कॅनो काब्रा हे कोलंबियामधील दुर्गम गाव आहे. अनेक दशकांपासून हे गाव एकाच उद्योगाच्या आधारावर आपली रोजीरोटी भागवत आहे. हा उद्योग म्हणजे ‘कोकेन’ या अमली पदार्थाची निर्मिती होय. कोलंबिया देशाच्या मध्यभागामध्ये राहणारे येथील समुदाय दररोज सकाळी लवकर उठतात आणि कोका या झाडाची पाने गोळा करायला जातात. या झाडाची पाने गोळा करताना बऱ्याचदा त्यांच्या हातांना जखमाही होतात. नंतर ते या गोळा केलेल्या पानांमध्ये गॅसोलीन व इतर रसायने मिसळतात. या प्रक्रियेमुळे कोका पेस्टच्या खडूच्या पांढऱ्या विटा तयार होतात. एका गावकऱ्याने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी एक चिंताजनक गोष्ट घडली. त्यामुळे गावकऱ्यांचा रोजगार संकटात आला. गावकऱ्यांनी सांगितले की, अमली पदार्थ तस्कर दिसायचे बंद झाले. खरे तर हे तस्करच कोका पेस्ट विकत घ्यायचे आणि त्याचे कोकेनमध्ये रूपांतर करायचे. मात्र, हे तस्करच गायब झाल्याने या गरीब लोकांवर आर्थिक संकट उदभवले आहे. त्यांना अन्नाचीही कमतरता भासू लागलीय. काही लोक कोलंबियाच्या इतर भागांत नोकऱ्या शोधण्यासाठी स्थलांतरित होऊ लागले. या गावात फक्त २०० लोक होते; ती संख्या आता ४० वर आली आहे.
हेही वाचा : संसदेत महिला खासदारांची संख्या वाढत का नाही?
हाच प्रकार कोलंबियामधील अनेक छोट्या छोट्या दुर्गम गावांमध्ये घडताना दिसून आला. या ठिकाणी कोका हे उत्पन्नाचे एकमेव साधन होते. या ठिकाणचे लोक कित्येक वर्षांपासून त्यावरच अवलंबून होते. संपूर्ण देशभरातील कोकावर अवलंबून असलेल्या गावांची सध्या हीच अवस्था झाली आहे. कोलंबिया हा देश कोकेन उद्योगाचे जागतिक केंद्र मानला जातो. या कोलंबियातच पाब्लो एस्कोबार नावाचा जगातील सर्वांत कुप्रसिद्ध गुन्हेगार उदयास आला होता. कोलंबिया अजूनही इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त प्रमाणात कोकेन या अमली पदार्थाची निर्मिती करतो. मात्र, सध्या हा देश मोठ्या बदलांना सामोरा जात आहे. या बदलांमागे देशांतर्गत, तसेच जागतिक राजकारणाच्या बाबीही कारणीभूत आहेत. या बदलांमुळे कोलंबियातील अमली पदार्थांचा उद्योग वेगळा आकार घेताना दिसत आहे.
