बदलत्या जीवनशैलीमुळे कामाचा ताण वाढला आहे आणि कामाच्या ताणामुळे घरोघरी रक्तदाबाची (ब्लड प्रेशर) समस्याही दिसून येत आहे. आजकाल तरुण असो वा ज्येष्ठ, अनेकांमध्ये उच्च किंवा कमी रक्तदाबाची समस्या दिसून येते; त्यामुळे घराघरामध्ये आज ब्लड प्रेशर मशीन असल्याचे पाहायला मिळते. मात्र, ब्लड प्रेशर तपासण्याची योग्य पद्धत अनेकांना माहीत नसते. संशोधकांना असे आढळून आले आहे की, ब्लड प्रेशर तपासताना हाताची चुकीची स्थिती त्याच्या रीडिंगच्या अचूकतेवर परिणाम करू शकते. हा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे, कारण रीडिंगमधील फरकांमुळे उच्च रक्तदाब निदानाची संख्या वाढू शकते आणि रुग्णांना अनावश्यक औषधे लिहून दिली जाऊ शकतात. नेमके अभ्यासात काय? ब्लड प्रेशर तपासताना नक्की हाताची स्थिती कशी असावी? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभ्यास काय सांगतो?

युनायटेड स्टेट्समधील जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनच्या संशोधकांनी तीन वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये ब्लड प्रेशर मोजण्याचे परीक्षण केले. एका परीक्षणात रुग्णाचे हात विनाआधार ठेवण्यात आले, एका परीक्षणात हात टेबलाचा आधार घेऊन ठेवण्यात आले, तर एका परीक्षणात हात मांडीवर ठेवण्यात आले. अभ्यासासाठी १८ ते ८० वयोगटातील एकूण १३३ लोकांची निवड करण्यात आली आणि प्रत्येक सहभागीचे ब्लड प्रेशर एकत्रच मोजण्यात आले. तपासणीपूर्वी सर्व सहभागींनी त्यांचे मूत्राशय रिकामे केले, काही वेळ चालले आणि त्यानंतर पाच मिनिटांची विश्रांती घेतल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटरचा वापर करण्यात आला. ‘जामा इंटर्नल मेडिसीन’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षांनुसार, एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या स्थितीचा त्याच्या ब्लड प्रेशरच्या मोजमापांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. या तपासणीत शरीराच्या बाजूला विनाआधार हाताची रीडिंग सर्वाधिक असल्याचे आढळून आले.

युनायटेड स्टेट्समधील जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनच्या संशोधकांनी तीन वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये ब्लड प्रेशर मोजण्याचे परीक्षण केले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : नेटफ्लिक्सच्या ‘या’ सीरिजवरून दोन देशांत वितुष्ट; काय आहे वादाचा केंद्रबिंदू?

हाताच्या स्थितीचा रीडिंगवर किती परिणाम होतो?

अभ्यासाचे वरिष्ठ लेखक डॉ. टॅमी ब्रॅडी म्हणाले की, जेव्हा अचूक ब्लड प्रेशर मोजण्याचा प्रश्न येतो, तेव्हा हाताची स्थिती फार महत्त्वाची असते. ब्लड प्रेशर तपासताना व्यक्तीचा हात नेहमी टेबलासारख्या मजबूत आधारावर असावा. “हाताला कोणताही आधार नसताना जर ब्लड प्रेशर तपासले तर सुमारे सात गुणांचा फरक दिसून येतो,” असे ते म्हणाले. अभ्यासात असे दिसून आले आहे की, मांडीवर एक हात ठेवल्याने सिस्टोलिकची ३.९ मिमी आणि डायस्टोलिकची ४ मिमी रीडिंग वाढते. सिस्टोलिक म्हणजे जेव्हा हृदय संपूर्ण शरीरात रक्त पाठवते तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या धमन्यांमधील दाबाचे प्रमाण आणि डायस्टोलिक म्हणजे हृदयाचे ठोक्या दरम्यानच्या धमन्यांमधील दाब. “माझी आशा आहे की हे संशोधन रुग्णांना स्वतःहून ब्लड प्रेशर कसे तपासायचे यासाठी मदत करेल,” असे डॉ. टॅमी ब्रॅडी म्हणाले.

इतर तज्ज्ञ काय सांगतात?

न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतील औषधांचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कॅरिन सिंगर यांनी ‘एनबीसी’ न्यूजला सांगितले, “दुर्दैवाने रुग्णाच्या हाताची स्थिती चुकीची असणे हा एक सामान्य अनुभव आहे. परंतु, याचा एकूणच रुग्णाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि रुग्णाला अगदी चुकीची औषधे दिली जाऊ शकतात.” यूसीएलए हेल्थ कार्डिओलॉजिस्ट डॉ. मेगन कामथ यांनीदेखील यावर सहमती दर्शवली, “आर्म पोझिशनचा ब्लड प्रेशर रीडिंगमध्ये खूप लक्षणीय फरक दिसून येऊ शकतो. हा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे”, असे त्या म्हणाल्या. अटलांटामधील पिडमॉन्ट हेल्थ केअरमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. डेव्ह माँटगोमेरी यांचा या अभ्यासावर विश्वास नाही. त्यांनी सीएनएनला सांगितले की, एखाद्या व्यक्तीच्या मानसिक-भावनिक आणि शारीरिक स्थितीमुळे ब्लड प्रेशरमध्ये मिनिटा मिनिटाला चढ-उतार होऊ शकतो. त्यामुळे ब्लड प्रेशर तपासताना घाई करू नये आणि उच्च रक्तदाबावर त्वरित उपचार केले पाहिजेत,” असेही ते म्हणाले.

अचूक रीडिंग मिळविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत?

यूके-आधारित नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस सल्ला देते की, योग्य स्थिती म्हणजे सरळ खुर्चीवर बसावे, दोन्ही पाय जमिनीवर सपाट ठेवावे आणि हाताला टेबलाचा आधार द्यावा. लोकांनी तपासणीपूर्वी पाच मिनिटे विश्रांती घ्यावी आणि एकदा तापसणी केल्यानंतर त्याची अचूकता कळण्यासाठी काही मिनिटांनंतर पुन्हा तपासावे. ३० मिनिटे तपासणीपूर्वी कॅफिन, व्यायाम आणि धूम्रपान टाळावे.

हेही वाचा : Workout Pill: आता जिमला जाण्याची चिंता मिटणार? व्यायामाची गोळी हा काय प्रकार आहे?

ब्लड प्रेशर कसे असावे?

सामान्य ब्लड प्रेशर ९०/६० मिमी आणि १२०/८० मिमी दरम्यान असते. ब्लड प्रेशरची नोंद १४०/९० अशी आली तर त्याला उच्च रक्तदाब म्हटले जाते. उच्च रक्तदाबाची सतत नोंद होत असेल तर रक्तवाहिन्यांवर त्याचा ताण येत राहतो. त्याचा परिणाम हृदय, मेंदू, मूत्रपिंड, डोळे अशा अवयवांवर होतो. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, जगभरात सुमारे एक अब्ज लोकांना रक्तदाबाची समस्या आहे. भारतात दर चार लोकांपैकी एकाला उच्च रक्तदाब असतो. अमेरिकेत जवळजवळ अर्ध्या अमेरिकन प्रौढांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. उच्च रक्तदाबाची अनेकदा कमी लक्षणे दिसतात. परंतु, त्यावर उपचार न केल्यास, स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि इतर गंभीर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी परिस्थितींचा धोका उद्भवू शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How should you place your arm during a blood pressure reading rac