अंटार्क्टिकातील अफाट बर्फाची चादर वेगाने वितळत आहे. विविध उपग्रह दरवर्षी वितळणार्या बर्फाच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती देतात. ही जगासाठी सर्वात मोठी समस्या आहे. जवळजवळ एका दशकापासून हवामानशास्त्रज्ञ पश्चिम अंटार्क्टिकातील अफाट बर्फाची चादर कधीपर्यंत पूर्णपणे वितळू शकते, याचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच यामुळे निर्माण होणार्या संभाव्य परिणामांचाही शोध घेतला जात आहे. संशोधन सुरू असताना शास्त्रज्ञांना नक्की काय आढळून आले आहे? याचे काय परिणाम होऊ शकतात? याविषयी जाणून घेऊ.
जगाचा ‘आईस बॉक्स’ मानल्या जाणार्या अंटार्क्टिकातील बर्फाची चादर खूप जाड आहे. या चादरी खूप वेगाने वितळत आहेत. बर्फ वेगाने वितळत असल्याने बर्फाच्या चादरीच्या कडा तुटून वेगळ्या होतात. या कडांचा आकार अगदी पर्वतासारखा असतो आणि या कडा अस्थिर असतात. काही दिवसांनी या कडाही तुटायला लागतात आणि हा सर्व बर्फ महासागरात जातो; ज्यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होते. दिवसेंदिवस वाढत जाणार्या घातक वायूंच्या उत्सर्जनामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अंटार्क्टिकातील संपूर्ण बर्फ वितळण्यापूर्वी संपूर्ण जगभरातील समुद्र पातळी एक फुटापेक्षाही जास्त वाढेल, अशी शक्यता आहे. या सर्व अजून शक्यताच असल्या तरी शास्त्रज्ञांनी हे नमूद केले आहे की, याची कमी संभाव्यता असली तरी याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसून येईल.
हेही वाचा : एकेकाळी चंद्रावर होता धगधगता लाव्हारस? ‘चांद्रयान-३’ने उलगडली चंद्राची रहस्ये
संभाव्य परिस्थिती
संशोधनाचे नेतृत्व करणारे डार्टमाउथ कॉलेजमधील पृथ्वी विज्ञानाचे प्राध्यापक मॅथ्यू मॉर्लिघम म्हणाले, “आपण सुरक्षित आहोत असे म्हणता येणार नाही. अंटार्क्टिक बर्फाची चादर नाहीशी होणार आहे हे नक्की आहे. परंतु, प्रश्न आहे किती वेगाने होणार आहे तो.” पश्चिम अंटार्क्टिकाचा बर्फ विघटित होण्याचा पर्यावरणावर आणि लोकांवर होणारा परिणाम खूप महत्त्वाचा आहे. हळूवार होणार्या विघटनामुळे समुद्रकिनारी वसलेल्या लोकसंख्येला संरक्षण स्थापित करण्यासाठी अधिक वेळ मिळतो. तरीही बर्फ कसा तुटतो याबद्दल बरीच अनिश्चितता आहे, असे मॅथ्यू मॉर्लिघम म्हणाले. त्यामुळे समुद्राची पातळी कधीपर्यंत वाढेल, लोकांना संरक्षणाच्या उपाययोजना करण्यास किती वेळ मिळेल हे सांगणे कठीण आहे. “या अनिश्चितता कमी करण्यासाठी आम्हाला अजूनही बरेच काही करायचे आहे,” असे ते म्हणाले. मॅथ्यू मॉर्लिघम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेली ही माहिती बुधवारी ‘सायन्स ॲडव्हान्सेस जर्नल’मध्ये प्रकाशित झाली.
