चीनचे भारतातील राजदूत शू फेइहाँग यांनी रविवारी (२३ फेब्रुवारी) ‘एक्स’वर दोन हजार किलोमीटरपेक्षा अधिक विस्तारलेल्या आणि तिबेट मार्गे चीनला भारताशी जोडलेल्या ऐतिहासिक ‘टी हॉर्स रोड’बद्दल पोस्ट केले. “प्राचीन टी हॉर्स रोड इतिहासातील चीन आणि भारत यांच्यातील देवाणघेवाण आणि परस्पर संवादाचा साक्षीदार आहे,” असे त्यांनी लिहिले. चीन आणि युरोपला जोडणारा सिल्क रोड जितका प्रसिद्ध आहे, तितकी या मार्गाविषयीची माहिती फार कमी लोकांना आहे.

परंतु, ‘टी हॉर्स रोड’ हा शतकानुशतके एक महत्त्वाचा व्यावसायिक मार्ग होता. “चीनमधून चहा झिझांग (तिबेट) येथे नेण्यात आला, त्यानंतर हिमालयीन खिंडीतून कोलकाता येथे पाठवला गेला आणि युरोप व आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर विकला गेला,” असेही त्यांनी लिहिले. काय आहे हा ऐतिहासिक मार्ग? या मार्गाचे महत्त्व काय? इतिहासात या मार्गाद्वारे देवाणघेवाण कशी केली गेली? त्याविषयी जाणून घेऊ.

‘टी हॉर्स रोड’ काय आहे?

टी हॉर्स रोड हा एकच मार्ग नाही तर हा दक्षिण-पश्चिम चीनमध्ये सुरू झालेल्या आणि भारतीय उपखंडापर्यंत पसरलेल्या अनेक मार्गांचा संदर्भ देतो. दोन मुख्य मार्ग युनान प्रांतातील डाली आणि लिजियांग यांसारख्या शहरांमधून गेले. त्यानंतर या मार्गांचा विस्तार तिबेटमधील ल्हासापर्यंत वाढवण्यात आला, जे सध्याच्या भारत, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये विभागले आहेत. त्यानंतर हा मार्ग भारतापर्यंत विस्तारण्यात आला. हा मार्ग प्रवासासाठी अत्यंत धोकादायक होता. टी हॉर्स रोडचा उगम चीनमधील तांग राजवंशाच्या (इसवी सन ६१८ ते ९२६) राजवटीत सापडतो. बौद्ध भिक्खू यिजिंग (इसवी सन ६३५ ते ७१३) यांनी आज उपलब्ध असलेल्या नालंदा विद्यापीठाची काही सर्वात तपशीलवार वर्णने दिली आहेत.

त्यांच्या लिखाणात साखर, कापड आणि तांदूळ, नूडल्स यांसारख्या उत्पादनांचा उल्लेख आहे जे दक्षिण-पश्चिम चीनमधून तिबेट आणि भारतात नेले जात होते, तर दुसरीकडे घोडे, चामडे, तिबेटी सोने, केशर आणि इतर औषधी वनस्पती चीनमध्ये नेल्या जात होत्या, असे शाओचेन वांग यांनी ‘द प्रोटेक्शन, डेसिग्नेशन अँड मॅनेजमेंट ऑफ कल्चरल रूट्स: अ केस स्टडी ऑफ द टी अँड हॉर्स रोड इन चायना’, २०२१ मध्ये लिहिले आहे. कालांतराने, सोंग राजवंश (इसवी सन ९६० ते १२७९) मधील अधिकृत कागदपत्रांमध्ये दर्शविल्याप्रमाणे, व्यापार चहा आणि घोड्यांवर केंद्रित झाला. परंतु, व्यापारी इतर वस्तूंच्या व्यवहारासाठीदेखील या मार्गाचा वापर करायचे.

‘टी हॉर्स रोड’ महत्त्वाचा का होता?

