Sivagiri Mutt shirt removal controversy: केरळमधील प्रसिद्ध शिवगिरी मठाच्या प्रमुखांनी एक घृणास्पद आणि वाईट प्रथा बंद करण्याची मागणी केली आहे. या प्रथेनुसार पुरुषांना मंदिरामध्ये प्रवेश करण्याआधी शर्ट काढावा लागतो. त्यांच्या या आवाहनाचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी समर्थन केले आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी वार्षिक शिवगिरी तीर्थयात्रेच्या उद्घाटनप्रसंगी समाजसुधारक श्रीनारायण गुरु यांनी स्थापन केलेल्या मठाचे अध्यक्ष स्वामी सच्चिदानंद यांनी सांगितले की, ” पुनूल (जानवं) दिसावं म्हणून ही प्रथा सुरू करण्यात आली होती आणि आजही ती मंदिरांमध्ये सुरु आहे. स्वामी म्हणाले की, श्री नारायण सोसायटीला ही प्रथा बंद करायची आहे. “ही एक वाईट प्रथा आहे यात शंका नाही. श्रीनारायण मंदिरांमध्ये ही प्रथा अस्तित्त्वात नाही. योग्य वेळी बदल करणे आवश्यक आहे.” विजयन यांनी तिरुवनंतपुरमच्या वर्कला येथील एझवा तीर्थक्षेत्रात या उत्सवाचे उद्घाटन केले. उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले की, हा एक मोठा सामाजिक बदल असू शकतो आणि अनेक मंदिरे त्याचे आशेने पालन करतील. “कोणावरही सक्ती करण्याची गरज नाही,” केरळचे मुख्यमंत्री म्हणाले. “काळानुसार अनेक प्रथा बदलल्या आहेत. श्रीनारायण चळवळीशी संबंधित मंदिरांनी तो बदल स्वीकारला आहे. मला आशा आहे की, इतर प्रार्थनास्थळे देखील या बदलाचे अनुसरण करतील,” असे ते म्हणाले.
केरळ भाजपाकडून निषेध
केरळ भाजप आणि नायर सेवा सोसायटीने (NSS) मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा निषेध केला आहे, तर श्री नारायण धर्म परिपालना (SNDP) योगमचे अध्यक्ष वेल्लापल्ली नटेसन यांनी हिंदूंना एकजूट राहण्याचे आवाहन केले. NSS केरळमध्ये प्रबळ असलेल्या नायर जातीचे प्रतिनिधित्व करते, तर SNDP योगम ही एझवा समाजाची संघटना आहे. त्रावणकोर देवस्वोम बोर्ड आणि गुरुवायूर देवस्वोम बोर्ड या राज्याच्या मंदिरांचे व्यवस्थापन करणाऱ्या पाच अधिकृत संस्थांपैकी दोन संस्थांनी सांगितले की, ते या विषयावर चर्चा करून निर्णय घेतील.
केरळ मंदिरातील ड्रेस कोड
गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी राज्यातील सर्व मंदिरे पुरुषांना शर्ट काढण्यास सांगत नाहीत. परंतु, तिरुवनंतपुरममधील श्री पद्मनाभस्वामी मंदिर, त्रिशूरमधील गुरुवायूर श्री कृष्ण मंदिर आणि कोट्टायममधील एट्टुमनूर महादेव मंदिर यासारख्या काही प्रमुख मंदिरांमध्ये या प्रथेचे कठोर पालन केले जाते. पद्मनाभस्वामी मंदिरात महिलांनी साडी किंवा स्कर्ट (परकर) घालणे आवश्यक असते किंवा त्यांच्या शरीराचा खालचा अर्धा भाग धोतराने गुंडाळावा लागतो. गुरुवायूर मंदिरात २०१३ पर्यंत याच नियमाचे पालन केले जात होते.
काळा पोशाख
शबरीमाला मंदिराला भेट देताना काळा पोशाख परिधान करावा लागतो. या मंदिरात फक्त पुरुष, १० वर्षांखालील मुली आणि वयवर्ष ५० वर्षापेक्षा अधिकच्या महिलाच प्रवेश करू शकतात. शिवाय मंदिरातील मुख्य देवता अयप्पाला काळा शर्ट, काळं धोतर आणि इरुमुदिकेटू अर्पण केलं जात. ४१ दिवसांच्या तीर्थाटनात अनेक विधी समाविष्ट असतात म्हणूनच भाविक मद्य आणि मांस वर्ज्य करतात.