पश्चिम अंटार्क्टिकातील बर्फाची चादर
पश्चिम अंटार्क्टिक बर्फाची चादर ही निसर्गातील अनेक महाकाय प्रणालींपैकी एक आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे या प्रणालीला धोका निर्माण झाला आहे. तापमानवाढीने विशिष्ट पातळी ओलांडल्यास या प्रणालीचा समतोल ढासळला जाण्याची शक्यता समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ काम करत आहेत. अंटार्क्टिकातील बर्फाची चादर पूर्णपणे वितळल्यास ही दीर्घकाळासाठी पृथ्वीसाठी मोठी समस्या ठरेल. मॅथ्यू मॉर्लिघम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या अलीकडील अभ्यासात बर्फाचा कडा कसा वेगळा होतो, याचे वर्णन केले आहे. ते ही परिस्थिती समजून घेण्यासाठी ‘थ्वेट्स ग्लेशियर’चा अभ्यास करत आहेत. या हिमनदीचा आकार फ्लोरिडा शहराइतका आहे. ही अंटार्क्टिकामधील सर्वात वेगाने वितळणारी आणि अस्थिर हिमनदी आहे. संशोधकांनी थ्वेट्सचा अभ्यास करताना दोन सर्वांत वाईट परिस्थितींविषयी सांगितले.
पहिले त्यांनी बर्फाचा शेल्फ म्हणजेच हिमनदीचा तरंगता कडा ‘थ्वेट्स ग्लेशियर’ पूर्णपणे वितळल्यास काय होईल याची चाचणी केली. त्यांनी २०६५ मध्ये हा कडा पूर्णपणे वितळल्यास काय होईल याचा अभ्यास केला. प्रत्यक्षात हा कडा हळूहळू वितळेल, असे यात समोर आले. त्यांना असे आढळले की, कडा पूर्णपणे वितळल्यास हिमनदीचा बर्फ अधिक वेगाने समुद्राकडे वाहू लागेल.
निर्णायक निष्कर्षांची गरज
अंटार्क्टिकाचा अभ्यास करणाऱ्या, परंतु नवीन अभ्यासात सहभागी नसलेल्या अनेक संशोधकांनी सांगितले की, या संशोधनाचे निष्कर्ष उपयुक्त आहेत. परंतु, यात आणखी सखोल अभ्यासाची गरज आहे. शास्त्रज्ञांनी वास्तविक जगाच्या निरीक्षणांमध्ये त्यांचे परिणाम शोधत राहणे आवश्यक आहे, असे मॅसॅच्युसेट्स एमहर्स्ट विद्यापीठातील पृथ्वी, भौगोलिक आणि हवामान विज्ञानाचे प्राध्यापक रॉब डीकॉन्टो म्हणाले. पश्चिम अंटार्क्टिकाचा बर्फ खंडाच्या आतील भागातून महासागरात वाहतो तेव्हा तो किती मजबूत किंवा कमकुवत असतो? वाटेत त्याचे किती नुकसान होते? त्यात द्रव स्वरुपात किती पाणी असते? तो तुटतो त्या मार्गावर काय परिणाम होतो? या सर्व गोष्टी आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आवश्यक आहे,” असे डीकॉन्टो म्हणाले. पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीतील भूविज्ञानाचे प्राध्यापक रिचर्ड ॲली म्हणाले की, बर्फ तुटल्यावर त्यांच्यात काय बदल होतात, याचे शास्त्रज्ञांना पुरेसे निरीक्षण नाही, ही समस्या आहे.
माणूस जीवाश्म इंधन जाळत असल्याने पृथ्वी तापत आहे. पश्चिम अंटार्क्टिकाचा बर्फ अनेक विनाशकारी परिणाम घडवून आणू शकतो. “आम्हाला आता मिळत असलेला डेटा पुरेसा नाही,” असे ॲली म्हणाले. जगातील किती प्रमुख शहरे किनारपट्टीवर वसतात आणि त्यांना समुद्रांपासून संरक्षण प्रदान करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, हे माहिती करण्यासाठी शास्त्रज्ञांना अचूक अंदाज बांधणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो, असे ॲली म्हणाले.