राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीनिमित्त (दि. २४ ऑक्टोबर) संघ प्रचारकांना नागपूर येथे संबोधित करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेतील शेवटची दोन भाषणे आवर्जून वाचण्याचे आवाहन केले. ज्याप्रमाणे तुम्ही संघाचे संस्थापक केशव हेडगेवार यांची भाषणे वाचता, त्याप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या दोन भाषणांचे पारायण करा, असे भागवत यांनी आवर्जून सांगितले. मोहन भागवत यांनी आंबेडकरांचे भाषण वाचण्यास सांगणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गेल्या काही वर्षांतील कार्यक्रमाशी सुसंगत असल्याचे दिसते. अनेक वर्षांपासून संघाकडून डॉ. आंबेडकरांची स्तुती केली जात आहे. विशेष करून २०१४ साली जेव्हा भाजपाचे केंद्रात सरकार आले तेव्हापासून भाजपाने आक्रमकपणे आंबेडकरांचा वारसा स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी हिंदू धर्मातून बाहेर पडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रजासत्ताक आदर्शांसह राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचा हिंदू राष्ट्रवाद कसा मेळ खातो? गेल्या काही वर्षांपासून आरएसएसची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची भूमिका कशी बदलत गेली? याबाबत घेतलेला हा आढावा ….

हे वाचा >> आंबेडकर-हेडगेवारांची अयोग्य तुलना

आरएसएसची आधी आंबेडकरांवर टीका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भारतीय संविधानाचा मसुदा तयार करत होते आणि हिंदू वैयक्तिक कायद्यांमध्ये सुधारणांचा आग्रह धरत होते, तेव्हा संघ आणि त्यांचे इंग्रजी मुखपत्र ऑर्गनायझरने आंबेडकरांवर जोरदार टीका केली होती. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी २०१६ साली द इंडियन एक्सप्रेसमध्ये “कोणते आंबेडकर?” (Which Ambedkar?) हा लेख लिहून या विषयावर प्रकाश टाकला होता. आंबेडकरांनी संविधान सभेत राज्यघटनेचा अंतिम मसुदा सादर केल्यानंतर ऑर्गनायझरने ३० नोव्हेंबर १९४९ च्या अंकात संविधानावर एक संपादकीय लिहिले असल्याची आठवण गुहा यांनी या लेखात करून दिली.

“भारताच्या नवीन राज्यघटनेबद्दल सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, त्यात भारतीय म्हणून असे काहीही नाही. या घटनेत प्राचीन भारतीय कायदे नाहीत, संस्था, परिभाषा आणि वाकप्रचार यांचा उल्लेख नाही”, अशी टीका संपादकीयमधून करण्यात आली.

हिंदू महिलांना जातीबाहेर लग्न करणे, पतीपासून विभक्त होण्यासाठी घटस्फोटाचा हक्क आणि मालमत्तेमध्ये वारसा हक्क देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव सादर केला होता. संघाकडून हिंदू कोड बिलाचा जोरदार विरोध करण्यात आला. १९४९ साली, या विधेयकाचा विरोध करून ते अडविण्यासाठी संघाने देशभरात बैठका आणि निषेध आंदोलने घेतली. साधू आणि संतांनी या बैठकांना उपस्थित राहून विधेयकाच्या विरोधात भूमिका मांडली, असेही गुहा यांनी वरील लेखात नमूद केले.

संघाचा विरोध हळूहळू मावळला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १९२५ साली स्थापना झाल्यापासून ‘हिंदू एकते’वर भर दिला. पण संघाचे सर्वोच्च नेतृत्व उच्चजातीय वर्गाकडे आणि विशेष करून ब्राह्मणांच्या हाती राहिल्यामुळे संघावर अनेकदा टीकाही झाली. हिंदूंना एकत्र आणण्याच्या संघाच्या प्रयत्नांना दोनदा मोठा धक्का बसला. पहिला धक्का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. १९५६ साली विजयादशमीच्या दिवशी, नागपूरातील रेशमबागेत सरसंघचालक संघप्रचारकांना वार्षिक संबोधन करत असताना, नागपूरच्या दुसऱ्या बाजूला दिक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास पाच लाख अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला.

