हाँगकाँगमधील एक ८४ वर्षीय वृद्ध रुग्णालयात गेला, तेव्हा त्याची त्वचा आणि त्याच्या डोळ्यांचा रंग चांदी-राखाडी झाल्याचे पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले. सखोल तपासणीत उतीमध्ये चांदीचे कण जमा होत असल्याचे आढळून आले. २००७ मध्येही अशीच एक विचित्र घटना घडली. २००७ च्या प्रेस रिपोर्ट्समध्ये पॉल कॅरासन नावाच्या व्यक्तीचे वर्णन ‘ब्लू मॅन’ म्हणून केले गेले. त्याने घरगुती सिल्व्हर क्लोराईड द्रावणाचे सेवन करून सायनस आणि त्वचेच्या समस्या बरे करण्याचा प्रयत्न केला होता. यांसारखी अनेक उदाहरणे आहेत. ही धक्कादायक प्रकरणे एक गूढ सत्य समोर आणतात, की आपल्या शरीरात आपण ज्याचे सेवन करतो, त्याच गोष्टी त्वचेवर प्रदर्शित होऊ शकतात. परंतु, या सेवनाने त्वचेचा रंग बदलणे अनेकांसाठी आश्चर्यकारक बाब आहे. त्यामुळे अन्नपदार्थ आणि औषधांच्या सेवनाने त्वचेचा रंग कसा बदलतो? नेमकी कारणे काय? त्याविषयी समजून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्वचेचा रंग बदलण्यामागील कारणे काय?

वरील प्रकरणे आर्गीरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थितीची उदाहरणे आहेत; ज्यामध्ये शरीरात चांदीचे कण जमा होतात. चांदी एकेकाळी त्याच्या प्रतिजैविक गुणधर्मांमुळे वैद्यकीय उपचारांचा मुख्य आधार होती. परंतु, आधुनिक पुराव्यांवरून असे दिसून येते की, जास्त प्रमाणात त्याचे सेवन करणे किंवा शोषून घेणे एखाद्याच्या त्वचेला कोमेजून जाईल अशा प्रकारे बदलू शकते. आर्गीरियामध्ये, चांदीचे आयन रक्तप्रवाहात फिरतात आणि त्वचेच्या पृष्ठभागाच्या खाली एक थर जमा होतो, जिथे शरीर त्यांना सहज साफ करू शकत नाही. हा असा थर आहे; ज्यामध्ये टॅटूमध्ये वापरण्यात येणारी रंगद्रव्येही राहतात. सूर्यप्रकाश फोटोरिडक्शन नावाची प्रक्रिया सुरू करून प्रभाव संयुगे तयार करतो; ज्यामुळे चांदीच्या आयनांचे रूपांतर धातूच्या चांदीमध्ये होते. परिणामी, गोऱ्या त्वचेवर निळसर किंवा राखाडी रंग दिसू लागतो आणि तपकिरी व काळ्या त्वचेमध्ये गडद राखाडी किंवा थोडा निळा रंग दिसू शकतो.

अशाच प्रकारे अगदी दुर्मिळ प्रकरणात क्रायसियासिस नावाच्या स्थितीत सोन्याचे कण त्वचेत शिरतात. ऐतिहासिकदृष्ट्या, प्रक्षोभक विकारांसाठी अधूनमधून सोन्यावर आधारित थेरपी लिहून दिली जात होती काही प्रकरणांमध्ये, ज्या रुग्णांनी हे उपचार घेतले होते, अशा काही प्रकरणांमध्ये त्यांना त्वचेवर विशिष्ट राखाडी किंवा राखाडी जांभळा रंग विकसित दिसू लागला होता. आर्गरियाप्रमाणेच या स्थितीतदेखील त्वचा पूर्वीसारखी होत नाही.

खाद्यपदार्थांमधील अनेक रंग आणि त्वचेच्या बदलणाऱ्या रंगाचा संबंध

केशरी, पिवळे व लाल रंगद्रव्य त्वचेवर सर्वांत जास्त प्रभाव टाकते आणि केशरी रंग यात सर्वांत जास्त दिसून येतो. हे रंग बहुतेक वेळा गाजर, रताळे व भोपळ्यांशी संबंधित असते; ज्यामध्ये कॅरोटीनोइड्सपासून असते. हा वनस्पतींमध्ये नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या रंगद्रव्यांचा एक वर्ग आहे. कॅरोटीनॉइड रंगद्रव्ये चरबीमध्ये विद्रव्य असतात. सेवन केल्यावर ते लहान आतड्यात शोषले जातात आणि त्वचेच्या खालील थरासह प्रामुख्याने चरबीयुक्त उतकांमध्ये संग्रहित करण्यासाठी रक्तप्रवाहात लिपोप्रोटीनद्वारे वाहून नेले जातात. त्यामुळे त्वचेवर वैशिष्ट्यपूर्ण सोनेरी रंग दिसू लागतो. विशेष म्हणजे जेव्हा कॅरोटीनॉइडयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात.

