बालविवाह हा एक गंभीर विषय आहे. भारतात हा विषय जितका गंभीर आहे; तसाच आफ्रिकेसारख्या अविकसित देशांमध्येही तो गंभीर आहे. याच पार्श्वभूमीवर सिएरा लिओन या एका छोट्या आफ्रिकन देशामध्ये मंगळवारी (२ जुलै) बालविवाह रोखण्यासाठी एक कायदा संमत करण्यात आला. या कायद्यानुसार वय वर्षे १८ आणि त्याखालील वयाच्या मुलांच्या लग्नावर बंदी असेल; तसेच पती आणि पत्नीपैकी जी व्यक्ती वयाने मोठी असेल, तिला शिक्षा केली जाईल. आफ्रिकेतील सिएरा लिओन या देशामध्ये सर्रास बालविवाह केले जात होते. त्याविरोधात अनेक मानवी हक्क कार्यकर्ते चळवळ करीत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. तज्ज्ञ असे म्हणतात की, या देशात लागू करण्यात आलेला हा कायदा आफ्रिकेतील इतर देशांच्या कायद्यापेक्षा कैक पटींनी कठोर आहे. या कायद्यान्वये केवळ पतीलाच नाही, तर बालविवाहासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींनाही शिक्षा केली जाणार आहे. त्यामध्ये त्यांचे पालक, लग्न लावून देणारी व्यक्ती आणि लग्नाला उपस्थित असलेल्या अतिथींचाही समावेश असेल. बालविवाहासाठी संबंधित प्रत्येकाला जबाबदार धरण्याचा या कायद्याचा उद्देश आहे. असे विवाह होऊच नयेत यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. युनिसेफने २०२० साली नोंदविलेल्या आकडेवारीनुसार, सिएरा लिओनमध्ये १८ वर्षांखालील सुमारे आठ लाख मुलींची लग्ने झाली होती. आश्चर्याची बाब म्हणजे ही संख्या देशातील एकूण मुलींपैकी एक-तृतीयांश इतकी आहे. त्यातील निम्म्या मुलींची लग्ने त्या १५ वर्षांच्या होण्यापूर्वीच झाली होती. याउलट, ‘ह्युमन राइट्स वॉच’ने दिलेल्या माहितीनुसार, सिएरा लिओनमधील सुमारे चार टक्के मुले १८ वर्षांची होईपर्यंत विवाहित झालेली असतात.
हेही वाचा : टिळा वा तत्सम धार्मिक प्रतीकांना मनाई; लष्कराने सैनिकांना का करून दिली गणवेश नियमांची आठवण?
या नवीन कायद्यानुसार ज्यांचे लग्न लहानपणी झाले होते, त्यांना आर्थिक भरपाईही मिळू शकते. हे झालेले लग्न रद्द करण्याची विनंती करून, त्यांचा विवाह संपुष्टात आणण्याचा मार्गदेखील प्रदान करण्यात आला आहे. थोडक्यात, याचा अर्थ लहानपणी लावून दिलेले लग्न ते कायदेशीररीत्या रद्द ठरवू शकतात. ज्यांना असे करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठीही कायदेशीर मार्ग मोकळा करण्यात आला आहे. ‘ह्युमन राइट्स वॉच’च्या संशोधक बेट्टी काबारी या आफ्रिकेतील महिलांचे हक्क आणि लैंगिक आरोग्याच्या स्थितीबाबत अभ्यास करतात. त्यांनी बालविवाह लावण्यासाठी मदत करणाऱ्यांना शिक्षा करण्याच्या कायद्यातील तरतुदींचे कौतुक केले आहे. त्या म्हणतात, “ही मुले स्वत: एकट्यानेच जाऊन लग्न करीत नाहीत, याची जाणीव ठेवून कायदा केला जाणे फार महत्त्वाचे होते.”
सिएरा लिओनमध्ये बालविवाहाचे प्रमाण काय आहे?