तिबेटमध्ये चहाची मागणी वाढल्याने हा मार्ग त्याची आयात करण्याकरिता एक प्रमुख मार्ग मानला जात होता. एका लोकप्रिय आख्यायिकेनुसार, सातव्या शतकात एका तिबेटी राजाशी लग्न करणाऱ्या एका राजकन्येने पर्वतीय राज्यात हुंडा म्हणून चहा हे पेय आणले, तेव्हा चहा लोकप्रिय झाला. नॅशनल जिओग्राफिकच्या एका लेखाने अधिक व्यावहारिक कारणेही दिली आहेत. “तिबेटी राजघराण्यांनी आणि भटक्या लोकांनी चांगल्या कारणांसाठी चहाचे सेवन केले. हे थंड वातावरणात एक गरम पेय होते.

त्याच वेळी घोडे एक महत्त्वपूर्ण लष्करी संसाधन आणि वाहतुकीचे साधन होते. पण, चीनच्या मध्यवर्ती मैदानात घोडे नसल्याने त्यांना शेजारच्या तिबेट आणि युनानमधून आयात करावे लागले. “व्यावसायिक वस्तू चहा आणि घोड्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनी या मार्गाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि विनिमय बाजार तयार झाला,” असे शाओचेन वांग यांनी लिहिले. त्यानंतर १० व्या शतकापर्यंत, व्यापार नियंत्रित करण्यासाठी आणि पर्यवेक्षण करण्यासाठी चीनमधील सीमावर्ती प्रदेशांमध्ये अधिकृत सुविधा स्थापन करण्यात आल्या. राज्यांच्या उदय आणि पतनासह पुढील काही शतकांमध्ये व्यापार कमी झाला. उदाहरणार्थ, चहा दाबून विटांच्या आकारामध्ये पॅक होऊ लागला. पॅकिंगचा हा प्रकार आजपर्यंत लोकप्रिय आहे.

मार्गाच्या वापरावर निर्बंध का

१९१२ मध्ये जसजसा किंग राजवंशाचा काळ संपुष्टात आला, तसतसे हॉर्स टी रोडचे महत्त्व वाढत गेले. शाओचेन वांग यांनी लिहिले, देशांतर्गत अशांतता आणि परदेशी आक्रमणे यांनी नैऋत्य चीनमधील व्यापार प्रणालींसाठी एक अनोखी संधी प्रदान केली. रस्त्याच्या माध्यमातून युनानच्या कमी विकसित डोंगराळ प्रदेशात नवीन तंत्रे आणि वस्तू आणल्या गेल्या. याव्यतिरिक्त, चीनचा आता जागतिक बाजारपेठेशी अधिक संपर्क येत असल्याने युनानचा चहा उद्योग झपाट्याने विस्तारला. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धादरम्यान, चीनमधील रणांगणावर पुरवठा वाहतूक करण्यात या रस्त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. १९४९ मध्ये पीपल्स रिपब्लिकच्या स्थापनेनंतर, टी हॉर्स रोडचा वापर हळूहळू कमी होत गेला. रस्ते पक्के झाले आणि आधुनिक बांधकाम हाती घेण्यात आले, आता या ठिकाणी फक्त काही पायवाटा शिल्लक आहेत. विशेष म्हणजे, १५० किलोपर्यंतचा भार वाहून नेणाऱ्या पोर्टर्सनी माओ झेडोंगच्या जमीन सुधारणांनंतर काम थांबवले.

अलीकडे, चीनने ऐतिहासिक मार्गावर पर्यटनाला चालना दिली आहे. लिजियांग हे १९९७ मध्ये युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ ठरले. युनेस्को वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे, “१२ व्या शतकापासून, लिजियांगचे जुने शहर हे सिचुआन, युनान आणि तिबेटमधील व्यापारासाठी एक महत्त्वाचे माल वितरण केंद्र होते आणि तेथूनच दक्षिणेतील सिल्क रोड प्राचीन चामा (चहा) रोडला जोडतो.” ८०० वर्षांहून अधिक काळातील सांस्कृतिक आणि तांत्रिक देवाणघेवाणीमुळे या प्रदेशात अद्वितीय स्थानिक वास्तुकला, कला, संस्कृती आणि सामाजिक जीवन निर्माण झाले आहे. यामध्ये हान, बाई, तिबेटी आणि इतर वांशिक गटांचा समावेश आहे. तसेच धार्मिक वास्तुकला आणि इतर इमारतींमधील भित्तीचित्रे ताओवाद आणि बौद्ध धर्माचे सह-अस्तित्व कसे प्रतिबिंबित करतात हेदेखील नमूद केले आहे.

Story img Loader