हे वाचा >> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी नागपूरचीच निवड का केली होती?

त्यानंतर मीनाक्षीपूरम येथील घटनेने दुसरा धक्का बसला तो १९८१ साली. तमिळनाडू मधील तिरुनेलवेली जिल्ह्यात निम्न जातीमधील शेकडो लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला. त्यानंतर संघाने आंबेडकर आणि दलितांना जवळ करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते.

या दोन घटनांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वेगळे मार्ग निवडण्यासाठी उद्युक्त केले. आरएसएसने त्यानंतर देशभरात हिंदू समागम आणि मेळावे आयोजि करण्यास सुरुवात केली. १९८२ साली बंगळुरू येथे झालेल्या अशाच एका कार्यक्रमात संघ गणवेशात जमलेल्या हजारो स्वयंसेवकांनी “हिन्दवः सोदरा: सर्वे” ही घोषणा दिली. याचा अर्थ होतो, सर्व हिंदू हे बांधव आहेत.

१४ एप्रिल १९८३ रोजी महाराष्ट्रात झालेल्या एका कार्यक्रमात आरएसएसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि केशव हेडगेवार यांची जयंती एकत्र साजरी केली. त्यावर्षी योगायोगाने आंबेडकरांची रोमन कॅलेंडरनुसार येणारी जयंती ही हेडगेवार यांच्या तिथीनुसार येणाऱ्या जयंतीच्या बरोबरीने आली होती. ही संधी साधून आरएसएसने त्यावेळी ४५ दिवसांची ‘फुले-आंबेडकर यात्रा’ आयोजित करून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.

१९८९ साली, हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संघाच्या प्रत्येक शाखेने दलित वस्तीमध्ये जाऊन किमान एक शिक्षण केंद्र सुरू करावे, असे आदेश आरएसएसकडून देण्यात आले. सरसंघचालक बाळासाहेब देवरस आणि सहकार्यवाह एच. व्ही. शेषाद्री यांची ही संकल्पना होती. आरएसएसच्या सेवा विभागाने याची अंमलबजावणी करत या योजनेला मूर्त स्वरुप दिले.

१९९० साली, संघाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जोतीराव फुले यांचे शताब्दी वर्ष साजरे केले. (आंबेडकर यांची जन्मशताब्दी आणि फुले यांच्या पुण्यतिथीची शतकपूर्ती) संघाचे निर्णय घेणाऱ्या “अखिल भारतीय प्रतिनिधी सभा” या उच्चाधिकार समितीने एक ठराव संमत केला. “फुले आणि आंबेडकर या दोन्ही महान नेत्यांनी हिंदू समाजातील कुप्रथा आणि दुष्ट चालीरीतींवर जोरदार प्रहार करून हिंदू समाजातील लोकांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न केले”, असा उल्लेख या ठरावात करण्यात आला होता.

आणखी वाचा >> राष्ट्रभाव : आंबेडकर, हेडगेवारांचे उद्दिष्ट समान

२०१५ साली, विजयादशमीच्या संघ मेळाव्यात बोलत असताना भागवत यांनी “हिंदू हिंदू एक रहें, भेदभाव को नही सहें” अशी घोषणा देऊन आपल्या भाषणाची सांगता केली होती. हिंदूंना एकत्र राहण्याची सूचना त्यांनी या घोषणेतून केली. पुढच्याच वर्षी ऑर्गनायझरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो मुखपत्रावर छापून आंबेडकरांची स्तुती करणारा आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा असलेल्या विविध लेखांचा विशेषांक प्रकाशित केला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How the rss came to embrace the dr babasaheb ambedkar on vijayadashami kvg
Show comments