राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षापुढे आव्हानात्मक परिस्थिती होती. मात्र, लढलेल्या दहा जागांपैकी आठ जागांवर विजय मिळवत या पक्षाने आपणच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे दाखवून देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उभा केला आहे. अर्थातच हे सर्व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे घडून आले. त्यातून जनमानसाची नस जाणणारे आणि राजकारणाच्या पटावरील ‘किंग’ शरद पवार हेच असल्याचे सिद्ध झाले. त्यासाठी पडद्यावर आाणि पडद्यामागे शरद पवार यांनी खेळलेल्या चाली कशा यशस्वी ठरल्या, त्याविषयी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पक्षफुटीनंतरचा विलक्षण संयम

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आजवरचे अनेक वर्षांपासूनचे साथीदार पक्षनिष्ठा, पक्षश्रेष्ठींविषयीचा आदर हे सर्व काही विसरून दुसरीकडे गेले. अशा परिस्थितीत संयम काय असतो आणि संयमाने कशा प्रकारे परिस्थिती हाताळायची असते. हे शरद पवार यांनी दाखवून दिले. आजवरच्या ६० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक प्रसंगांना सामोरे गेलेले पवार यांनी कार्यकर्त्यांनाही धीराने वागण्याचा सल्ला देत पुन्हा नव्या पक्षाची जुळणी करण्यास शून्यापासून सुरुवात केली. त्यावेळी संयमाने परिस्थितीला तोंड देत साथ न सोडलेल्या मोजक्या शिलेदारांना त्यांनी लढण्याची उमेद दिली. अशा कठीण प्रसंगी प्रतिक्रिया देतानाही त्यांनी कोठेही नाराजीचा सूर न काढता नव्या दम्याने कामाला लागण्याची ऊर्मी दिली. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना हे यश मिळू शकले.

हेही वाचा…नीट परीक्षेच्या निकालावरुन रणकंदन; नेमके काय घोळ झालेत?

नवे चेहरे निवडताना चाणाक्षपणा…

जुने नेते पक्ष सोडून गेल्याने पक्ष उभारणीसाठी शरद पवार यांनी जुन्यांना परत पक्षात आणण्यापेक्षा नवीन चेहऱ्यांना संधी देऊन लढत देण्याची नीती यशस्वी ठरली. नवीन चेहरे निवडतानाही त्यांच्यातील राजकीय चाणाक्षपणा दिसून आला. दहा उमेदवारांपैकी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे दोन उमेदवार वगळता अन्य सर्व उमेदवार हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी नवखे होते. साताऱ्यातील उमेदवार माजी मंत्री शशिकांत शिंदे, नगरचे उमेदवार पारनेरचे आमदार निलेश लंके आणि वर्ध्यातील उमेदवार माजी आमदार अमर काळे हे विधानसभेच्या निवडणुकीचा अनुभव असलेले उमेदवार वगळता अन्य पाच उमेदवारांना पवार यांनी पहिल्यांदा थेट लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यामध्ये दिंडोरीतील भास्कर भगरे, बीडमधील बजरंग सोनवणे, भिवंडीतील सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे आणि रावेरमधील श्रीराम पाटील यांचा समावेश होता. त्यापैकी शशिकांत शिंदे आणि श्रीराम पाटील हे वगळता अन्य आठही उमेदवारांनी थेट संसद गाठली. त्यामागे अर्थातच निवडून आणणारे उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्याचे कसब पवार यांनी दाखवून दिले.

राजकीय, सामाजिक परिस्थितीचे भान

शरद पवार यांनी नव्या चेहऱ्यांची निवड करतानाही संबंधित मतदार संघातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहून केल्याचे दिसून आले. त्याचबरोबरच उमेदवाराची मतदार संघामधील प्रतिमा पाहून उमेदवार उभे केले. त्यासाठी त्यांचे राजकीय कसब पणाला लावले. नवखे उमेदवार निवडून येतील का, अशी शंका अनेकांच्या मनात होती. मात्र, पवार यांनी ती फोल ठरवली. नगरमध्ये आजवर अनेक वर्षे आणि पिढ्यानपिढ्या वर्चस्व असलेल्या विखे पाटील घराण्यातील सुजय विखे पाटील हे समोर असताना अगदी सामान्य कुटुंबातील मात्र जनमानसांमध्ये काम करणारा कार्यकर्ता अशी प्रतिमा असल्याने निलेश लंके यांना उभे करण्याची शरद पवार यांची व्यूवहरचना यशस्वी ठरली. बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे या उमेदवार असल्याने मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होण्याची शक्यता गृहीत धरून पवार यांनी अगदीच नवखे असलेले; परंतु बीडमध्ये प्रभाव असलेले बजरंग सोनवणे यांना उभे करून या मतदारसंघाचा निकाल बदलून टाकला. दिंडोरीमध्ये शिक्षकी पेशातील सर्वसामान्य; पण या भागात आदराचे स्थान असलेले भास्कर भगरे यांना दिलेली उमेदवारी सर्वांनाच आश्चर्यकारक वाटत होती. मात्र, पवार यांची चाणाक्ष नीती या ठिकाणी उपयोगी पडली. उमेदवार निवडताना संबंधित मतदार संघातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा आजवरचा दांडगा अनुभव पणाला लावून पवार यांनी पक्षाला हे यश मिळवून दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा…निवडून आलेल्या खासदारांना दरमहा किती वेतन मिळणार? जाणून घ्या

बारामतीत आव्हानात्मक मोट जुळणी…

बारामती लोकसभा मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागले होते. शरद पवार आणि अजित पवार यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, शरद पवार हे मित्रपक्षांबरोबर विरोधी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची मने वळवण्यात यशस्वी झाल्याचे सुप्रिया सुळे यांच्या विजयाने स्पष्ट झाले आहे. अनेक वर्षांपासूनचे राजकीय वैर विसरून त्यांनी भोरचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांची घेतलेली भेट, एके काळचे मित्र परंतु काही वर्षांपासून दुरावलेले माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे, दिवंगत माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबीयांची भेट यांसारख्या घटनांनी या मतदारसंघातील वातावरण फिरले. दौंडमध्ये भाजपची ताकद असतानादेखील पवार यांचा या भागात असलेला वैयक्तिक संपर्काचा करिष्मा निकालामधून दिसून आला. इंदापूरनेही त्यांना साथ दिली.

sujit.tambade@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How sharad pawar trumped rivals and calculations to post a stunning lok sabha performance print exp psg