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार दरवर्षी १८ वर्षांखालील किमान १२ दशलक्ष मुलींची लग्ने होतात. जागतिक स्तरावर ६५० दशलक्षांहून अधिक मुली आणि महिलांची लग्ने त्या १८ वर्षांच्या होण्यापूर्वीच झालेली असतात. दक्षिण आशियामध्ये बालवधूंचे प्रमाण सर्वाधिक आहे. एकूण २९० दशलक्ष म्हणजेच एकूण जागतिक आकडेवारीच्या ४५ टक्के हे प्रमाण आहे. त्याखालोखाल सब-सहारा आफ्रिका प्रदेशामध्ये बालवधूंचे हे प्रमाण १२७ दशलक्ष म्हणजे एकूण जागतिक आकडेवारीच्या २० टक्के आहे. ‘गर्ल्स नॉट ब्राइड्स’ ही जागतिक संस्था जगभरातील बालविवाहांचा मागोवा घेते. त्यांच्या आकडेवारीनुसार, बालविवाहाचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या २० देशांपैकी १६ देश आफ्रिकेतीलच आहेत. ‘इक्वॅलिटी नाऊ’ने या वर्षी २० आफ्रिकन देशांवर लक्ष केंद्रित करणारा एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात असे आढळून आले आहे की, यापैकी फक्त काही देशांमध्येच बालविवाहावर पूर्णत: बंदी आहे. मात्र, यापैकी बरेचसे देश या बंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे करीत नाहीत.
लवकर लग्न लावून दिल्याने काय अडचणी येतात?
लवकर लग्न लावून देण्याचे सर्वाधिक दुष्परिणाम मुलींनाच भोगावे लागतात. सर्वांत महत्त्वाचा तोटा म्हणजे त्यांची शाळा सुटते. अगदी लहान वयात गर्भधारणा होण्यामुळे दीर्घकालीन जखमा आणि मानसिक आघातही होऊ शकतात. सिएरा लिओन हा देश बाळंतपणासाठी सर्वांत घातक ठिकाणांपैकी एक आहे. त्यामुळे किशोरवयीन मुलींसाठी या देशातील परिस्थिती आणखी धोकादायक ठरते. “त्या प्रौढ होण्यापूर्वीच त्यांच्यावर प्रौढ होण्याची जबरदस्ती केली जाते,” असे मत कडीजातु बॅरी (वय २६) हिने मांडले. ती स्ट्राँग गर्ल्स इव्होल्युशन या संघटनेमध्ये सिएरा लिओनियन महिलांसाठी काम करते. जेव्हा ती १० वर्षांची होती, तेव्हापासूनच तिच्या कुटुंबाने तिच्यामागे लग्नासाठी तगादा लावला होता. लग्नासाठी नकार दिल्याने ती १५ वर्षांची असतानाच तिच्या वडिलांनी तिची जबाबदारी झटकली होती. ती म्हणाली की, शाळा सोडावी लागेल याची काळजी तिला वाटत होती. या सगळ्यामुळेच आमच्याकडच्या महिला कमी शिकलेल्या आहेत, असे तिने म्हटले. सिएरा लिओनमध्ये महिलांचे जननेंद्रिय कापण्याचीही एक सांस्कृतिक प्रथा आहे; जी फारच सामान्यपणे पाळली जाते. जागतिक आरोग्य संघटना ही प्रथा मानवी हक्कांचे उल्लंघन मानते. सिएरा लिओनमधील १५ ते १९ वयोगटातील अंदाजे ६१ टक्के मुलींना या प्रथेनुसार आपले जननेंद्रिय कापावे लागले आहे. या प्रथेमुळे बाळंतपणाच्या वेळी बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात. देशातील अनेक तरुणींना प्रभावित करणारी ही एक गंभीर समस्या आहे.
सिएरा लिओनमधील बालविवाहावरील बंदी कशी कार्यरत असेल?
आता नवा कायदा मंगळवारी (२ जुलै) लागू झाला आहे. या कायद्यानुसार बालविवाह लावून देणाऱ्यांना १५ वर्षांचा तुरुंगवास किंवा पाच हजार डॉलर्सचा दंड होऊ शकतो. सकल दरडोई उत्पन्न जेमतेम ४३३ डॉलर्स असलेल्या या देशामध्ये हा दंड फारच कठोर आहे. हा कायदा फक्त लग्नापुरता मर्यादित नाही. जे प्रौढ लोक लहानग्यांबरोबर राहून लैंगिक संबंध प्रस्थापित करतात, त्यांनाही या कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते. अशा बालविवाहाला पालक संमती देऊ शकत नाहीत. असे लग्न लावून देणाऱ्यांनाही शिक्षा होऊ शकते. अशा विवाहाला पाहुणे हजर राहू शकत नाहीत. जो कुणी अशा विवाहाला उपस्थित राहील अथवा मदत करील, तो प्रत्येक जण १० वर्षे कारावास अथवा अडीच हजार डॉलर्सच्या शिक्षेस पात्र राहील. सिएरा लिओनमधील मुलींना जननेंद्रिय कापण्याच्या अमानुष प्रथेपासून मुक्ती मिळावी आणि त्यांना शाळा शिकता यावी यासाठी हा कायदा महत्त्वाचा ठरतो.