भारतीय हवाई दलाची लढाऊ शक्ती कायम राखण्यात पुढील काळात स्वदेशी बनावटीच्या तेजसची महत्त्वाची भूमिका असणार आहे. निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या जुन्या विमानांमुळे सध्यापेक्षा तुकड्या (स्क्वॉड्रन) कमी होऊ नयेत म्हणून तेजसला पाठबळ देण्याच्या दिशेने आश्वासक पावले पडत आहेत. लवकरच प्रशिक्षणासाठी आठ विमाने मिळणार आहेत. प्रारंभी नोंदविलेल्या तेजसची शक्य तितक्या लवकर पूर्तता करून हवाई दल नव्याने अतिरिक्त मागणी नोंदविण्याच्या तयारीत आहे.

समतोल कसा साधला जाणार?

सभोवतालचे धोके लक्षात घेऊन भारतीय हवाई दलास लढाऊ विमानांच्या ४२ तुकड्यांची आवश्यकता आहे. या मंजूर क्षमतेच्या तुलनेत सध्या केवळ ३१ तुकड्या अस्तित्वात आहेत. आगामी काळात मिग २९, जॅग्वार व मिराज – २००० ही विमाने निवृत्तीच्या वाटेवर येतील. त्यामुळे सध्याची क्षमता कायम ठेवणे आव्हानात्मक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर निरोप घेणाऱ्या बहुतांश विमानांची जागा तेजसला देऊन समतोल राखण्यात येईल. त्या अनुषंगाने एचएएलकडे यापूर्वीच ८३ विमानांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामध्ये पुन्हा भर घालून लढाऊ शक्ती कायम राखण्याचे नियोजन आहे. निर्धारित वेळेत तेजसचे वितरण झाल्यास २०३० पर्यंत हवाई दलात लढाऊ विमानांच्या ३२ किंवा ३३ तुकड्या असतील. तर २०४० पर्यंत ही संख्या ३४ किंवा ३५ तुकड्यांपर्यंत नेता येईल. तेजस प्रकल्पाला बळ मिळण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे.

Support for science and development through two new policies
दोन नव्या धोरणांतून विज्ञानाची साथ आणि विकासाची वाट…
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Russian President Vladimir Putin, nuclear weapons policy,
विश्लेषण : रशियाचे अण्वस्त्र धोरणच बदलण्याचा पुतिन यांचा निर्णय कशासाठी? या बदलांमुळे अणुयुद्धाची शक्यता बळावणार?
India Nuclear powered Ballistic Missile Submarine SSBN INS Arighat
‘आयएनएस अरिघात’चा चीनला धसका का?
Narendra modi fintech india marathi news
भारताच्या ‘फिनटेक’ वैविध्याचा जगाला मोह – पंतप्रधान
india s defense export in marathi
विश्लेषण: संरक्षण सामग्री निर्यातीत लक्षणीय वाढ? निर्यात कशी वाढतेय?
loksatta kutuhal human friendly artificial intelligence
कुतूहल : बुद्धिमत्तेची कुरघोडी
article about badlapur school sexual assault case sexual harassment against women and girl
तिला कणखर करणे महत्त्वाचे!

हेही वाचा – विश्लेषण : आफ्रिकी महासंघाच्या जी-२० समूहातील समावेशाचे महत्त्व काय?

तेजसचे वेळापत्रक कसे?

विमान निर्मितीसाठी व्यवस्था उभारणीइतकीच सहायकारी उपकरणांची उपलब्धता महत्त्वाची असल्याचा धडा या प्रकल्पातून मिळाला. हवाई दलास प्रशिक्षणासाठी तातडीने तेजसची आवश्यकता आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस प्रशिक्षणासाठी आठ विमानांची पूर्तता होण्याचा अंदाज आहे. दलाच्या ताफ्यात आधीच्या मागणीतून ३२ एलसीए-एमके विमाने समाविष्ट झाली आहेत. ८३ एलसीए-एमके १ एच्या पूर्ततेस फेब्रुवारी २०२४ पासून सुरुवात होणे अपेक्षित आहे. प्रशिक्षणासाठी विमानांचे वितरण पूर्वनिर्धारित वेळेत करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) म्हणणे आहे.

अतिरिक्त मागणी, उत्पादनाचे समीकरण काय?

हवाई दल तेजसच्या आणखी चार तुकड्या अथवा ९० एलसीए-एमके १ ए लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या विचारात आहे. २०२७-२८ पासून २०३१-३२ पर्यंत ही विमाने ताफ्यात समाविष्ट होऊ शकतील. तोवर तेजसची अधिक सक्षम एलसीए-एमके २ आवृत्ती दाखल होणे अपेक्षित आहे. या आधारावर एचएएल दरवर्षी २४ विमानांचे उत्पादन करेल आणि एलसीए-एमके २ च्या अतिरिक्त मागणीच्या पूर्ततेसाठी उत्पादन साखळी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राखली जाईल. ८३ एलसीए – एमके १ ए साठी एचएलशी ४७ हजार कोटींचा करार झाला आहे. त्यानुसार या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत तीन एलसीए-एमके १ ए आणि त्यापुढील पाच वर्षांत दरवर्षी १६ तेजस हवाई दलास मिळणार आहेत.

