खेळण्याचे दुकान असो की ट्रेनमधील एखादा विक्रेता त्यांच्याकडे विक्रीसाठी रुबिक क्यूब नाही ही अशक्यप्राय गोष्ट आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच रुबिक क्यूब सोडविण्याची उत्सुकता असते. त्यामध्ये कित्येक तास, दिवस ते गुंतून गेलेले दिसतात. आजच्या डिजिटल युगातही भारतातच नव्हे तर जगभरात या ‘घना’ने अनेकांना मोहात अडकवले आहे. त्याला आता ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. रुबिक क्यूबच्या ५० वर्षांच्या वाटचालीविषयी…

रुबिक क्यूबचा शोध कोणी लावला?

ॲर्नो रुबिक, हा क्यूबचा शोधकर्ता. रुबिक एक हंगेरियन वास्तुविशारद, डिझायनर, शिल्पकार. आता निवृत्त प्राध्यापक. जुलै १९७४ मध्ये आपल्या ३०व्या वाढदिवशी, त्यांनी क्यूबची रचना तयार केली होती. त्या शोधानंतर हे कोडे ‘मॅजिक क्यूब’ म्हणून ओळखले गेले. क्यूबची कोड्यात टाकणारी क्षमताही त्यांनी ओळखली होती.  काही महिने अधूनमधून खेळल्यानंतर त्यांना क्यूब सोडवता आला. त्यानंतर त्यांनी जानेवारी १९७५ मध्ये पेटंट अर्ज सादर केले. १९७७ च्या अखेरीस ‘मॅजिक क्यूब’ हंगेरीमधील खेळण्यांच्या दुकानात दाखल झाले. मार्च १९८१ मध्ये, क्यूबचे नाव ‘रुबिक’ असे बदलण्यात आले. जगभरातील खेळण्यांच्या दुकानात रुबिक क्यूबने स्थान मिळवले.

हेही वाचा >>>ऋषी सुनक यांच्यासमोरील आव्हान मोठे! ब्रिटनच्या निवडणुकीत भारतीयांची मते का महत्त्वाची ठरतील?

क्यूबच्या शोधामागे काय भूमिका होती?

प्रोफेसर रुबिक यांनी क्यूबची संकल्पना एक मनोरंजक शिक्षण उपकरण म्हणून मांडली होती. या संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांना थ्रीडी आकार आणि नमुन्यांची जाणीव विकसित करण्यात मदत होते. हे व्हिज्युअल मेमरी आणि हात-डोळे यांचा समन्वय विकसित करण्यासदेखील मदत करते. कारण हे कोडे सोडविणारे ‘क्यूबर्स’ मोठ्या प्रमाणात अल्गोरिदम शिकतात आणि ते कसे कार्य करते ते चटकन ओळखतात.

आजही रुबिक क्यूबची लोकप्रियता कशी?

द क्यूबने १९९१ मध्ये ‘द सिम्पसन्स’मधून पॉप कल्चरमध्ये पदार्पण केले. अधिकृतपणे, रुबिकचे ५० कोटींहून अधिक ब्रँडेड क्यूब विकले गेले आहेत. कॅनडाच्या स्पिन मास्टर कॉर्पोरेशनने, जे ब्रँडचे मालक आहेत, त्यांनी २०२३ मध्ये ७४ लाख क्यूब विकले. यातून त्यांना सुमारे ७.५ कोटी डॉलरची कमाई झाल्याचे समजते. यावर्षी ५० व्या वर्धापन दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, बॅटमॅन, ब्लॅक पँथर, वेन्सडे ॲडम्स, बार्बी आणि हॅलो किट्टी थीमसह मर्यादित संस्करण क्यूब्सची घोषणा करण्यात आली आहे.

रुबिक क्यूब संदर्भात कोणत्या स्पर्धांचे आयोजन?

१९८२ मध्ये बुडापेस्ट येथे पहिली ‘रुबिक क्यूब वर्ल्ड चॅम्पियनशिप’ झाली. त्या वर्षी जिंकण्याची म्हणजे सहाच्या सहा रंग जमवून आणल्याची वेळ २२.९५ सेकंद होती. २००४ मध्ये वर्ल्ड क्यूब असोसिएशनची (डब्ल्यूसीए) स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे द्वैवार्षिक ‘ट्विस्टी’ वर्ल्ड चॅम्पियनशिपचे १७ प्रकारांसह आयोजन करण्यात येते. तसेच ‘डब्ल्यूसीए’ उत्साही लोकांना सर्वत्र क्युबिंग स्पर्धा आयोजित करण्यात मदत करते. आत्तापर्यंत, सर्व प्लॅटोनिक घन पदार्थांचे ट्विस्टी पझल प्रकारांमध्ये रूपांतर झाले आहे. वर्ल्ड क्यूब असोसिएशन स्पर्धांमध्ये वापरलेला सर्वात मोठा क्यूब २१-बाय-२१-बाय-२१ हा सर्वसाधारणपणे मास मार्केटवर उपलब्ध असलेला सर्वात मोठा क्यूब आहे. २०२३ची कोरियन-अमेरिकन वर्ल्ड चॅम्पियन मॅक्स पार्क याने जिंकली असून पार्कचा 3×3 साठी वेगाचा विक्रम ३.१३ सेकंद आहे. अशा अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊनही अद्याप कोणत्याही भारतीयाने डब्ल्यूसीए स्पर्धेत कोणताही विक्रम नोंदवलेला नाही.

हेही वाचा >>>फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवरायांची बखर; बखर म्हणजे नेमकं काय?

क्यूब सोडविण्यासाठी मार्गदर्शन कुठून मिळते?

क्यूबच्या निर्मितीनंतर डेव्हिड सिंगमास्टर नावाच्या गणितज्ञांनी ‘नोट्स ऑन रुबिक्स ‘मॅजिक क्यूब’ हे पुस्तक लिहिले. तर १९८० मध्ये ‘एमआयटी’ मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्याने क्यूब लव्हर्स नावाची पहिली इंटरनेट मेल लिस्ट तयार केली होती. त्यांना संदेशाद्वारे हे कोडे सोडविण्याचा मार्ग सांगण्यात येत होता. तसेच त्यावेळी प्रसिद्ध नियतकालिक, वृत्तपत्रांमध्येही क्यूब सोडविण्याच्या सोप्या युक्त्या प्रकाशित केल्या जात. सध्याच्या डिजिटल युगात इंटनेटवर विविध माध्यमातून हे कोडे सोडविण्याचे मार्ग उपलब्ध करून दिले आहेत.

क्यूब एक उपचारात्मक साधन कसे?

रुबिक्स क्यूब एकाग्रता, स्मृती, अल्गोरिदम ओळखणे आणि मेंदूचे दृश्य अवकाशीय कार्य सुलभ करते. डिजिटल गेमिंगसारखे विपरीत परिणाम करत नाही. त्याऐवजी, हे चिकाटीने ध्येय-केंद्रित आणि दृढनिश्चयी क्रिया करण्याचे धडे देते.  विशेषत: तरुणांसाठी. हे चिंता आणि ताणतणाव दूर करण्याचे उत्तम साधन आहे, असे अनेक न्यूरोसायकियाट्रिस्टनी म्हटले आहे.

pradnya.talegaonkar@expressindia.com