केशरी, पिवळे व लाल रंगद्रव्य त्वचेवर सर्वांत जास्त प्रभाव टाकते आणि केशरी रंग यात सर्वांत जास्त दिसून येतो. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

निसर्गात आढळणाऱ्या अनेक कॅरोटीनॉइड्सपैकी, बीटा कॅरोटीन अधिक प्रभावी असते. त्यामुळे त्वचेवर गडद केशरी रंग दिसू लागतो. औषधांमध्येही त्याचा वापर केला जातो. माणूस कॅरोटीनॉइड्सचे चयापचय निवडक पद्धतीने करतात. आतडे आणि यकृतातील एन्झाइम्स बीटा-कॅरोटीनला व्हिटॅमिन एमध्ये बदलतात, जे दृष्टी, निरोगी रोगप्रतिकार शक्ती आणि निरोगी त्वचेसाठी महत्त्वपूर्ण आहे. परंतु, सर्व अंतर्भूत बीटा-कॅरोटीन हे परिवर्तन करत नाही. त्याचे जास्तीचे प्रमाण त्यांच्या रंगद्रव्याच्या स्वरूपात शरीरात राहते आणि त्वचेमध्ये जमा होते, विशेषत: हाताचे तळवे आणि पायांच्या तळव्यांसारख्या भागात. या भागातील त्वचेच्या जाड थरावर लगेच या रंगद्रव्याची उपस्थिती दिसून येते.

ल्युटीन व झेक्सॅन्थिन हिरव्या पालेभाज्यांमध्ये आढळतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

त्वचा केशरी होण्याचे कारण कॅरोटीनॉइड्सच्या रासायनिक संरचनेत आहे. बीटा-कॅरोटीनचा निळ्या स्पेक्ट्रममधील प्रकाश शोषून घेतो. नारिंगी प्रकाश आपल्या डोळ्यांकडे परत परावर्तित करतो. इतर कॅरोटीनॉइड्स, जसे की ल्युटीन व झेक्सॅन्थिन हिरव्या पालेभाज्यांमध्ये आढळतात, जे पिवळ्या रंगाकडे झुकतात, ते कमी स्पष्ट असतात. कारण- ते एक तर आहारात कमी प्रमाणात असतात किंवा त्वचेत ठळकपणे साठवले जात नाहीत. संशोधनात असे दिसून आले आहे की, कॅरोटीनॉइड-समृद्ध आहार निरोगी सोनेरी चमक वाढवू शकतो. पण, त्याचे अतिसेवन चुकीचे ठरू शकते. अॅन्थोसायनिन्स, बेटालेन्स व क्लोरोफिल यांसारख्या नैसर्गिकरीत्या आहारातील रंगद्रव्ये अनेक आरोग्य फायदे देतात; परंतु त्वचेवर त्याचा रंग दिसून येतो.

बेरी, लाल कोबी व जांभळ्या गाजरांमध्ये आढळणारे अँथोसायनिन्स त्यांच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखले जाते, ते पाण्यात विरघळणारे असतात. याचा अर्थ ते लवकर चयापचय करतात आणि त्यामुळे त्वचेवर छाप सोडण्याची शक्यता नसते. त्याचप्रमाणे बेटालेन्स हे लाल आणि पिवळ्या रंगासाठी जबाबदार रंगद्रव्ये, डिटॉक्सिफायिंग आणि अँटी-इम्फ्लेमेटरी फायदे देतात; परंतु त्वचेच्या टोनवर दृश्यमान परिणाम न करता शरीराद्वारे उत्सर्जित केले जातात. परंतु, जास्त प्रमाणात सेवन केल्याने लघुशंका आणि विष्ठेचा रंग बदलू शकतो. या सर्व उदहरणांवरून हे स्पष्ट होते की, अन्नपदार्थ असो वा औषधे, त्यात संतुलन आवश्यक आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How some foods and medicines can alter your skin colour rac