ड्रेस कोडला आव्हान
पेहरावावरील निर्बंध हटवण्याचा युक्तिवाद नवीन नाही. केरळ सरकारने १९७० च्या दशकात मंदिरातील ड्रेस कोड रद्द करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याचा मर्यादित परिणाम झाल्यानंतर तो प्रयत्न सोडून दिला. २०१४ साली केरळ उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने गर्भगृहाच्या आतील कपड्यांवरील निर्बंध हटवण्याची याचिका फेटाळली (मूरकोथ प्रकाश विरुद्ध केरळ राज्य). ‘श्री वेंकटरामण देवरू आणि इतर विरुद्ध द स्टेट ऑफ म्हैसूर आणि इतर’ (१९५७) मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात भारतीय तंत्र शाखेतील आगमांवर चर्चा करण्यात आली होती, त्याच आधारे निकाल देण्यात आला. न्यायालयाने आगमाचे वर्णन मंदिरांचे बांधकाम, त्यामध्ये मूर्तींची स्थापना आणि देवतेची उपासना करण्याशी संबंधित नियम सांगणारे साहित्य म्हणून केले होते. केरळमधील मंदिरांनी उपासना आणि भक्तांच्या आचरणावर विशिष्ट नियम लादले आहेत आणि या प्रथांपासून विचलित झाल्यास अपवित्र होऊ शकतो, असे मानले जाते. न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की, ऑबसेर्व्हन्सस भक्ताच्या उपासना करण्याच्या मूलभूत अधिकारावर अंतर्निहित बंधने घालत नाहीत. तसेच एका भक्ताला मंदिराच्या जागेचा त्याच्या इच्छेनुसार आणि आनंदानुसार वापर करण्याचा पूर्ण अधिकार नाही, असे निरीक्षण नोंदवले आहे.
शर्ट काढण्याच्या प्रथेची उत्पत्ती
संस्कृतचे अभ्यासक डॉ. टी एस श्यामकुमार यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, गर्भगृहाच्या आत शर्ट काढण्याच्या प्रथेला कोणताही धर्मशास्त्रीय आधार नाही. “मंदिरांमध्ये शर्ट काढण्याची कल्पना कोणत्याही दस्तऐवजात आढळत नाही, कारण शर्ट हा पोशाख आपल्याकडे अस्तित्त्वातच नव्हता.”
अधिक वाचा: Trump on Canada: कॅनडा अमेरिकेत विलीन होणार का? इतिहास काय सांगतो?
डॉ श्यामकुमार यांनी जातीतील प्रथेच्या संभाव्य उत्पत्तीकडे लक्ष वेधले.
“१० व्या आणि १९ व्या शतकादरम्यान केरळच्या धर्मग्रंथांमध्ये स्पष्टपणे एझाव आणि आदिवासींसारख्या उपेक्षित समुदायातील लोकांना मंदिरात प्रवेश प्रतिबंधित करण्यात आले आहे,” असे ते म्हणाले. एझावांसारखे समुदाय इतर मागासवर्गीयांमध्ये (OBC) मोडतात. डॉ श्यामकुमार यांनी आठवण करून दिली की, “मध्ययुगापर्यंत शूद्रांना पद्मनाभस्वामी मंदिरात प्रवेश करताना शरीराचा वरचा भाग झाकण्याची परवानगी नव्हती”. “अट्टुकल राणी मंदिरात शरीराचा वरचा भाग झाकण्याचे धाडस केल्याबद्दल शूद्र स्त्रीचा ब्लाउज फाडल्याचा एक किस्सा आहे. आधुनिक युगात पुरुषांना त्यांचा शर्ट काढण्यास सांगितले जाण्यापर्यंत याचा विस्तार झाला आहे. शर्ट काढण्याच्या प्रथेचे श्रेय परंपरेला देणे पूर्णपणे चुकीचे आहे. प्रथा जातीत रुजलेली आहे. श्रीमंत नायरांना, त्यांची जात प्रबळ असून देखील ब्राह्मणांचा आदर करण्यासाठी त्यांचे वरचे वस्त्र काढण्यास सांगितले गेल्याची नोंद आहे,” असेही श्यामकुमार सांगतात.