२६ डिसेंबर २००४ च्या हिंद महासागरातील त्सुनामीने लाखो लोकांचा बळी घेतला होता. अनेक लोक आजही त्या धक्क्यातून सावरू शकलेले नाहीत. आज त्या घटनेला २० वर्षे उलटली आहेत. या त्सुनामीची भीषणता इतकी होती की, त्यामुळे १५ देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर विनाश झाला होता. ही २१ व्या शतकातील सर्वात प्राणघातक नैसर्गिक आपत्ती होती. त्सुनामीमुळे मोठ्या प्रमाणावर विनाश होण्याचे एक कारण म्हणजे, पूर्व इशारा प्रणालीची क्षमता मर्यादित होती. उदाहरणार्थ, ‘युरोन्यूज’च्या अहवालानुसार, सर्वात जास्त प्रभावित देशांपैकी इंडोनेशियामध्ये त्सुनामीचा धोका कमी मानला जात होता. प्रदेशातून समुद्राच्या पृष्ठभागाच्या पातळीबद्दल कोणताही डेटा नव्हता. परिणामी तज्ज्ञ हा धोका ओळखू शकले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परंतु, गेल्या २० वर्षांत परिस्थिती हाताळण्यासाठी बऱ्याच उपाययोजना आणि तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. आता या प्रदेशात पूर्वइशारा प्रणाली विकसित करण्यात आली आहे आणि त्यांच्या क्षमतांमध्ये कमालीची सुधारणा करण्यात आली आहे. जागतिक हवामान संघटना (डब्ल्यूएमओ) च्या अहवालानुसार, या प्रणाली आश्चर्यकारकपणे ३० टक्क्यांपर्यंत नुकसान कमी करू शकतात. २००४ च्या विध्वंसक त्सुनामीनंतर पूर्वइशारा प्रणाली कशी बदलली? त्याविषयी जाणून घेऊ.

आजपासून २० वर्षांपूर्वी इंडोनेशियात ९.१ तीव्रतेचा भूकंप आला होता; ज्यानंतर भीषण त्सुनामी आली होती. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : पाकिस्तानमध्ये ब्रँडेड कार नव्हे तर पिकअप ट्रक चर्चेत; राजकारण्यांपासून उद्योगपतींपर्यंत वाढली मागणी, कारण काय?

२००४ मध्ये नक्की काय घडले होते?

आजपासून २० वर्षांपूर्वी इंडोनेशियात ९.१ तीव्रतेचा भूकंप आला होता; ज्यानंतर भीषण त्सुनामी आली होती. या त्सुनामीने भारतासह १४ देशांमध्ये हाहाकार माजवला होता. मात्र, सर्वात जास्त नुकसान इंडोनेशिया, दक्षिण भारत, श्रीलंका, थायलंड आणि मालदीवचे झाले होते. त्यावेळी पूर्वइशारा प्रणालीचे तंत्रज्ञान प्रगत नव्हते. त्याचाच परिणाम होता की, अशा प्रकारच्या त्सुनामीचा अंदाज कुणालाच नव्हता. नवीन वर्षाची सुरुवात होणार असल्यामुळे मोठ्या संख्येने लोक समुद्रकिनारी असणाऱ्या पर्यटनस्थळावर फिरण्यासाठी गेले होते, त्यामुळे मृतांचा आकडा खूप मोठा होता. त्या विध्वंसात तब्बल दोन लाखांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले होते. इतिहासातील या सर्वांत प्राणघातक आपत्तीनंतर पूर्व इशारा प्रणाली हा महत्त्वाचा मुद्दा झाला आणि ही प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू झाले.

पूर्वइशारा प्रणाली कसे कार्य करते?

“जागतिक नेटवर्कमध्ये आता जवळपास १५० स्टेशन्स आहेत. Dart buoys (Deep-ocean Assessment and Reporting of Tsunamis) चे खोल समुद्रातील मूल्यांकन आणि अहवाल त्सुनामी निर्माण झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी समुद्राच्या तळावरील दाबातील बदलांचा मागोवा घेतात,” असे ‘युरोन्यूज’च्या वृत्तात दिले आहे. अहवालात असे नमूद केले आहे की, यापैकी ७५ buoys प्रत्येक महासागरात आहेत. समुद्र पातळी निरीक्षण केंद्रांची संख्यादेखील वाढली आहे. ही संख्या २००४ मधील एकावरून आता १४,००० वर गेली आहे.

२००४ मध्ये आलेली त्सुनामी ही २१ व्या शतकातील सर्वात प्राणघातक नैसर्गिक आपत्ती होती. (छायाचित्र-रॉयटर्स)

विकसित तंत्रज्ञानामुळे त्सुनामीचा जलद इशारा

२००४ च्या त्सुनामीनंतर अनेक तांत्रिक सुधारणाही झाल्या आहेत. उदाहरणार्थ, पूर्व इशारा प्रणालींमध्ये आता उत्तम अल्गोरिदम आहेत; ज्यामुळे माहिती अधिक जलद प्रसारित करण्यात मदत झाली आहे. सुपर कॉम्प्युटरमुळे हे तंत्र वेगवान झाले आहे. अमेरिकेतील होनोलुलु येथील आंतरराष्ट्रीय त्सुनामी माहिती केंद्राच्या संचालिका लॉरा काँग यांनी युरोन्यूजला सांगितले की, “२००३ मध्ये भूकंप झाला होता आणि त्सुनामी आली हे कळण्यासाठी आम्हाला कदाचित ५० मिनिटे लागली होती. मात्र, आता तंत्रज्ञान विकसित झाले आहे. आता आम्हाला त्सुनामी आली हे कळण्यासाठी केवळ पाच ते सात मिनिटे लागतात, त्यामुळे लाट येण्यापूर्वी जलद इशारा देणे आता शक्य झाले आहे.”

हेही वाचा : ब्रिटनच्या महिला मंत्र्यांचे बांगलादेशमधील भ्रष्टाचार प्रकरणात नाव; या प्रकरणाचा शेख हसीना यांच्याशी काय संबंध?

… म्हणून विकसनशील राष्ट्रांत १५ पट अधिक मृत्यू

जरी इंडोनेशियासारख्या राष्ट्रांनी नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वइशारा प्रणाली अधिक आणि चांगल्या प्रमाणात तैनात केल्या असल्या तरीही जगातील अर्ध्याहून अधिक देश असे आहेत की, ज्यांच्याकडे पाऊस किंवा चक्रीवादळ यांसारख्या नियमित घटनांसाठीदेखील प्रभावी पूर्वइशारा प्रणाली नाही. हे बहुतेक विकसनशील देश आहेत, जेथे नैसर्गिक आपत्तींच्या प्रभावाचे विषम प्रमाण जास्त आहे. “विकसनशील राष्ट्रांमध्ये हवामानाशी संबंधित आपत्तींमुळे जगाच्या इतर भागांच्या तुलनेत १५ पट अधिक मृत्यू होतात,” असे ‘यूएन’ने स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How the 2004 tsunami changed early warning systems rac