला ठाऊक आहेच. याबरोबरच तो एक उत्तम निर्माता आणि उद्योजकही आहे. एका मुलाखतीमध्ये शाहरुख म्हणाला होता की चित्रपट हे त्याचं प्रेम आणि त्यामुळे त्यासाठी तो काहीच मानधन घेत नाही. जाहिराती आणि ब्रॅंडची कामं यातून त्याला पुरेसा पैसा मिळतो. शिवाय शाहरुखने ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ या नावाने एक निर्मिती संस्था सुरू केली आणि पाहता पाहता या संस्थेला त्याने देशातील व्हीएफएक्स मध्ये काम करणारी एक उत्कृष्ट कंपनी बनवलं. याबरोबरच आयपीएलमधील कोलकाताच्या संघाचासुद्धा तो मालक आहे. याबरोबरच शाहरुख हा दुबईचासुद्धा ब्रॅंड अम्बॅसडर आहे. शिवाय इतरही काही व्यवसायात शाहरुख निपुण आहे.
शाहरुख आणि वाद :
हे समीकरण आपण याआधीसुद्धा पाहिलं आहे. शाहरुख खानला त्याच्या देशभक्तीवरून, मुस्लिम असण्यावरून बरंच ट्रोल केलं जातं. खासकरून गेल्या काही वर्षात त्याच्या बऱ्याच चित्रपटांना लोकांचा प्रचंड विरोध झाला. ‘माय नेम इज खान’पासून ‘पठाण’पर्यंत त्याच्या बऱ्याच चित्रपटाच्यावेळी वेगवेगळे वाद निर्माण झाले. यामुळे शाहरुख आणि त्याच्या चित्रपटाचीही चांगलीच चर्चाही व्हायची. आता ‘पठाण’च्या बाबतीतही शाहरुखला अशाच विरोधाला सामोरं जावं लागत आहे. त्याच्यावर होणारया प्रत्येक टिकेला शाहरुख त्याच्या खास शैलीत उत्तर देतो. त्याचा हजरजबाबीपणा आणि विनोदबुद्धी ही जबरदस्त आहे. यामुळेच कदाचित एवढा विरोध होऊनसुद्धा तो त्याचं काम करत असतो.
आतासुद्धा त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटाला प्रचंड विरोध होत असतानाही शाहरुख त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातून तब्बल ४ वर्षांनी शाहरुख पुनरागमन करणार आहे. त्याचा हा चित्रपट हीट ठरणार की फ्लॉप ते येणारी वेळच ठरवेल, पण सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत मानाचं स्थान मिळवणारा शाहरुख खान हा त्याच्या मेहनतीच्या जोरावर या ठिकाणी पोहोचला आहे हे सर्वमान्य सत्य आहे.