तेजस एमके-२ वेगळे कसे?

तेजस एमके- २ या प्रकल्पाला गेल्या वर्षी केंद्रीय सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीकडून नऊ हजार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. अमेरिकेन इंजिनसह तीन वर्षांत त्याचे पहिले उड्डाण अपेक्षित आहे. एमके दोनमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल. एमके -१ आणि एमके-१ ए (अल्फा) च्या तुलनेत एमके- २ हे नवीन रचना, अधिक मारक क्षमतेचे विमान आहे. आधुनिक रडार यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक युद्ध तंत्राची उपकरणे सामावणाऱ्या तेजसची साडेसहा टन शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. वेग, अति उंचावरील उड्डाणात वैमानिकाला प्राणवायू देणाऱ्या (ओबीओजीएस) व्यवस्थेची क्षमताही अधिक आहे. खास प्रकारचे बॉम्ब ते वाहून नेऊ शकेल. दृश्य टप्प्याच्या पलीकडे मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांमुळे तेजस एमके-२ भविष्यातील युद्धात सरस ठरू शकेल. तेजसची ही नवी आवृत्ती पाचव्या पिढीतील प्रगत मध्यम लढाऊ विमान (एएमसीए) निर्मितीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात उपयुक्त ठरणार आहे. परंतु, एएमसीए प्रकल्प केंद्रीय सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीसमोर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

हेही वाचा – देशात कापसाच्या उत्‍पादनात घट का होतेय?

स्वदेशी उपकरणांवर भर कसा?

तेजसच्या विकास प्रक्रियेत संगणकीय आज्ञावली पुरविताना वैमानिकी विकास प्रतिष्ठान (एडीए) हवाई दल, एचएएलला मदत करीत आहे. उपकरणांच्या कार्यक्षमतेची पडताळणी होत आहे. सर्व उपकरणे आणि आज्ञावली समाविष्ट असणाऱ्या दोन तेजस विमानांद्वारे हवाई दल आणि एचएएल या चाचण्या करीत आहे. तेजसमध्ये हवाई दलास विकसित होणारे स्वदेशी उत्तम रडार आणि इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रात उपयुक्त ठरणारी स्वदेशी प्रणाली हवी आहे. करार जसा पुढे जाईल, त्याप्रमाणे ही उपकरणे आणि प्रणाली विमानात समाविष्ट होतील. याकरिता संरक्षण संशोधन व विकास प्रतिष्ठानला (डीआरडीओ) आणखी एक कंत्राट देण्यात आले आहे. तेजसच्या प्रत्येक टप्प्यावर स्वदेशी घटक बनविण्याची योजना आहे. तेजसमध्ये सध्या वापरली जाणारी सुमारे ७५ टक्के सामग्री स्वदेशी असून हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत नेण्यात येणार आहे. इंजिनसाठी अमेरिकास्थित जीई एव्हिएशनशी करार करण्यात झाला असून तंत्रज्ञान हस्तांतरणान्वये इंजिन स्थानिक पातळीवर तयार केली जातील.

जुन्या विमानांना निरोप कधी?

तेजस विमाने जसे दाखल होऊ लागतील, त्याप्रमाणे ताफ्याची मुख्य भिस्त सांभाळणाऱ्या जुन्या लढाऊ विमानांच्या तुकड्या हवाई दलातून टप्प्याटप्प्याने बाहेर पडू लागतील. मिग – २१ च्या तीन तुकड्यांची जागा २०२५ पर्यंत तेजस एमके १ ए विमाने घेतील. या शिवाय जॅग्वार, मिराज – २००० आणि मिग – २९ दशकाच्या अखेरपर्यंत निरोप घेण्यास सुरुवात होईल. यात पहिला क्रमांक १९८० च्या दशकात समाविष्ट झालेल्या मिग – २९ चा असणार आहे. ही विमाने २०२७-२८ पर्यंत टप्प्याटप्प्याने बाहेर पडतील. २०४० च्या प्रारंभी काही जुनी सुखोई-३० टप्प्याटप्प्याने बाहेर पडण्यास सुरुवात होईल. मात्र, हवाई दलाची ताकद असणाऱ्या सुखोई-३० च्या तुकड्या पुढील २५ वर्षे म्हणजे २०५०-५५ पर्यंत ही जबाबदारी पेलणार आहेत.