सध्या बॉलिवूडमध्ये किंवा एकंदरच भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपटाचं यश हे त्याच्या कमाईवर ठरतं. आता १००, २००, ३०० नव्हे तर ही स्पर्धा हजार कोटीच्या घरात जाऊन पोहोचली आहे. एकेकाळी खानमंडळींपैकी सलमान खानने १०० कोटी, २०० कोटी ही प्रथा सुरू केली. आता हळूहळू प्रत्येक चित्रपट आणि त्याचं यश हे याच मापकात मोजलं जात आहे. सध्या एकूणच हिंदी चित्रपटांची अवस्था बिकट आहे. २ चित्रपट सोडले तर इतर कोणत्याही हिंदी चित्रपटाला १०० कोटीच्यावर कमाई करता आलेली नाही. बड्याबड्या स्टार्सचे चित्रपट आपटले असून छोटे चित्रपट रग्गड कमाई करत आहेत. यामागे बॉयकॉट ट्रेंड हा काही प्रमाणात कारणीभूत असला तरी एकूणच चित्रपटांचा घसरलेला दर्जा हेदेखील त्यामागचं महत्वाचं कारण आहे. आकड्यांच्या या स्पर्धेत उत्तम कलाकृती निर्माण करण्याकडे सध्या कुणाचंच फारसं लक्ष दिसत नाही. चित्रपटाचं बजेट किती, किती स्क्रीन्स मिळाल्या, पहिल्या दिवशी किती कमाई झाली, याकडेच सध्या सगळ्यांचं लक्ष आहे.

हा गणिताचा खेळ नेमका कसा आहे? यामध्ये कोणाला सर्वात जास्त नफा होतो? हा चित्रपट व्यवसाय नेमका चालतो तरी कसा? ही स्पर्धा नेमकी सुरू कुठून झाली? या स्पर्धेत सध्या उत्कृष्ट चित्रपट कसा मरतोय? याविषयी ज्येष्ठ सिनेसमीक्षक आणि सिनेअभ्यासक दिलीप ठाकूर यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या आजवरच्या अभ्यासातून काही समोर आलेली निरीक्षणं सोप्या शब्दांत मांडायचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून केला गेला आहे.

बजेट आणि कमाईचे आकडे खरे असतात?

खरं बघायला गेलं तर चित्रपट बनवण्यासाठी लागणारा पैसा आणि त्यातून कमाईचा अधिकृत आकडा हा कधीच बाहेर येत नाही. आपल्यासमोर जे आकडे दिसतात ते अंदाजानुसार दिलेले आकडे असतात. चित्रपटासाठी जो पैसा लावतो आणि ज्याच्या खिशात नफा जातो ती व्यक्ती सोडल्यास तो अधिकृत आकडा कधीच बाहेर जाहीर केला जात नाही. त्यामुळे आपल्याला दिसणारी ही करोडोंची कमाई आणि त्यामागे काहीच तथ्य नसतं.

आणखी वाचा : रोहित शेट्टीने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट; दोघांमध्ये बॉलिवूडविषयी चर्चा कि आणखी काही?

सुरुवातीच्या काळात चित्रपटाचं बजेट आणि कमाई याचे आकडे मांडायची चित्रपटसृष्टीत पद्धतच नव्हती. ७० च्या काळात आलेल्या ‘तलाश’ चित्रपटापासून ही अमुक अमूक कोटीची भाषा चित्रपटक्षेत्रात रूढ व्हायला सुरुवात झाली. बलराज सहानी, ओ पी रल्हन, राजेंद्र कुमार, शर्मिला टागोर अभिनित या चित्रपटाची तेव्ह हवा झाली. १ कोटी खर्च करून बनवलेला चित्रपट म्हणून याचा प्रचंड गाजावाजा झाला पण तिकिटबारीवर चित्रपट दणकून आपटला. यानंतरसुद्धा शोलेसारखा चित्रपट पुढे झाला पण तेव्हाही हे गणित एवढं चर्चेत नव्हतं. ‘शान’ चित्रपटाच्या दरम्यान मात्र त्याच्या बजेटची चांगलीच चर्चा झाली. तब्बल ६ कोटी खर्च करून बनवलेला चित्रपट म्हणून शानचं नाव झालं. चित्रपट फारसा चालला नाही, पण या चित्रपटापासून या क्षेत्रातील अर्थकारण बाहेर यायला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो!

जागतिकीकरणाचा प्रभाव कसा झाला?

२००० च्या दरम्यान भारतात जागतिकीकरणाचं वारं वाहू लागलं, कॉर्पोरेट कल्चरने हळूहळू जागा व्यापायला सुरुवात केली आणि मग याचाच परिणाम चित्रपटसृष्टीवरही पडला. याचकाळात आलेल्या ‘लगान’ नंतर हे चित्रपटाचं अर्थकारण वेगाने बदलायला सुरुवात झाली. २६ कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या लगानची चर्चा त्याच्या ऑस्करवारीसाठी आणि नामांकनासाठी होत होती. पण एव्हाना लोकांनाही चित्रपटाचं गणित नेमकं कसं चालतं हे जाणून घेण्यात रुची निर्माण होऊ लागली.