शांतता कराराचा परिणाम
कोलंबियातील कोकेन उद्योग विस्कळित होत आहे. हा उद्योग विस्कळित होण्याला देशात झालेला ‘शांतता करार’ही अंशतः कारणीभूत आहे. हा शांतता कराराचा अनपेक्षित परिणाम असला तरीही तो घडताना दिसत आहे. जवळपास आठ वर्षांपूर्वी कोलंबियामध्ये शांतता करार झाला होता. कोलंबियामध्ये रिव्होल्युशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया (FARC) नावाचा एक सर्वांत मोठा सशस्त्र गट कार्यरत होता. या गटाबरोबर हा शांतता करार पार पडला. या शांतता करारापूर्वी या सशस्त्र गटामुळे देशात अशांतता माजली होती. या करारामुळे देशातील संघर्षाचा एक टप्पा संपुष्टात आल्याची भावना आहे. जवळपास अनेक दशके हा संघर्ष चालला होता. देशातील डाव्या विचारसरणीच्या गटांनी कोकेनच्या वापरासह त्यांच्या युद्धासाठी वित्तपुरवठा केला होता. त्यासाठी ते हजारो शेतकऱ्यांवर अवलंबून होते. हे शेतकरी कोकाची पाने तोडून, कोका पेस्टची निर्मिती करायचे. त्यातूनच कोकेन या अमली पदार्थाची निर्मिती केली जाते. थोडक्यात, कोका हाच या अमली पदार्थाच्या निमितीमधला मुख्य घटक आहे. युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अॅण्ड क्राइमचे लिओनार्दो कोरिया यांनी हे स्पष्ट केले की, FARC ने कोकेन उद्योग सोडल्यानंतर देशातील छोट्या गुन्हेगारी गटांनी त्यांची जागा घेतली. या नव्या गुन्हेगारी गटांनी या उद्योगामध्ये नवे आर्थिक प्रारूप अस्तित्वात आणले. हे नवे गुन्हेगारी गट कमी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कोकाची खरेदी करतात. शक्यतो सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांकडूनच सध्या कोकाची खरेदी केली जाते. कारण- सीमावर्ती भागातून अमली पदार्थ देशाबाहेर हलवण्याचे काम सहज सोप्या रीतीने होते.
याच कारणांमुळे कॅनो काब्रासारख्या छोट्या दुर्गम शहरांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. कॅनो काब्रा हे गाव कोलंबियाच्या मध्यवर्ती भागामध्ये वसलेले आहे. हे दुर्गम गाव कोलंबियाची राजधानी बोगोटाच्या आग्नेयेस सुमारे १६५ मैल अंतरावर आहे. या गावाने गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांचा एकमेव चरितार्थ असलेला व्यवसाय स्वत:च्या डोळ्यांसमोर लुप्त झालेला पाहिला आहे. इतर देश महत्त्वाचे प्रतिस्पर्धी बनले आहेत. त्यामुळे कोलंबियातील अमली पदार्थांचा बाजार बराच बदलला आहे. इक्वेडोर हा देश आता कोकेनचा सर्वांत मोठा निर्यातदार आहे. पेरूसहित मध्य अमेरिकेतही कोका पानाची लागवड वाढली आहे. आता जागतिक पातळीवर कोकेनचे उत्पादन पूर्वीपेक्षा जास्त होत आहे. युनायटेड स्टेट्समध्ये कोकेनचा वापर कमी झाला असला तरीही युरोपमध्ये आणि लॅटिन अमेरिकेत कोकेनचा वापर वाढत आहे. कोकेनचा खप आशियाप्रमाणेच इतर प्रदेशांतही वाढत आहे.
हेही वाचा : संशोधन केंद्रे, मानवी वस्त्या… चंद्रावर गुहेचा शोध मानवासाठी महत्त्वाचा का ठरणार?
अमली पदार्थांची विक्रमी निर्मिती
काही तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की, कोकेन उद्योगातील या बदलांमुळे कोका वनस्पती उत्पादक कायदेशीर नोकऱ्यांच्या मागे जाऊ शकतात. त्याऐवजी शेतकरी इतर बेकायदा कामांकडे वळतील, अशी भीती त्यांना वाटते. जेफरसन पॅराडो (वय ३९) हे कॅनो काब्रासारख्या दुर्गम गावांचा समावेश होणाऱ्या स्थानिक परिषदेचे अध्यक्ष आहेत. पॅराडो म्हणाले की, बरेच लोक गुरेढोरे पाळू शकतात. गुरे पाळण्यामुळे जंगलतोड वाढीस लागताना दिसत आहे. इतर रहिवाशांनी सांगितले की, आर्थिक कुचंबणा होत असल्याने ते सशस्त्र गटांमध्येही सामील होऊ शकतात.