कॉर्पोरेट कंपन्या, मार्केटिंग एजन्सी, पीआर एजन्सी यांचा सुळसुळाट वाढला आणि २००८-०९ नंतर हे भलेमोठे आकडे आपल्यासमोर यायला सुरुवात झाली. यामागे याच कॉर्पोरेट कंपन्या आणि एजन्सीचं डोकं होतं. बाजारातील ग्राहकांचा त्यांनी योग्य अभ्यास केला आणि चित्रपटाचं बजेट आणि ते भले मोठे आकडे सांगून लोकांची त्या चित्रपटात आवड निर्माण केली. ‘एवढा महागडा चित्रपट आहे तर एकदा बघूया तरी’ ही नस त्यांनी अचूक पकडली आणि मग पुढे त्यावर एवढा मोठा डोलारा उभा राहिला. १००, २००, ३०० कोटी मग हळूहळू हा आकडा ५०० कोटी इथवर पोहोचला. बाहुबली हा जगभरात १००० कोटी कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. आणि ही स्पर्धा अजूनही तशीच सुरू आहे, किंबहुना ती आणखीनच कठीण झाली आहे.

निर्माते, प्रदर्शक वितरक यांच्यात व्यवहार कसा होतो?

पूर्वीच्या काळी बरेच स्वतंत्र निर्माते होते. त्यामुळे चित्रपटाची प्रिंट काढून आणून तब्बल एका प्रिंटसाठी ४०००० खर्च करून ती प्रिंट सगळीकडे पाठवणं हे तसं जिकिरीचं काम होतं. २००८ नंतर डिजिटल क्रांतीमुळे निर्माते वेगळे झाले आणि प्रदर्शक आणि वितरक वेगळे झाले. आजही यशराज सारखे स्टुडिओज हे वितरक म्हणूनसुद्धा काम करतात पण तसे स्टुडिओ फार कमी आहेत. आता चित्रपटाच्या नफ्यातसुद्धा निर्माते, वितरक, प्रदर्शक हे वाटेकरी असतात. एखाद्या चित्रपटाची प्रचंड हवा असेल तेव्हा निर्माते मंडळी स्वतःकडे जास्तीत जास्त नफा घेण्यासाठी अडून बसतात आणि मग त्यांच्यात वाटाघाटी होऊन तो नफा प्रत्येकाला मिळतो. आधीच्या काळात ज्याप्रमाणे एखाद्या चित्रपटाचा हमखास एवढा बिझनेस होईल हे सांगता यायचं ते आता सांगणं कठीण आहे कारण आधीसारखा प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाही. त्यामागे चित्रपटाचा घसरलेला दर्जा, ओटीटीसारखी उत्तम सोय आणि प्रेक्षकांना गृहीत धरणं ही ३ कारणं प्रामुख्याने समोर येतात.

आणखी वाचा : ईशान खट्टरने केलेलं कौतुक ऐकून करण जोहर म्हणाला, “माझ्याकडे त्या नजरेने कुणी बघतच नाही”

सिनेअभ्यासक दिलीप ठाकूर यांच्या मते आता येणारा काळ हा लो आणि मिडीयम बजेट चित्रपटांचा असेल. उदाहरण द्यायचं झालं तर उरी हा चित्रपट तसा कमी बजेटमध्ये बनला पण त्या चित्रपटाचा नफा हा दुप्पट तीनपट झाला. हेच गणित ‘ब्रह्मास्त्र’सारख्या बिग बजेट चित्रपटांच्या बाबतीत लागू होत नाही. समजा ४०० कोटीमध्ये बनलेल्या ब्रह्मास्त्रने केवळ ४५० कोटी एवढी कमाई केली तर चित्रपटाच्या बजेटनुसार तो नफा हा अगदी नगण्य असेल. त्यामुळेच येणाऱ्या काळात एका भाषेत चित्रपट बनवून तो वेगवेगळ्या भाषेत डब करून प्रदर्शित करणं हा एक स्मार्ट उपाय आहे. त्यामुळेच दाक्षिणात्य चित्रपट सध्या जोरदार चालत आहे, हिंदी निर्मात्यांना ही कल्पना आता हळूहळू येऊ लागली आहे, मराठी चित्रपटसृष्टीत मात्र अजून असे प्रयोग होताना दिसत नाहीत. चित्रपटातुन नुकसान न होता थोडाफार नफा कमवायचा असेल तर सगळ्याच चित्रपटांनी हा फॉर्म्युला वापरायला हवा.